लेख-समिक्षण

अनभिषिक्त सुपरस्टार

शाहरुख खान… बॉलीवूडला पडलेलं एक सुंदर स्वप्न… हजारो-लाखो नव्हे तर कोट्यवधी तरुण-तरुणींच्या हृदयाची धडकन…जवळपास तीन दशकांहून अधिक काळ हिंदी सिनेसृष्टीवर आपली अवीट आणि अमीट छाप उमटवणारा बादशहा… फॅशन आयकॉन…स्टाईल आयकॉन…एटिकेटस् आयकॉन….आणि अभिनयाच्या क्षेत्रात तर अनभिषिक्त सम्राट… रुपेरी पडद्यावरील त्याच्या हरेक अदा प्रेक्षकांना मनापासून आवडणार्‍या… इतक्या की गावाखेड्यांमध्येही एखाद्या स्टायलिश तरुणाला ‘काय शाहरुख’ म्हणून उपमा दिली जाते…. त्याच्या स्टाईलची नक्कल करणार्‍यांची संख्या काही हजारांत असेल… स्टारडम किती असावं, याचा नवा मापदंड तयार करणारा हा सुपरस्टार आज वयाच्या साठीत प्रवेश करतोय… चित्रपटातील त्याची अभिनयाची कारकिर्द सर्वश्रुत आहे. पण त्यामागचा त्याचा संघर्ष, माणूसपण, सहकलाकारांविषयीची त्याची आत्मियता, आदरभाव हे त्याच्या स्टारडमहून कितीतरी मोठं आहे… नुकतीच या सुपरस्टारने वयाची साठी पूर्ण केली आहे. यानिमित्त ‘किंग खान’च्या या आभाळाएवढ्या यशाची ही सुपरहिट कहाणी…- सोनम परब

भारतातील सिनेरसिकांना आणि चित्रपटांचे फारसे आकर्षण नसणार्‍यांनाही शाहरुख खान हे नाव माहीत नसणं शक्य नाही. दिल्लीहून स्वप्ननगरी मुंबईमध्ये आलेल्या या मुलानं अवघ्या काही वर्षांतच कोट्यवधी लोकांवर आपल्या विलक्षण अभिनयाचं गारुड घातलं आणि तीन दशकांहून अधिक काळ सुपरस्टार म्हणून सिनेसृष्टीवर अक्षरशः साम्राज्य गाजवलं. आपल्या आयुष्याच्या जवळपास अर्ध्या कालावधीत शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक म्हणून अधिराज्य गाजवत आला आहे. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात बँकेबल म्हणजेच हमखास नफा देणारा अभिनेता म्हणून सर्वाधिक काळ त्याची ओळख राहिला. २००८ मध्ये संजय लीला भन्साळींचा ‘साँवरिया’ आणि शाहरुख खानचा ‘ओम शांती ओम’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. त्यावेळी ‘सावरियाँ’ भयंकर अपयशी ठरला, तर ‘ओम शांती ओम’ने त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांपैकी एक म्हणून इतिहास घडवला. एक वर्षानंतर सोनी पिचर्स एंटरटेनमेंटचे तत्कालीन अध्यक्ष मायकेल लिंटन यांनी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उल्लेख केलेले एक वाक्य ‘द शाहरुख खान’विषयी सर्व काही सांगून जाणारं आहे. त्यांनी लिहिलं होतं की, शाहरुख खानशी स्पर्धा करायची नाही, कितीही चांगलं प्रॉडट असला तरी ! या एका वाक्यावरुन शाहरुख खान या व्यक्मित्त्वाचा करिष्मा, त्याचं स्टारडम किती मोठं आहे हे लक्षात येतं. शाहरुखचे केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात चाहते आहेत. आपला अभिनय, इमोशन्सनी शाहरुखनं अनेकांची मनं जिंकली.
तसं पाहायला गेल्यास शाहरुख खानचं व्यक्तिमत्व आणि त्याचं स्टारडम हा एखाद्या प्रबंधाचा विषय आहे. मध्यंतरीच्या काळात त्याच्याविषयी वाद निर्माण झाले असले तरी प्रचंड परिश्रम करण्याची मनोवृत्ती, कमालीचा नम्रपणा, सुसंस्कृतपणा, शिष्टाचार, सहकलाकारांविषयीची आपुलकी, ज्येष्ठांविषयीचा आदरभाव यांसारखे अनेक गुण सिनेसृष्टीच्या लाईमलाईटमध्ये राहूनही जपणे ही साधी गोष्ट नाही. पण शाहरुखने ते प्रयत्नांती साध्य केलं.
‘बॉलीवूडचा बादशहा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या शाहरुखचा सुपरस्टार बनण्यापर्यंतचा प्रवास जितका मनोरंजक आहे, तितकाच प्रेरणादायीही आहे. शाहरुखचे वडील मीर मोहम्मद ताज खान हे भारतातील सर्वात तरुण स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. त्यांनी खान अब्दुल गफ्फार खान यांच्या सोबत इंग्रजांविरुद्ध लढा दिला. फाळणीनंतर ते भारतात आले आणि दिल्लीच्या राजेंद्र नगर परिसरात एका भाड्याच्या घरात वास्तव्यास आले. संसाधने मर्यादित असली तरी घरातील वातावरण समृद्ध होते. शाहरुखच्या व्यक्तिमत्त्वातील सुसंस्कृतपणा आणि आत्मभान हे या परंपरेचेच प्रतिबिंब आहे. शाहरुखचे वडील दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाजवळ एक छोटेसे हॉटेल चालवत असत. त्या काळात एनएसडीमध्ये इब्राहिम अल्काझी संचालक होते. अल्काझी यांनी भारतीय रंगभूमीला नवी ओळख दिली आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नसीरुद्दीन शाह, राज बब्बर, अनुपम खेर यांसारखे श्रेष्ठ कलाकार दिले. शाहरुख अनेकदा त्या हॉटेलमध्ये जायचा आणि या रंगकर्मींचे संवाद ऐकायचा. त्यावेळी कोणालाही कधी वाटले नाही की, हा तरुण उद्याच्या भविष्यात बॉलीवूडचा सर्वांत मोठा सुपरस्टार बनेल ! शाहरुखच्या अभिनयाची खरी दखल घेतली ती प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी. सईद मिर्झा हे ‘मोहन जोशी हाजिर हो’ आणि ‘सलीम लंगडे पर मत रो’ यांसारख्या संवेदनशील आणि वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी ‘नुक्कड’ आणि ‘सर्कस’ या लोकप्रिय मालिकाही बनवल्या. यातील ‘सर्कस’मधूनच शाहरुखला पहिला मोठा ब्रेक मिळाला. त्या काळात शाहरुख जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेत होता. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे ‘फौजी’आणि ‘सर्कस’सारख्या मालिकांचे शूटिंग ‡हे दोन्ही तो समांतरपणे करत होता. त्याच्या प्रामाणिक अभिनयामुळे आणि नैसर्गिक शैलीमुळे तो प्रेक्षकांच्या लक्षात राहू लागला. यानंतर शाहरुखने मुंबई गाठली आणि सुरू झाला त्याचा खरा संघर्ष. चित्रपटसृष्टीत कोणताही ‘गॉडफादर’ नसताना, केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने अढळ स्थान मिळवल
१९९२ मध्ये आलेल्या ‘दिवाना’ या पहिल्या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या ‘बाजीगर’, ‘डर’ आणि ‘अंजाम’ या चित्रपटांनी त्याच्या अभिनयातील सकसपणा, दर्जेदारपणा दाखवून दिला. १९९५ ‡हे वर्ष शाहरुखच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. कारण यावर्षी प्रसिद्ध झाला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहराच बदलून टाकला. ४ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात ८९ कोटींची कमाई केली, तर परदेशात त्याचे कलेशन एकुण १३.५० कोटी होते. १९९८ मध्ये ‘कुछ कुछ होता है’ ने तर प्रेमकथांच्या नव्या युगाची सुरुवात केली. त्या काळात देशात उदारीकरणाची नवी हवा होती. अर्थव्यवस्था बदलत होती, मूल्ये बदलत होती आणि या नव्या भारताचा चेहरा शाहरुखच्या पात्रांतून उमटत होता. त्याने या बदलत्या काळाचे स्वागत केले. त्याचा अभिनय केवळ रोमँटिक नव्हता तर या बदलत्या आधुनिक भारताचे प्रतीक बनला. अर्थशास्त्रात पदवी घेतलेल्या शाहरुखने बाजार आणि सिनेमा यांच्यात एक विलक्षण नातं निर्माण केलं. किती तरी वर्षे‘शाहरुख खान म्हणजे सुपरहिट’ हे निर्माते-दिग्दर्शकांसाठी बिनचूक समीकरण बनलं होतं. तो केवळ चित्रपटांचा सुपरस्टार नव्हता, तर जाहिरातींच्या जगातही सर्वाधिक मागणी असलेला चेहरा बनला. अभिनयाच्या क्षेत्रातील पुरस्कारांवर शाहरुखचा ठसा प्रदीर्घ काम राहिला. तब्बल १४ वेळा त्याने फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.
त्याने आपलं अर्ध आयुष्य चित्रपटसृष्टीत व्यतीत केलं आहे. ‡ दिवस-रात्र काम करत, आनंदी स्वभाव आणि अत्यल्प झोप यांच्या आधारावर तो जिवंत राहिला आहे. अभिनेता म्हणून शाहरुख स्वतःवर प्रेम करत नाही, पण स्टार म्हणून मात्र तो आत्मविश्वासाचा झरा आहे. म्हणूनच महेश भट्ट यांनी ९०च्या दशकातच भविष्यवाणी केली होती की, शाहरुख खान म्हणजे दोन माणसं एका शरीरात दडलेली आहेत.
उर्दू भाषेतील ‘तहझीब’ ‡या शब्दाचा अर्थ संस्कार, सुसंस्कृत वर्तन, शिष्टाचार. हा शब्द सहज भाषांतरित करता येत नाही आणि शाहरुख खानही तसाच आहे. करण जोहर म्हणतो, शाहरुख खानचं स्पष्टीकरण देता येत नाही. त्याला फक्त अनुभवता येतं.
या सिनेमावेड्या देशातील अब्जावधी लोकांपैकी जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी शाहरुख खानचा अनुभव घेतला आहे. कधी त्याच्या चेहर्‍यावरील हास्याने, ओलसर डोळ्यांच्या भावनेने किंवा त्याच्या निखळ मोहकतेने आपण कधी ना कधी हरवून गेलो आहोत. असंख्य तरुणी त्याच्याकडे ‘आय लव्ह यू’ ब्रेसलेट्सची मागणी करण्यासाठी येतात; तर कधी राखी बांधण्यासाठी येतात, तर कोणी चिठ्ठ्या, पत्रं देतात. जगभर त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. फ्रान्सने त्याला ‘लेझिऑन द’ऑनर’ हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला आहे.
‘द अनुपम खेर शो’ या कार्यक्रमात शाहरुखने आपल्या आई-वडिलांविषयी काही अत्यंत हृदयस्पर्शी आठवणी शेअर केल्या होत्या. विशेषतः आपल्या आईच्या शेवटच्या क्षणांविषयी सांगताना त्याच्या डोळ्यांत आलेले अश्रू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. ज्या दिवशी त्याची आई गेली, त्या दिवशी तो दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये बसून तिच्यासाठी सतत दुवा मागत होता. त्याला कुणीतरी सांगितले होते की जर तो प्रार्थना करत राहिला, तर आई वाचेल. त्यामुळे तो आत न जाता बाहेरच बसून प्रार्थना करत राहिला. अचानक डॉटर बाहेर आले आणि म्हणाले, तुम्ही आईसीयूमध्ये जाऊ शकता. हे वाय ऐकून शाहरुखला कळले की आता शेवट जवळ आला आहे. त्याला आत जायचे नव्हते, पण बहिणीने आणि कुटुंबीयांनी आग्रह केला, त्यामुळे जावे लागले. शाहरुखने सांगितले की, मला नेहमी वाटते की माणूस तेव्हाच जग सोडतो, जेव्हा त्याला वाटते की आता सर्व काही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आई असंतुष्ट असेल तर ती आपल्याला सोडून जाऊ शकणार नाही, असा विचार माझ्या मनात आला. म्हणूनच मी तिच्याजवळ बसून जाणीवपूर्वक तिला त्रास देणार्‍या गोष्टी बोलत राहिलो. मी म्हणायचो ‡ ‘जर तू गेलीस तर मी बहिणीची काळजी घेणार नाही, मी अभ्यास करणार नाही, मी काही काम करणार नाही.’ मला वाटले ती असं ऐकून रागावेल, दुखावेल. पण ती माझी भाबडी समजूत होती. आईला कदाचित खात्री होती की मी बहिणीची काळजी घेईन, जीवनात स्वतःचा मार्ग शोधेन. म्हणून ती शांतपणे निघून गेली.
शाहरुखच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले. एका रात्री त्यांनी व्हॅनिला आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि शाहरुखने स्वतः त्यांना ते आणून दिले. आईस्क्रीम देतानाचं ते स्मित आजही माझ्या मनात कायम आहे, असं तो सांगतो.
शाहरुखची बहिण शहनाज लाला रुख खान वडिलांच्या मृत्यूनंतर अतिशय खचून गेली होती. वडिलांचे मृत शरीर पाहून ती कोसळली आणि तीव्र मानसिक आघातातून अनेक वर्षांपर्यंत सावरू शकली नाही.‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ च्या शूटिंगच्या काळात तिची प्रकृती बिघडली होती. तिला उपचारासाठी स्वित्झर्लंडला नेले होते. शाहरुख जेव्हा ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ हे गाणं शूट करत होतो, त्या काळातच तिचे उपचार चालू होते. सर्वसामान्य कलाकारांच्या आयुष्यात येणारे हे कटू प्रसंग किंग खानलाही चुकले नाहीत. पण या सर्वांमध्येही तो खचून न जाता काम करत राहिला. तो विविध ब्रँडपेक्षाही मेहनत, सातत्य आणि लोकप्रियता यांचा ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’ बनला. ‘देअर इज ओन्ली वन रिलिजन इन द वर्ल्ड – हार्ड वर्क’ हे त्याचं ब्रीदवाक्य आहे आणि तेच त्याच्या अद्वितीय यशाचं गमक !

Check Also

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …