गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी १.३८ वाजता उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर परिसरात कोसळले. या भीषण अपघातात विमानातील २४१ प्रवासी आणि तीन बी. जे. मेडिकल कॉलेजचे २० डॉटर व स्थानिक नागरिक असे २६१ जण ठार झाले आहेत. दैव बलवत्तर असल्याने रमेश विश्वकुमार नावाचा केवळ एक प्रवासी विमानातून जिवंत बाहेर आला. या दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे.
अपघातग्रस्त विमानाने अहमदाबाद येथून दुपारी १.३९ वाजता लंडनसाठी उड्डाण केले होते. विमानात टेकऑफनंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटला आणि ते मेघानी नगर येथे बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृह परिसरात कोसळले. त्यावेळी वैद्यकीय विद्यार्थी जेवण करीत होते. या अपघाताच्या वेळी विमान सुमारे ६२५ फूट उंचीवर होते. या दुर्घटनेनंतर परिसरात प्रचंड आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले, ज्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर काही इमारतींनादेखील नुकसान झाले आहे.
अपघातानंतर विमानाचे काही अवशेष आणि एक पंख तुटून पडलेले दिसले. घटनास्थळी तातडीने पोलिस, अग्निशमन दल, आपत्कालीन बचाव पथके आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेतली. आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करण्यात आला असून, काही प्रमाणात आग आटोयात आणण्यात यश आले आहे. अनेक जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातग्रस्त विमानात एकूण २४२ प्रवासी होते. यामध्ये दोन पायलट, १० क्रू मेंबर्ससह २३० प्रवाशांचा समावेश होता. प्रवाशांमध्ये भारताच्या १६९ भारतीय नागरिकांचा समावेश होता. तर ५१ ब्रिटिश, सात पोर्तुगीज, एक कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. तसेच दोन नवजात बालके, ११ लहान मुले या विमानातून प्रवास करत होते. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेदेखील या विमानातून प्रवास करत होते. त्यांच्यापैकी केवळ रमेश विश्वकुमार हे बचावले आहेत. ते जखमी झाल्याने त्यांना बी. जे. मेडिकल कॉलेज दाखल करण्यात आले आहे.
विमानाचा अपघात बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल परिसरात झाला आहे. हॉस्टेल इमारतीवर विमान कोसळल्याने वसतिगृहातील —२० इंटर्न डॉटर आणि स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. या अपघातातील गंभीर जखमींची यादी आली आहे. या यादीनुसार ५० जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यापैकी २०जणांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर वेगवेगळ्या वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. हॉस्टेलच्या इमारतीची मोडतोड झाली असून बाहेर ठेवलेल्या दुचाकी आणि कार जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मेघानी नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विमानतळ परिसरातही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
दरम्यान, या अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी विमानन प्राधिकरण आणि तांत्रिक तज्ज्ञांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष तज्ज्ञांचे पथक लवकरच ब्लॅक बॉसची तपासणी करणार असून, त्यानंतर अपघाताचे खरे कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
Check Also
तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …
पांचजन्य वृत्तपत्र