लेख-समिक्षण

का कोसळले विमान?

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच चिंताजनक आहे. वास्तविक, बोईंग ७८७ ड्रीमलाइनर ही विमाने सामान्यतः सुरक्षित मानली जातात. एअर इंडियाकडे आजघडीला २५ पेक्षा अधिक ड्रीमलायनर विमाने आहेत. याखेरीज कतार, एतिहाद, ब्रिटिश एअरवेज, चायना साउदर्न, एअर फ्रान्स, एअर कॅनडा यांच्याकडेही बोईंगची विमाने आहेत. हे त्याचे पहिलेच ‘फॅटल हुल-लॉस’ मानले जात आहे. सदर घटनेतील वैमानिकही अनुभवी आणि प्रशिक्षित होता. मग नेमके काय घडले ज्यामुळे एकाएकी २३० प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान कोसळले?
गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे जाणार्‍या एअर इंडियाच्या एआय १७१ या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाला झालेल्या अपघाताने अवघा देश शोकाकूल झाला आहे. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच हे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि मेघाणी नगर परिसरात कोसळले. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, विमानातील सर्व २३० प्रवासी आणि १२ कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. इतकेच नव्हे तर ज्या भागात हे विमान कोसळले त्या भागातील दोन इमारतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे.
विमानाने उड्डाण घेतल्यावर काही क्षणांतच कॉकपिटमधून ‘मायडे’ कॉल देण्यात आला होता. हा कॉल म्हणजेच आपत्कालीन परिस्थिती दर्शविणारा संकेत. पण त्यानंतर लगेचच एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि काही क्षणांतच लोकांनी आकाशातून धूर आणि अग्नीच्या ज्वाळा पडताना पाहिल्या. ही घटना संपूर्ण देशाला हादरवणारी ठरली आहे. सध्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉस (फ्लाइट डाटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर) शोधण्याचे आणि त्याच्या तपासणीतून नेमकं कारण शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोईंग कंपनी आणि एअर इंडिया यांनीही ही घटना अत्यंत गंभीरतेने घेतली असून तांत्रिक तपासणी सुरू केली आहे.
या घटनेमागील नेमके कारण समोर यायला अजून वेळ लागेल, मात्र जागतिक स्तरावर विमान अपघातांची कारणे पाहता काही संभाव्य शयता स्पष्टपणे मांडता येतात. जागतिक नागरी विमान वाहतूक संस्थांच्या आकडेवारीनुसार, सुमारे ७०-८० टक्के अपघात हे मानवी चुका म्हणजेच पायलटच्या निर्णयातील किंवा प्रतिसादातील त्रुटींमुळे होतात. विशेषतः टेकऑफ आणि लँडिंगच्या काळात – जो संपूर्ण फ्लाइट वेळेचा फक्त १० टक्क्यांहून कमी असतो -अपघात होण्याची शयता सर्वाधिक असते.
दुसर्‍या क्रमांकावर तांत्रिक बिघाड येतो. इंजिन फेल्युअर, हायड्रॉलिक सिस्टीमची अयशस्वीता, स्ट्रचरल क्रॅस यामुळेही विमान दुर्घटना होण्याची शयता असते. ताज्या दुर्घटनेत विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच सिग्नल दिला असल्याने इंजिनमध्ये अचानक आलेल्या बिघाडाचाही संशय व्यक्त केला जात आहे.
तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हवामान. वीज पडणे, अतिवेगवान वारे, तापमानातील अतिशय तफावत किंवा धुकं हे घटक अपघातात हातभार लावू शकतात. सध्या गुजरातमध्ये उन्हाचा तीव्र प्रकोप असून ४५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे. अशा गरम हवामानात विमानांच्या इंजिनवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे पक्ष्यांची धडक. दरवर्षी भारतात सुमारे १५०० पक्षी धडक नोंदवल्या जातात. काहीवेळा पक्ष्यांचे थवे इंजिनमध्ये शिरतात आणि त्यामुळे फ्लेमआउट किंवा थ्रस्ट लॉस होतो. यामुळेही विमान आपले नियंत्रण गमावू शकते. आताच्या घटनेत तसा प्रकार घडलेला नाहीये.
शेवटी, विमानाच्या देखभालीमध्ये झालेली चूक किंवा तपासणीतील हलगर्जीपणाही अपघाताचे कारण ठरू शकतो. अनेकदा मेंटेनन्समधील चुका उड्डाणानंतरच समोर येतात. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरील काही महत्त्वाच्या विमान अपघातांची आठवण अनिवार्य आहे. २०१५ मध्ये जर्मनविंग्जचे एक विमान पायलटच्या मानसिक अस्थैर्यामुळे पर्वतावर धडकले होते. यामध्ये १५० जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये इंडोनेशियामध्ये लायन एअरचे बोईंग ७३७ मॅस मॉडेल कोसळले होते, जे मॉडेल नंतर संपूर्ण जगभर स्थगित करण्यात आले. भारतातही २०२० मध्ये कोझिकोड येथे एअर इंडिया एसप्रेसचे विमान रनवेवरून घसरून दुर्घटनाग्रस्त झाले होते.
या पार्श्वभूमीवर पाहिल्यास, एआय१७१ विमानाचे टेकऑफनंतर लगेचच कोसळणे ही बाब गंभीर संशोधनाची गरज दर्शवत आहे. ब्लॅक बॉसच्या डेटावरून पुढील काही दिवसांत या अपघातामागील नेमके कारण उघड होईल. ब्लॅक बॉसमध्ये मायडे कॉलचे तपशील, अचानक मिळालेला इशारा, तसेच टेकऑफनंतरच्या निर्णायक क्षणांत बचावासाठी केलेले प्रयत्न हे सर्व अचूकपणे नोंदलेले असतात. या घटनेत विमान अवघ्या ६२५ फूट उंचीवर असताना कोसळले आहे. त्यामुळे फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधून इंजिनची कामगिरी, विमान नियंत्रण प्रणाली कोणत्या स्थितीत होती, तसेच इशारा प्रणाली कशी होती अशा अनेक तांत्रिक बाबी समोर येतील. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरमधून आकस्मिक परिस्थितीची चेकलिस्ट, वैमानिकांमधील संवाद, यांत्रिक बिघाडावर चर्चा ‡ हे सर्व स्पष्ट होऊ शकते. पण या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी प्रवासाआधी विमाने सुरक्षित आहेत का याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र नागरी विमान वाहतुकीची जागतिक आकडेवारी स्पष्टपणे दाखवते की, विमान प्रवास हा अजूनही सर्वात सुरक्षित प्रवासाचा प्रकार आहे. हजारो किलोमीटर प्रवासात मृत्यूचा धोका अत्यंत नगण्य असतो. याचा अर्थ असा नाही की काळजी घ्यायची गरज नाही.
या घटनेनंतर सरकार, एअर इंडिया, बोईंग आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांच्यासमोर आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यात सर्वप्रथम विमानाच्या मेंटेनन्स प्रक्रियेचे पुनरावलोकन, क्रूचे थकवा व्यवस्थापन, अधिक शिस्तबद्ध प्रशिक्षण याबाबत पुनर्विचार करुन आपत्कालीन प्रतिसाद कार्यक्षम बनवणे आवश्यक आहे. तसेच विमानातील तांत्रिक उपकरणांचे निरीक्षण, स्वयंचलित सुरक्षा प्रणालींची तपासणी आणि संभाव्य बिघाडाचे लवकर संकेत देणार्‍या यंत्रणांचे आधुनिकीकरण करणेही गरजेचे आहे. ब्लॅक बॉस डेटा थेट रिअल टाईममध्ये ग्राउंड कंट्रोलकडे जाणारी प्रणाली विकसित करण्यावरही विचार सुरू आहे. वास्तविक, बोईंग ७८७ ड्रीमलाइनर ही विमाने सामान्यतः सुरक्षित मानली जातात. एअर इंडियाकडे आजघडीला २५ पेक्षा अधिक ड्रीमलायनर विमाने आहेत. याखेरीज कतार, एतिहाद, ब्रिटिश एअरवेज, चायना साउदर्न, एअर फ्रान्स, एअर कॅनडा यांच्याकडेही बोईंगची विमाने आहेत. हे त्याचे पहिलेच ‘फॅटल हुल-लॉस’ मानले जात आहे. त्यामुळे बोईंग कंपनीला यावर खोल तपास करावा लागेल. एअर इंडिया ही भारताची प्रमुख विमान सेवा असून टाटा समूहाच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांनी सेवा व सुरक्षिततेत सुधारणा केल्याचे दिसून आले होते. मात्र ही घटना त्या प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करते. त्यामुळे भविष्यात एअर इंडियाला अधिक सुरक्षितता केंद्रित धोरण स्वीकारावे लागेल. अखेर, प्रत्येक विमान अपघात हा प्रवाशांसाठी, पायलट्ससाठी, इंजिनीअर्ससाठी आणि नियामक यंत्रणांसाठी एक मोठा धडा घेऊन येतो. अहमदाबादमधील दुर्घटनेने आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे की प्रगत तंत्रज्ञान असूनही, मानवी त्रुटी, तपासणीतील हलगर्जीपणा आणि अनपेक्षित घटनांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम भयावह ठरू शकतात. – – कमलेश गिरी

Check Also

तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …