लेख-समिक्षण

मनोरंजनसृष्टीतली धोयाची घंटा

कधीकाळी ज्या रूपेरी पडद्यावर आयुष्यातील आनंदाचे, दु:खाचे, प्रेमाचे, बंडाचे रंग पाहायला मिळायचे, तोच पडदा आज गोंधळलेल्या कोलाहलांनी व्यापलेला आहे. एकेकाळी गल्लोगल्लीतील रसिकांच्या काळजाला स्पर्श करणार्‍या कथा असायच्या; गीतांमध्ये लोकभावना झिरपत असत, संवादांमध्ये आशयसंपन्नता आणि भावनात्मकता असायची; पण आज सिनेसृष्टीवर कार्पोरेट गणितांचं स्वामित्व आहे. आज भावनांपेक्षा बजेट जास्त बोलतं. परिणामी, सिनेमांमध्ये कथा नसते, फक्त ‘कंटेंट’ असतो. अभिव्यक्ती हरवते चालल्याने निखळ, निरलस कलावंत अंधाराकडे ढकलले जात आहेत.- सोनम परब
————–
आज बॉलीवूडचा आर्थिक विस्तार वाढला असला, तरीही त्याच्या मूळ मूल्यांमध्ये आणि सर्जनशीलतेत झालेली घट ही चिंताजनक बाब आहे. एकेकाळी जेव्हा दहा चित्रपटांपैकी पाच चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरत होते, तेव्हा आजची परिस्थिती अशी आहे की वीस चित्रपटांमधून एकाच यशस्वी होण्याची खात्री देता येत नाही. ही गोष्ट बॉलीवूडच्या भविष्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करते.
पूर्वी कथा, गीतलेखन, संवादलेखन करणार्‍या लेखकांना मान आणि रोजगार मिळायचा, पण आज ही मूल्यव्यवस्था कोसळताना दिसते. चित्रपटांचे यश आता कथा किंवा कलाकारांवर नाही, तर काही कॉर्पोरेट रणनीतींवर आधारित असते. पूर्वी चित्रपट जनसामान्यांच्या भावनांना स्पर्श करणारे असायचे, पण आज ते भव्य सेट, जागतिक तंत्रज्ञान आणि मार्केटिंगवर अधिक अवलंबून झाले आहेत.
फ्लॉप चित्रपटांचं प्रमाण वाढलं
आज बॉलीवूडमध्ये यश काही ठराविक मंडळींच्याच पदरात पडते आणि बहुतांश चित्रपट अपयशी ठरतात. ८० आणि ९० च्या दशकांमध्ये ज्या चित्रपटांना दूरदर्शनवर पुन्हा एक संधी मिळायची, आज त्यासाठीही बाजार राहिलेला नाही. त्यामुळे या उद्योगाची मुळे हळूहळू सुकताना दिसत आहेत. बहुतेक लेखक, साहाय्यक दिग्दर्शक, संगीतकार, तंत्रज्ञ यांच्याकडे स्थिर रोजगार नाही. पैसा, भविष्य आणि संधी केवळ मोजया व्यक्तींच्याच ताब्यात आहे. ही गोष्ट कोणत्याही सर्जनशील उद्योगासाठी धोकादायक असते.
नवे नायक, पण यश नाही
गेल्या दहा वर्षांत बॉलीवूडने असा एकही नायक घडवलेला नाही, ज्याची लोकप्रियता राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्याशी तुलना करता येईल. आज कोणताही चेहरा बॉस ऑफिस यशाची खात्री देत नाही. चित्रपट यशस्वी होतील की नाही, हे केवळ प्रमोशन आणि वितरणाच्या स्ट्रॅटेजीवर अवलंबून आहे. या सर्वामागे बॉलीवूडचा पारंपरिक नैसर्गिक व्यवसाय पद्धतीचा र्‍हास झाला आहे.
प्रेक्षकाऐवजी स्ट्रॅटेजीला महत्त्व
कधीकाळी बॉलीवूड भारतीय जीवनशैलीचं प्रतिबिंब मानलं जायचं, पण आता ते कॉर्पोरेट डावपेचांच्या जाळ्यात अडकलेलं आहे. संकट केवळ फ्लॉप चित्रपटांपर्यंत सीमित नाही, तर निर्माते, दिग्दर्शक आता प्रेक्षकांच्या भावनांची, गरजांची आणि बजेटची फिकीर करत नाहीत. आणि प्रेक्षकही आज आपल्या आयुष्याशी संबंधित काही कथानक चित्रपटातून मिळेल, अशी अपेक्षा ठेवत नाहीत. ‘ग्लोबल कंटेंट’, डबिंग आणि जागतिक फॅन फॉलोइंग या सगळ्या कृत्रिम गोष्टी केवळ काही मोजया चित्रपटांपुरत्याच मर्यादित राहतात.
चर्चा हरवलेल्या, ओळखी पुसट झालेल्या
कधीकाळी नवे चित्रपट आले की त्यांची गाणी, संवाद समाजात ऐकायला मिळायचे. आज अशी चर्चा नाही. चित्रपट समीक्षकांनाही बर्‍याचदा चित्रपटाच्या कथा माहित नसतात. पूर्वी उत्पन्न मर्यादित असलं तरी उत्साह प्रचंड होता. हजारो लोकांना काम मिळायचं, लाखो प्रेक्षक आशावादी असायचे. आज केवळ काही सेलिब्रिटी कलाकारांच्या हातात अमाप पैसे आणि संधी आहेत, तर मोठ्या संख्येतील कलाकार उपेक्षित आणि बेरोजगार आहेत.
कार्पोरेटचा पूर्ण कब्जा
पूर्वी जे कथा-संवाद लेखक, गीतकार, लघुचित्रपट दिग्दर्शक आपली वेगळी ओळख राखून होते, आज त्यांनाही काम मिळणं कठीण झालं आहे. कारण चित्रपटसृष्टी आता कार्पोरेट कंपन्यांच्या हाती गेली आहे. चित्रपटांमधील गुणवत्ता, मूळ कथानक, स्थानिक अनुभव यांना डावलून मार्केटिंग, ग्लॅमर आणि ब्रँडिंगवर भर दिला जातो. यामुळे स्थानिक लेखक, कलाकार, संगीतकार उद्योगाबाहेर ढकलले जात आहेत. ज्या चित्रपटांनी पूर्वी गावखेड्यातील लोकांना शहरांकडे खेचलं, त्या प्रकारचे चित्रपट आज दुर्मीळ झाले आहेत.
तंत्रज्ञानाचा भ्रामक प्रभाव
आज मोबाईलच्या छोट्या पडद्यावर संपूर्ण मनोरंजनजगत साकारलं जातं. एआयच्या वापरामुळे आपण कोणतीही गोष्ट ‘आपली’ म्हणून सादर करू शकतो, असं वाटू लागलं आहे. पण या मोहात स्थानिक कथा, स्थानिक भाषिक नाट्यप्रकार, लोकसंस्कृती यांचा विसर पडतोय. हेच घातक आहे. बॉलीवूड आता अशा माफियांच्या ताब्यात गेला आहे, जे उद्योगाच्या सर्व बाजूंना आपल्याच ताब्यात ठेवतात. ‘ग्लोबल’ होण्याच्या नादात बॉलीवूड कृत्रिम, ओळखीशिवाय आणि भावनाशून्य बनलं आहे.
भविष्याचा धोका
जर लवकरच काही सर्जनशील, देशाच्या भावना जपणारे कलाकार पुढे आले नाहीत आणि बॉलीवूडमध्ये भारतीयतेचा रंग भरला गेला नाही, तर हा उद्योग कायमचा कोसळेल, अशी भीती काही जणांकडून व्यत केली जात आहे. कदाचित काही मोजया कंपन्यांना त्यातून अब्जावधींचा नफा होईल, पण या उद्योगावर अवलंबून असणारे ४० ते ५० लाख लोक बेरोजगार होतील. आज एक चित्रपट तयार करण्यासाठी शेकडो कोटी रुपये लागतात आणि प्रमोशनवरही तितकाच खर्च होतो. त्यामुळे सर्वसामान्य लेखक किंवा कलाकार स्वतःची कलाकृती घेऊन पुढे येऊ शकत नाहीत.
आता इंडस्ट्रीला अशा ‘ग्लोबल भावनां’चे कलाकार हवे आहेत, जे जगात कुठेही चालतील; पण कुठल्याच देशात ‘खरे’ वाटणार नाहीत. हा बॉलीवूडला लागलेला रोग आहे आणि तो लवकरच बरा केला गेला नाही, तर त्याचे परिणाम भारतीय सर्जनशीलतेच्या आणि रोजगाराच्या इतिहासावर अत्यंत गंभीर असतील.

Check Also

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …