दिल्लीतील विशाल सिंह यांनी २०२० मध्ये एक वेगळा मार्ग निवडला. पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि नैतिक व्यापाराचे स्वप्न घेऊन त्यांनी हेम्पलूम या ब्रँडची स्थापना केली. विशेष म्हणजे, त्यांनी ही सुरुवात फक्त ५०,००० रुपयांत केली. आज, अवघ्या चार वर्षांत, हेम्पलूम वर्षाला ७० ते ८० लाख रुपयांचा व्यवसाय करत आहे. हा ब्रँड भारतातला एकमेव असा ब्रँड आहे जो भांग या वनस्पतीपासून तयार होणार्या सूताचा वापर करून कपडे, अॅसेसरीज आणि होम डेकोर उत्पादने बनवतो.
विशाल सिंह यांचे शिक्षण ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी (हरियाणा) येथे झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कारकीर्द करण्यासाठी पारंपरिक उद्योगांऐवजी पर्यावरणपूरक पर्याय निवडला. २०२० मध्ये त्यांनी ‘हेम्पलूम इंडिया’ या कंपनीची स्थापना केली. त्यांचा उद्देश होता फॅशन आणि पर्यावरण यांच्यात समतोल निर्माण करणे.
भांग ही वनस्पती अनेकदाच गैरसमजांमुळे दुर्लक्षित राहिली आहे. मात्र तिच्यातून तयार होणारे धागे हे शंभर टक्के नैसर्गिक, रासायनांंपासून मुक्त आणि प्रचंड टिकाऊ असतात. हेम्पचे कपडे कापसाच्या तुलनेत ५० टक्के कमी पाण्यावर तयार होतात. शिवाय, हे कपडे मजबूत, स्टायलिश आणि दीर्घकाळ टिकणारे असतात. यामध्ये शर्ट, ट्राउझर, कुर्ता-पायजमा, सूट इत्यादींचा समावेश आहे. विशाल सिंह यांना वाटतं की, फॅशन ही फक्त सौंदर्यसृष्टी नसून ती पर्यावरणाचे भान ठेवणारी असली पाहिजे. यासाठीच त्यांनी पर्यावरणाला हानी पोहचवणार नाहीत अशा उत्पादनांचा प्रचार केला.
आज हेम्पलूमकडे २०० पेक्षा जास्त इको-फ्रेंडली उत्पादनांची श्रेणी आहे. यामध्ये कपडे, अॅसेसरीज, होम डेकोर आणि पर्यावरणपूरक पॅकेजिंग मटेरियल यांचा समावेश आहे. कंपनीची खासियत म्हणजे डिझाइन आणि उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे इनहाउस (स्वतःच्या स्टुडिओमध्ये) होते.
ही उत्पादने बाजारात दिसायला वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण आणि युनिक असतात. यामुळे आंतरराष्ट्रीय ब्रँडस् आणि डिझाइनर्ससोबत काम करण्याची संधीही विशाल यांना मिळाली आहे.विशाल सिंह आणि त्यांची टीम सातत्याने हेम्पच्या नवीन संकल्पांचा आणि शक्यतांचा शोध घेत असते.
विशाल सिंह यांचा प्रवास हा नवतरुणांसाठी आदर्श ठरणारा आहे. कमी गुंतवणूक, योग्य कल्पना आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर मोठं आणि शाश्वत काहीतरी घडवता येतं, हे त्यांनी दाखवून दिले आहे. यामध्ये सर्वांत महत्त्वाचं आहे ते पर्यावरणभान. व्यवसाय म्हणजे केवळ नफा नव्हे, तर पर्यावरणाप्रती असणारी संवेदनशीलताही आहे. निसर्गाशी अनुकूल राहात व्यवसाय केल्यास तो शाश्वत आणि अधिक प्रभावी ठरतो.
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र