लेख-समिक्षण

गालबोट विश्वासार्हतेला

एनपीसीआयने गेल्या दशकात डिजिटल व्यवहारांचे स्वरूपच पालटले आहे. सध्या भारतात दररोज सुमारे 60 कोटी यूपीआय व्यवहार होतात. यूपीआयच्या यशामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर लोक आता रोख रक्कम न बाळगता घराबाहेर पडतात. खेड्यापाड्यांतही यूपीआय व्यवहार स्वीकारले जात असल्यामुळे ही सेवा अखंड चालू राहणे अत्यावश्यक आहे. परंतु अलीकडेच ही सेवा ठप्प झाल्याने सबंध देशभरामध्ये बराच गोंधळ उडाला. गेल्या एका वर्षात अशा प्रकारे यूपीआय प्रणाली ठप्प होण्याची ही सहावी वेळ होती. युपीआयसेवा एका तासासाठी बंद राहिली, तरी जवळपास 4 कोटी रुपयांचे व्यवहार थांबतात. त्यामुळे भविष्यात ही सेवा अखंडित सुरू राहणे अत्यावश्यक आहे. युपीआय हा भारताच्या डिजिटल ग्रोथ स्टोरीचा तो कणा आहे. भारताच्या विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. सततच्या सेवेतील खंडितपणामुळे त्याला गालबोट लागू नये हीच अपेक्षा.
दहा वर्षांपूर्वी कोणी कल्पनाही केली नसेल की, एखाद्या मोबाईल अ‍ॅपमधून दोन टॅपमध्ये पैसे पाठवणे किंवा वीजपाणीच्या बिला भरल्यावर लगेचच त्याचा पावती मेसेज येणे, हे इतके सोपे होईल. यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) या प्रणालीने भारतात डिजिटल क्रांती घडवली, ही बाब नाकारता येणार नाही. आज लाखो भारतीयांचं बँकिंग त्याच्या खिशात आहे‡म्हणजेच त्यांच्या स्मार्टफोनमध्ये. पण या क्रांतीचा दुसरा पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे‡तो म्हणजे तांत्रिक त्रुटी, नेटवर्क अडथळे आणि सुरक्षेची चिंता. गेल्या काही महिन्यांपासून यूपीआय व्यवहारांमध्ये वेळोवेळी अडथळे निर्माण होत आहेत. नेटवर्क डाऊन, सर्व्हर क्रॅश, व्यवहार अपयशी ठरणे यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. यामुळे यूपीआयबद्दलचा विश्वास डळमळीत होऊ लागला आहे. 12 एप्रिल 2025 रोजी, अवघ्या दोन आठवड्यांत चौथ्यांदा भारतातील अत्याधुनिक रिअल-टाईम डिजिटल पेमेंट प्रणाली ‡म्हणजेच युपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) ‡ अचानक ठप्प झाली. या काळात सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस झाला. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या यूपीआयचे व्यवस्थापन करणार्‍या संस्थेने सांगितले की, तांत्रिक अडचणी येत आहेत आणि त्या सोडवण्याचे काम सुरू आहे. मात्र या समस्यांची पुनरावृत्ती पाहता, केवळ तात्पुरती उपाययोजना न करता, दूरगामी धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे.
युपीआय सेवेमध्ये झालेल्या बिघाडानंतर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नेहमीप्रमाणे ही बिघाड अनियमित तांत्रिक कारणांमुळे झाल्याचं सांगितलं. पण एनपीसीआच्या आकडेवारीनुसार, या सेवा खंडित होण्याच्या घटना केवळ अपवादात्मक नाहीत. जानेवारी 2022 मध्ये युपीआय सेवा 187 मिनिटांसाठी ठप्प झाली होती. मार्च 2025 मध्ये पुन्हा 95 मिनिटे सेवा बंद होती. या दोन्ही घटना मिळून तब्बल 282 मिनिटे ही सेवा ठप्प झाली होती. यामुळे देशातील लाखो वापरकर्त्यांना मोठा फटका बसला. युपीआयसेवा एका तासासाठी बंद राहिली, तरी जवळपास 4 कोटी रुपयांचे व्यवहार थांबतात, हे वास्तव एनपीसीआयच्या मार्च महिन्यातील आकडेवारीवरून समोर आलं आहे. 26 मार्च रोजी पहिल्या बिघाडादिवशी युपीआय व्यवहारांचा आकडा 581 दशलक्षवरून 550 दशलक्षांवर घसरला होता. म्हणजेच‡ जवळपास 7% घट या दिवशी दिसून आली होती. हे आकडे तांत्रिक अडचणींचं आर्थिक परिणामकारक रूप दाखवतात.
बिघाडाचं खरं कारण कोणतं? या प्रश्नावर काही संकेत समोर आले. ‘बिझनेस स्टँडर्ड’ने दिलेल्या माहितीनुसार, काही वेळा इंटरनेट सेवा पुरवठादारांकडून नेटवर्कमध्ये व्यत्यय, हार्डवेअर बिघाड, तसेच बँकांच्या व्यवहार-प्रक्रिया प्रणालीत झालेला ताण हेही कारण ठरू शकतात. या प्रणालीच्या यशामागे कार्यक्षम डेटा सेंटर्स आणि बँकांचे समन्वय आवश्यक असते. पण ‘हाय ट्रॅफिक’च्या वेळेस ही यंत्रणा सक्षमपणाने कार्य करेल याची खात्री नाही. हेच वारंवार घडणार्‍या बिघाडाच्या मुळाशी आहे.
एनपीसीआय ही एक नॉन-प्रॉफिट कंपनी असून अनेक बँक आणि वित्तसंस्थांनी मिळून ती स्थापन केली आहे. परंतु डिजिटल व्यवहारांचे बहुतांश नियंत्रण एका संस्थेकडे असल्यामुळे केंद्रीकरणाची जोखीम निर्माण झाली आहे. सध्या फक्त दोन मोठ्या कंपन्या 90% पेमेंट ट्राफिक हाताळतात. ही बाब कोणत्याही आर्थिक प्रणालीसाठी योग्य मानली जात नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही वर्षांपूर्वी यूपीआयसारख्या व्यवहारांसाठी पर्यायी संस्थांची संकल्पना मांडली होती. पण त्यावर फारशी कृती झालेली नाही. आर्थिक स्थैर्यासाठी धोके कमी करण्याचा मार्ग म्हणजे ते जबाबदारीचे ओझे केवळ एका संस्थेवर न टाकता अनेक संस्थांमध्ये विभागून देणे. स्पर्धात्मक संस्था आल्यास एनपीसीआयचा भार कमी होईल आणि पर्यायाने प्रणाली अधिक स्थिर, पारदर्शक आणि जबाबदार बनेल, हा यामागचा हेतू होता. आता बदलत्या काळात आणि वाढलेला युपीआयचा आलेख पाहता आरबीआयला आता याबाबत अधिक सक्रीय भुमिका बजावावी लागेल.
भारतीय डिजिटल व्यवहारांच्या बहुतांश नियंत्रणात केवळ दोन प्लॅटफॉर्म आहेत – फोन पे (47.25%) आणि गुगल पे (36.04%). मार्च महिन्यातील एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार, केवळ या दोन पेमेंट वॉलेटचे युपीआय व्यवहारांवर 83 टक्क्यांपेक्षा अधिक वर्चस्व आहे. याच्या तुलनेत पेटीएम (6.67%), नवी (1.77%) आघि सुपरमनी (0.94%) हे फारच कमी वाटा असणारे खेळाडू आहेत.
2020 साली युपीआय व्यवहारांवर एमडीआर म्हणजेच मर्चंट डिस्काऊंट रेट शून्य टक्के करण्यात आला होता. याचा अर्थ युपीआयद्वारे केल्या जाणार्‍या व्यवहारांवर व्यापार्‍यांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. पण ही मुफ्त सेवा फिनटेक कंपन्यांसाठी आणि बँकांसाठी मोठं आर्थिक ओझं ठरू लागली आहे. कारण व्यापारी व्यवहाराच्या बदल्यात एमडीआर शुल्क बँक किंवा फिनटेक कंपनीला देत होते. याच रकमेतून बँकांंच्या प्रणाली चालतात, सुरक्षेच्या सेवा चालतात. पण युपीआय व्यवहारात याची कमतरता असल्याने, सेवा पुरवठादारांना उत्पन्नाचा कोणताही स्रोतच राहिला नाही.
परिणामी, पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मोठ्या व्यापार्‍यांकडून 0.30% एमडीआर आकारण्याची विनंती केली आहे. कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, 60 दशलक्ष व्यापार्‍यांपैकी 90% व्यापारी (20 लाख टर्नओव्हरच्या आत) मोफत सेवेत येतील. केवळ 5 दशलक्ष ‘मोठ्या व्यापार्‍यांकडून’ नाममात्र एमडीआर आकारला जावा अशी त्यांची शिफारस आहे. या क्षेत्रात नवीन प्लेअर्स येण्यासाठीही एमडीआरबाबतचा विचार गरजेचा आहे. कारण ‘फ्री पेमेंट्स’ ही संकल्पना लोकांना सुखद वाटते, पण सेवा चालवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी पैशांची गरज असते.
भारत आज एक डिजिटल फिनान्स सुपरपॉवर बनण्याच्या वाटेवर आहे, पण त्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी यूपीआयसारख्या प्रणालींच्या मूलभूत स्थैर्याची आणि विश्वासार्हतेची खात्री असावी लागेल. याचबरोबर प्रतिस्पर्धी संस्थांना प्रोत्साहन देऊन, सध्याच्या एकाधिकार व्यवस्थेचा समतोल राखणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.-महेश कोळी, संगणक अभियंता

Check Also

तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …