ब्रिटिश राजवटीत क्रांतिकारकांमुळे सोलापूरने स्वातंत्र्य प्राप्त केल्याचा इतिहास आजही जिवंत आहे. क्रांतिकारक आणि हुतात्म्यांच्या या शहरात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. वस्त्रोद्योगामुळे सोलापूर हे मँचेस्टर म्हणून ओळखले जात होते. कोणत्याही ज्वलंत विषयावर पेटून उठण्याची येथील मानसिकता त्यावेळच्या लोकांमध्ये होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर सोलापूरचे वैभव आणखी वाढण्याऐवजी आता उतरतीला लागले आहे. अलीकडच्या काही वर्षांत सोलापूर आणि परिसरात रस्त्यांचे जाळे तयार झाले. काही नव्या महामार्गांची निर्मिती झाली असली तरी महामार्गांच्या बांधणीवेळी सुरक्षित वाहतुकीकडे केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम आज सोलापुरातील प्रत्येक व्यक्तीला भोगावा लागत आहे. रस्ते मोठे झाले, पण वाहनांची संख्याही कैकपटीने वाढली. रस्त्यांच्या बाजूला अतिक्रमण होऊ नये याकडे लक्ष देणारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. किंबहुना अतिक्रमणधारकांबरोबर संगनमत करुन ते त्या लोकांना फूस देत असल्यामुळेच रस्ते अपघातात कीड्यामुंग्यांसारखे सोलापुरात माणसांचे बळी जात आहेत. सोलापूरच्या नंतर वाढलेल्या विजयपूर व कलबुरगी या दोन शहरांना बाह्यवळण रस्ते (रिंगरोड) झाले. या दोन्ही शहरात अत्याधुनिक विमानतळांची उभारणी झाली. मात्र, चाळीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी बाह्यवळण रस्ते होऊ शकले नाहीत. सध्या हत्तूर ते केगाव आणि हत्तूर ते तांदूळवाडी या दोन मार्गांवर बाह्यवळण रस्त्यांची घोषणा झाली. त्यापैकी केवळ हत्तूर ते केगाव हा एकमेव बाह्यवळण रस्ता झाला. मात्र दुसरा बाह्यवळण मार्ग होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडताना दिसते. रिंगरोड नसल्यामुळे जड वाहतूक शहरी भागातून जाते. सध्या सोलापूर-अक्कलकोट आणि सोलापूर-हैदराबाद हे दोन महामार्ग सोलापूरकरांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. दर दोन दिवसाआड अपघात ठरलेलेच असते. त्यामध्ये कोणाचा तरी एकाचा बळी निश्चित जातो. ज्या भागात अपघात होतो तेव्हा तेथील जनता पेटून उठते, आक्रोश होतो. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि लोकप्रतिनिधींना निवेदन दिले जाते. परंतु, जड वाहतूक शहराबाहेर घालवण्यासाठीच्या उपायाला गती मिळत नाही.
गेल्या महिनाभरात हैदराबाद रस्त्यावर झालेल्या अपघातात किमान पाच-सहा जणांचा मृत्यू झाला. अक्कलकोट रस्त्यावर मल्लिकार्जुन नगरनजीक एका बल्करने पादचारी महिलेला अक्षरश: चिरडले. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. त्या महिलेच्या शरीराचा चेंदामेंदा झाल्याचे पाहून कोणाही व्यक्तीचे हृदय पिळवटणारे होते. समाजमाध्यमातून अपघाताचे छायाचित्र झळकले. त्याचे पडसाद विधानसभेत आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून उमटले. सोलापुरातील हा मृत्यूचा सापळा दूर होण्यासाठी उड्डाणपूल आणि बाह्यवळण मार्ग होण्याची नितांत गरज आहे. दररोजच्या अपघातांमुळे सोलापूरकरांची मने मेली आहेत. ती जागृत झाली तरच हा प्रश्न सुटेल.- जगदीश काळे
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र