एकाच दिवसात किंवा अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या काही दुर्मिळ, मोजक्या घटना आपल्या पाहण्यात असतात. काहीजण या घटना दुर्दैवी मानतात तर काहीजण अशा घटनांमध्ये पती-पत्नीमधील घट्ट बंध शोधतात. अपघातात पती-पत्नीचा मृत्यू होण्याच्या घटना अनेक असतात; परंतु आजारपणामुळं किंवा कधी-कधी तर कोणताही आजार नसताना अशा घटना घडतात. पतीवर अंत्यसंस्कार करून लोक परत येईपर्यंत पत्नीचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणं पाहायला मिळतात. अवघ्या आठवड्याभराच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी चर्चेत आली. या दाम्पत्याची सामाजिक प्रतिष्ठा मोठी असल्यामुळं जगभर या घटनेची चर्चा सुरू आहे. याखेरीज एका दुर्मिळ आजाराशी ती संबंधित असल्यामुळंही संबंधित दाम्पत्य चर्चेत आहे. एकदा नव्हे तर दोन वेळा अॅकॅडमी पुरस्कार जिंकणारे हॉलिवूड अभिनेता जीन हॅकमन आणि त्यांच्या पत्नी बेट्सी अराकावा यांचा मृत्यू जितका दुर्दैवी तितकाच गूढ ठरलाय. या घटनेतील आणखी एक गुंतागुंत अशी, की बेट्सी अराकावा यांचा मृत्यू झाल्याचं जीन हॅकमन यांना ठाऊकसुद्धा नसावं, अशी शक्यता पुढे आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही मृत्यू नैसर्गिक असल्याचं स्पष्ट झालंय. हॅकमन यांचा मृत्यू अल्झायमर आणि हृदयविकार अशा दुहेरी कारणांमुळं, तर पत्नी अराकावा यांचा मृत्यू ‘हंता व्हायरस पल्मोनरी सिन्ड्रोम’ या दुर्मिळ आजारामुळं झाल्याचं वैद्यकीय अधिकार्यांचं मत आहे.
हृदयविकारामुळं हॅकमन यांना पेसमेकर बसवण्यात आला होता. त्यातील पुराव्यांवरून त्यांच्या मृत्यूची नेमकी तारीख डॉक्टरांना समजली. त्याच्या किमान सात ते आठ दिवस आधीच अराकावा यांचा मृत्यू झाला असावा आणि अलझायमर या गुंतागुंतीच्या आजारामुळं हॅकमन यांना त्याची माहितीही नसावी, हे दुर्दैवी वास्तव समोर आल्यावर जग हळहळलं. त्यातच अराकावा यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेला ‘हंता व्हायरस’ हे चिंतेचं कारण ठरलंय. हा एक प्राणघातक असा श्वसनविकार आहे आणि उंदरांच्या विशेषतः उंदरांच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यामुळं तो होतो, असं सांगितलं जातं. ज्या दिवशी अराकावा यांचा मृत्यू झाल्याचं मानलं जातंय, त्याच दिवशी त्यांना घराबाहेर पाहिल्याचं लोक सांगतात. त्या औषधाच्या, किराणा मालाच्या आणि पाळीव प्राण्यांसाठी मिळणार्या वस्तूंच्या दुकानात गेल्या होत्या, अशी माहिती आहे. न्यू मेक्सिकोमधील सांता फे या काउंटीमध्ये हे दाम्पत्य वास्तव्यास होतं. या भागात असंख्य सेलिब्रिटीज राहतात आणि अराकावा या ‘हंता व्हायरस’च्या न्यू मेक्सिकोमधील पहिल्याच बळी ठरल्यामुळं लोक धास्तावले आहेत. विशेष म्हणजे, या दाम्पत्याकडे असणार्या एकूण तीन श्वानांंपैकी एक मृतावस्थेत आढळलाय.
‘हंता व्हायरस’मुळं पल्मोनरी सिंड्रोम आणि रीनल सिंड्रोम असे दोन प्रकारचे आजार होऊ शकतात. 1993 ते 2022 या कालावधीत अमेरिकेत हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोमची अवघी 834 प्रकरणं समोर आली आहेत. यावरून हा आजार किती दुर्मिळ आहे, याची कल्पना येते. न्यू मेक्सिकोमध्ये या आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळले असून, त्यातील 41 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्राण्यांमधून माणसांमध्ये संक्रमित होणारा हा आजार जीवघेणा असल्यामुळं भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे. अराकावा यांच्या मृत्यूमुळं ही भीती वाढणंही स्वाभाविकच!-हिमांशु चौधरी
Check Also
दिलासादायक माघार
केंद्र सरकारने बहुचर्चित ‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र