लेख-समिक्षण

खेळता-खेळता

लहान मुलं बर्‍याच वेळा दारामागं लपून मोठ्यानं ‘भॉ’ करतात आणि आपल्याला किंवा एकमेकांना घाबरवतात. आपल्याला माहीत असलं, तरी आपण घाबरल्याचं सोंग करतो. जेव्हा मुलं एकमेकांना घाबरवण्याचा खेळ खेळतात, तेव्हा बर्‍याचदा ही अनपेक्षित घटना असते. त्यामुळे पोरं खरोखर दचकतात. दचकणारा एखाद्या वेळी चिडतोही. परंतु या दचकण्याचा जास्तीत जास्त परिणाम काय? भांडणं, अबोला वगैरे. परंतु या अत्यंत साध्या खेळाचा शेवट एखाद्या लहानग्याच्या मृत्यूने होणं आपल्याला अतिरंजित वाटतं. आपले अनुभव आपल्याला या घटनेवर विश्वास ठेवू देत नाहीत. परंतु खरोखर अशी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील एटा शहरात नऊ वर्षांचा मुलगा जेवत होता. शेजारच्या खोलीत काही मुलं खेळत होती. जेवणारा मुलगा जेवणाची थाळी हातात घेऊन शेजारच्या खोलीत गेला. अनेक मुलं अशी हिंडत-फिरत जेवतात. पण तो खोलीत जाताच दारामागून एका मुलीने त्याला ‘हू…’ असा जोरात आवाज करून घाबरवलं. त्याच वेळी जेवणारा मुलगा खाली कोसळला. त्या खोलीतल्या मुलांचे आवाज हळूहळू कमी होत गेले. फक्त ‘ती’ मुलगी जागच्या जागी थांबलेली.या शांततेचं कारण समजेना म्हणून मुलाचे आईवडील जेव्हा त्या खोलीत गेले, तेव्हा त्यांना मुलगा जमिनीवर पडलेला दिसला. तो बेशुद्ध पडला असावा, असं वाटून त्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं, परंतु तत्पूर्वीच तो मृत्यू पावला होता.
खेळता-खेळता दचकल्यामुळं थेट हृदयविकाराचा झटका यावा आणि नऊ वर्षांच्या मुलाचा जीव जावा, ही घटना कुणालाच पटणं शक्य नाही. परंतु हृदयविकाराने वयाच्या हद्दी केव्हाच पार केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी चाळीशीतला माणूस हृदयविकाराने अचानक गेला, तरी लोकांचा विश्वास बसत नसे. नंतर पंचविशीतली तरुण पोरांचा मृत्यू हृदयविकाराने होऊ लागले. नंतर किशोरवयीन मुलांना ‘धक्का’ देऊन आता हा विकार लहान मुलांपर्यंत पोहोचलाय. कर्नाटकातील चामराजनगर येथील घटनाही ताजी आहे. अवघ्या आठ वर्षांच्या मुलीने शाळेच्या कॉरिडॉरमधून चालता-चालता जवळच्या बाकड्यावर अंग टाकलं, ते कायमचंच. ही घटना शाळेतल्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आली; परंतु समोर धडधडीत दिसत असूनसुद्धा त्यावर विश्वास ठेवणं अवघड गेलं. खेळता-खेळता मैदानातच कोसळून लहान मुलांचा जीव गेल्याच्या घटनाही वारंवार समोर येत आहेत. ‘व्हेन्ट्रिक्युलर फायब्रिलेशन’ हे अशा घटनांमागील एक कारण वैद्यकीय भाषेत सांगितलं जातं. काही वेळा लहान मुलांच्या हृदयाचे ठोके अचानक थांबतात. त्यामुळं मेंदूसह अन्य अवयवांना होणारा रक्तपुरवठा अचानक बंद होतो. रक्ताच्या कमतरतेमुळं मूल जागच्या जागी कोलमडतं आणि तातडीच्या उपचारांअभावी दगावतं.
अनेकदा हृदयाच्या रचनेत जन्मजात दोष असतात; परंतु ते दिसून येत नाहीत. अशा मृत्यूंमुळं आपण क्षणभर थबकतो, आश्चर्यचकित होतो; पण त्यांची कारणं शोधण्याचा प्रयत्न करत नाही. मानवी शरीर एकंदरीने अधिकाधिक नाजूक बनत चाललंय. पिढ्यांमागून पिढ्या जातील, तसतसं हे नाजूकपण वाढतच चाललंय. त्यातच अत्यंत घातक अशा प्रदूषणाचा सामना लहान वयापासूनच करावा लागतोय. या वयात प्रदूषणाला तोंड देण्याचं बळ शरीरात नसतं. आणखीही अनेक कारणं आहेत. खेळता-खेळता आपल्यातून निघून जाणार्‍या पोरांकडे पाहून तरी या कारणांकडे डोळसपणे पाहायला हवं.-हिमांशु चौधरी

Check Also

दिलासादायक माघार

केंद्र सरकारने बहुचर्चित ‌‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026‌’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …