लेख-समिक्षण

हृदयाचा ठाव घेणार्‍या चित्रपटांची प्रतीक्षा

अ‍ॅनिमल, पुष्पा पहिला आणि दुसरा यासारखे चित्रपट पाहताना डोकं गरगरल्याशिवाय राहत नाही. तरुणाईचे काही प्रमाणात मनोरंजन होत असलेही, परंतु आपण कशासाठी जातो आणि बाहेर काय घेऊन पडलो, याचा थांगपत्ता लागत नाही. हाऊसफुल्लचे बोर्ड काही दिवसापुरती असतात आणि नंतर चॅनेलवर झळकत त्या चित्रपटाती इतिश्री होते. कोठे गेला धर्मेंद्र यांचा दमदार अभिनय, कोठे गेला तो अँग्री यंग मॅनवाला अमिताभ आणि कोठे गेली सौंदर्याने भारावून टाकणारी हेमामालिनी. अलिकडच्या काळात चित्रपटांत कथा, दिग्दर्शन, संगीत सापडत नसल्याने बॉलिवुडच्या निर्मात्यांनी पुनश्च: हरी ओम करण्याची वेळ आली आहे.
बॉलिवुडमध्ये आजकाल अनेक चांगले चित्रपट येत आहेत. तरीही कशाचीतरी उणीव भासत राहते. मग पटकथा असो, संगीत असो, कलाकार असो किंवा दिग्दर्शक. विशेष म्हणजे गल्लाभरू चित्रपट तयार करण्याच्या नादात यासारख्या महत्त्वांच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आजघडीला चित्रपट निर्मितीत स्टारडमचा प्रभाव आहे. कथा, पटकथेऐवजी कलाकारांचाच बोलबाला आहे. त्याच्याच भोवती कथा फिरत राहते. दिग्दर्शक त्याच्याच तालावर नाचत राहतो आणि अन्य पात्र दुय्यम ठरत राहतात. हिंंदी सिनेमाला पुर्नवैभव हवे असेल, सुवर्णकाळ यायचा असेल तर प्रामुख्याने दिग्दर्शनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. शिवाय पटकथा आणि संगीताचा देखील विचार करायला हवा. चित्रपट सुपरडुपर हीट हवा तर चित्रपट निर्मात्यांनी एखाद्या अजेंड्यात अडकून राहण्याऐवजी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे चित्रपट आणले पाहिजेत.
बॉलीवुडमध्ये दशकभरापासून एकप्रकारची पानगळ पाहवयास मिळवत आहे. चित्रपटातील कळीच्या गोष्टींकडे कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी चांगली कलाकृती, भूमिका समोर येताना दिसत नाहीत आणि कलाकारांच्या अभिनयाची ताकदही. वास्तविक बहुतांश चित्रपटांची निर्मिती ही कटिंग पेस्टिंगच्या स्टाईलप्रमाणे होत आहे. या कारणामुळेच संपूर्ण वर्ष निघून जाते अणि बोटावर मोजण्याइतपत चांगल्या चित्रपटांची नावे आठवतात. दुसरीकडे बॉलिवुड अशा पानगळीकडे दुर्लक्ष करत आहे.
चित्रपटाचा कर्णधार दिग्दर्शक असतो. एकेकाळी के. आसिफ, महबुब खान, कमाल अमरोही, हृषिकेश मुखर्जी, यश चोप्रा यासारख्या दिग्दर्शकांचे म्हणणे मोठमोठे कलाकार निमूटपणे ऐकायचे. दिग्दर्शक हवं तसे कलाकारांकडून अभिनय करून घेत असे.एकाच दृष्याचे दहा दहा रिटेक व्हायचे, परंतु कलाकार विनातक्रार दिग्दर्शकांच्या मनातील कलाकृती सादर करण्यासाठी जीवतोडून काम करायचे. आज उलट चित्रपट निर्मितीत स्टारडमचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे चांगले चित्रपट असून नसल्यासारखेच आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला रोहित शेट्टीचा सिंघम रिटर्न्स जोरदार आपटला. याबाबत एका समीक्षकाने रंजक मत मांडले. ‘मी संपूर्ण चित्रपटात केवळ दिग्दर्शकाला शोधत होतो.” हीच गोष्ट आजच्या बहुतांश चित्रपटांना लागू होते. भुलभुलैय्या किंवा स्त्री-2 या सारख्या चित्रपटांत दिग्दर्शकाचा थोडाफार प्रभाव दिसतो, मग तो चित्रपट दर्जेदार का नसेना, परंतु कमाईचा चांगला स्रोत राहू शकतो. अभिजात चित्रपटांसाठी दिग्दर्शकांत कल्पकता असणे गरजेचे आहे. अभिजात चित्रपट म्हटले की, चुपके चुपके(धर्मेंद्र-अमिताभ बच्चन), मासूम (नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी), गोलमाल (अमोल पालेकर-बिंदिया गोस्वामी) यासारख्या चित्रपटांचीं नावे चटकन ओठावर येतात. आजची स्थिती अशी की काल पाहिलेला चित्रपट लक्षात राहत नाही.
पटकथाकारांची स्थिती
एखाद्या दर्जेदार लेखकाचा शोध घ्यायचा असेल तर माध्यम किंवा अन्य क्रिएटिव्ह फिल्डमध्ये जा. तेथे तुमच्या मनानुसार लेखक सहजपणे मिळतात. मात्र या क्षेत्रात चांगल्या लेखकांऐवजी चाटूगिरी करणारे लेखक अधिक येत आहेत. अनेक लेखक-दिग्दर्शक हे अनेक वर्षांपासून चांगल्या पटकथा घेऊन फिरत आहेत, परंतु प्रत्येक बॅनर्सने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. गुलजार, सलीम जावेद यासारख्या मंडळीच्या पटकथांमुळे बॉलीवुडने सुवर्णकाळ अनुभवला हे विसरता येत नाही. अशीच आणखी काही पटकथाकार आहेत. परंतु त्यांची दखल घेतली जातेच असे नाही किंवा तेवढी कुवतही आजच्या निर्मात्यात आहे की नाही, तशी शंका निर्माण होते.
लेखकाच्या वेदना
एका लेखकाने आपली खंत व्यक्त केली. मी सलमान, शाहरुख खानसह अनेक दिग्गज स्टार मंडळींच्या घरांत अनेक महिने हजेरी लावली. अनेकदा बोलले देखील. त्यापैकी अनेकांना माझी पटकथा देखील आवडली. परंतु हाती काहीच लागले नाही. या बाबतीत आमीरखानसारखे काही लोक अपवाद आहेत. अन्यथा शाहरुख खान, सलमान खान, अजय, अक्षयकुमार यासारख्या दिग्गजांभोवती चमचेगिरी करणार्‍यांचा गोतावळा असतो. साहजिकच दुर्लक्ष केल्याने चांगल्या पटकथा कालबाह्य होतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’.
श्रवणीय संगीत गायब
एकेकाळी श्रवणीय संगीत चित्रपटांचा आत्मा असायचा. अनेक नायक आणि नायकांचे करियर गाण्यामुळे घडले आहे. मात्र अलिकडच्या काळात बॉलिवुडमध्ये अभिजात संगीतच गायब झाले आहे. संगीताच्या नावावर काहीही खपविले जात आहे. नुसता गोंगाट आणि धांगडधिंगा दाखविला जात आहे. या गाण्यांचा पटकथेशी काडीमात्र संबध नसतो. गुलजार म्हणतात, चित्रपटातील गाणे हे दृश्यानुसार असायला हवे आणि आज ही प्रत्येक चूक आपल्याला चित्रपटांत दिसून येते.
दक्षिणेचा झटका
ताज्या सर्वेक्षणानुसार, बॉलिवुडमध्ये चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग हा 60 टक्के हिंदी भाषिक आहे. त्याचवेळी दक्षिणेतील चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग हा तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम यासारख्या भाषेत विभागलेला आहे. आता दक्षिणेतील बहुतांश चित्रपट डब होऊन उत्तरेत पाय पसरत आहेत. या काणणांमुळे ते चित्रपटांची निर्मिती करताना सर्व भागातील प्रेक्षकांचा विचार करत आहे. दक्षिणेतील शहरांच्या नावाऐवजी उत्तरेतील शहरांची नावे वापरतात आणि तेथील पार्श्वभूमीही घेत आहेत. दिल्ली, मुंबई याचा विशेषत्वाने उल्लेख दिसतो. उत्तरेत जम बसविण्यासाठी पुष्पा-2 च्या निर्मात्यांनी हिंदीबरोबरच भोजपुरी भाषेतही पुष्पाची एंट्री घडवून आणली. एवढेच नाही तर दक्षिणेतील बहुतांश चित्रपट एखाद्या टीकेत किंवा अजेंडयात अडकून पडण्याऐवजी प्रेक्षकांवर लक्ष केंद्रीत करतात. त्यामुळे कोणाच्याच भावना दुखावल्या जात नाहीत आणि चित्रपटाला दणदणीत यश मिळते.- सोनम परब

Check Also

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …