लेख-समिक्षण

सलाम महानायका…

अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘कल्कि 2098 एडी’ या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची खूप चर्चा झाली. समीक्षकांच्या मते, अमिताभ बच्चन या चित्रपटात नसते तर त्याने बॉक्स ऑफिसवर मान टाकली असती. खरोखरच अमिताभ बच्चन यांना केवळ अभिनेता नाही तर अभिनयाची ‘पाठशाला’ म्हणजे अभिनयाचे उगमस्थान म्हणता येईल. विशेषत: सत्तरी ओलांडल्यानंतरही अमिताभ बच्चन नव्या कलाकारांसमवेत काम करताना अभिनयाची नवनवीन उंची गाठत आहेत. अमिताभ बच्चन यांनी अलिकडच्या काळातील तरुण कलाकारांसमवेत साकारलेल्या भूमिका असोत किंवा ‘उंचाईया’ सारख्या चित्रपटात ज्येष्ठांबरोबरचा अभिनय असो, त्यांचा कसदार अभिनय, प्रतिभा दिवसेंदिवस बहरत चालली आहे, याची साक्ष मिळते.
——-
चित्रपट ‘कल्कि 2098 एडी’ मधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची खूप चर्चा झाली. एवढेच नाही तर अमिताभ बच्चन या चित्रपटात नसते तर त्याने बॉक्स ऑफिसवर मान टाकली असती, असे समीक्षक म्हणत आहेत. खरोखरच अमिताभ बच्चन यांना केवळ अभिनेता नाही तर अभिनयाची ‘पाठशाला’ म्हणजे अभिनयाचे उगमस्थान म्हणता येईल. विशेषत: सत्तरी ओलांडल्यानंतरही अमिताभ बच्चन नव्या कलाकारांसमवेत काम करताना अभिनयाची नवनवीन उंची गाठत आहेत.
अर्थात 1971 मध्ये ‘आनंद’ आणि 1972 मध्ये ‘जंजीर’ मध्येच अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाची ताकद जगाला दाखवून दिली. मात्र ‘जंजीर’चा विजय खन्ना आणि ‘आनंद’चे डॉ. भास्कर बॅनर्जी हे पडद्यावर आपल्या अभिनयाचा करिष्मा दाखविण्यापूर्वीच तत्कालिन बॉलिवुड निर्मात्यांनी त्यांना हायजॅक केले अणि दहा वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत त्यांचा संपूर्ण अभिनय मारधाडपटाच्या कामाला लावला. डॅशिंग, बदला घेणारा, खून्नस दाखविणारा त्याचवेळी प्रेमळ, विनोद करणारा अमिताभ पडद्यावर तळपत राहिला. दुसरीकडे संवेदनशील, भावनिक, तापट, कनवाळू अमिताभ बच्चन पाहण्यासाठी आपल्याला बराच काळ वाट पाहवी लागली.
अभिनयातील आदर्श
शोले, अमर अकबर अथोंनी, चुपके चुपके, शक्ती, सिलसिला, अग्निपथ या सारख्या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाचा कस पाहू शकता. मात्र 2005 मधील हेलन केलर यांच्या जीवनापासून प्रेरित संजय लीला भन्साळी यांचा ‘ब्लॅक’ मध्ये अमिताभ बच्चन यांनी आपल्या अचाट अभिनयाने सर्वांना हुरळून टाकले. एक अंध आणि जिद्दी मुलगी मिशेलचे शिक्षक देबराज सहाय यांच्या रुपातून अमिताभ बच्चन यांना पाहणे आणि त्यांच्या अभिनयाचा अनुभव घेणे याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. या चित्रपटात ते शिक्षक कमी आणि अभियनाचे जादूगार अधिक भासत होते. एक अँग्लो इंडियन जोडपे अंध आणि कर्णबधीर मुलीला एका शिक्षकाकडे सोपवतात. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो शिक्षक सर्व कौशल्य पणाला लावतो. यात अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचा परमोच्च बिंदू पाहवयास मिळतो.
पा आणि ‘पिकू’तील जीवंत पात्र
अमिताभ बच्चन यांचा अभिनय दुसर्‍या इंनिगमध्येही सर्वत्र छाप पाडत आहे. मग ते पात्र कितीही किचकट आणि ओबडधोबड असले तरी. ते पात्र अमिताभ बच्चन यांना द्या आणि संस्मरणीय करा, इतक्या विश्वासाने अमिताभ बच्चन यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. ते संपूर्ण जीव ओतात. आर बाल्की यांचा ‘पा’ या चित्रचपटात ते अभिनयाने नाही तर मेकअपसह वावरण्यात त्यांनी इतिहास घडविला. विद्या बालन अणि अभिषेक बच्चन यांच्यासमवेत काम करताना त्यांनी अशा एका मुलाचा अभिनय केला की त्याचे बायोलॉजिकल वय बारा वर्षाप्रमाणे असते. परंतु प्रोजोरिया आजारपण असल्याने त्यांचे शरीर 70 वर्षाच्या व्यक्तीसारखे असते. अमिताभ बच्चन यांनी हे पात्र साकारताना संपूर्ण अभिनय पणाला लावला होता. दीपिका पदुकोन आणि इरफान खान यांचा ‘पिकू’ मधील सतत अपचनाने त्रस्त असलेल्या बंगाली वडिलाची वठविलेली भूमिका पाहून हॅट्सऑफ करावे वाटते. हा चित्रपट पाहून अनेक बंगाली समीक्षकांनीं कौतुक केलेच त्याचबरोबर एखादा बंगाली कलाकार देखील बंगाली व्यक्तीचे पात्र एवढे जीवंतपणे साकार करेलच की नाही याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली होती.
‘मोहब्बते’तून दुसरे पर्व
अमिताभ बच्चन यांचा आपल्या अभिनयाचा प्रवास अमिताभ बच्चन यांनी कल्कि 2898 चित्रपटापर्यंत दमदार ठेवला.भारदस्त आवाज आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या बळावर ‘बिग बी’ ने या चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारली. अभिनयाची ही तिसरी आणि नवीन इंनिग ‘मोहब्बते’ चित्रपटापासून सुरू झाली, असे मानले जाते. ‘मोहब्बते’मध्ये त्यांनी साकारलेले पात्र यूएसपी बनले होते.
अमर्याद, अखंड अभिनयाचा झरा
शाहरुख खान-सलमान खान याच्या वडिलाचे पात्र साकारायचे असो किंवा ‘सरकार’सारख्या चित्रपटात गंभीर माफीया डॉनची भूमिका करायची असो, कोणत्याही मालिकेत ‘गॉडफादर’सारखी भूमिका करायची असो किंवा हलकाफुलका विनोद असो, अमिताभ या सर्वात फीट बसतात. चित्रपटातील पात्र कसे आहे किवां त्याची भूमिका कशी आहे. या गोष्टीचा ते कधीच विचार करत नाहीत. म्हणूनच डोळ्याची पापणी उघडतानाही जरब दाखविणारा ‘सरकार’चा अमिताभ आणि पिकू चित्रपटातील चिडखोर स्वभावाचा बंगाली बाप यात ते पूर्णपणे उतरलेले दिसतात. अमिताभ बच्चन यांनी अलिकडच्या काळातील तरुण कलाकारांसमवेत साकारलेल्या भूमिका असोत किंवा ‘उंचाईया’ सारख्या चित्रपटात ज्येष्ठांबरोबरचा अभिनय असो, त्यांचा कसदार अभिनय, प्रतिभा दिवसेंदिवस बहरत चालली आहे, याची साक्ष मिळते.
1970 ते आजतागायत असंख्य चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. म्हणूनच गेल्या पाच दशकांपासून बॉलिवूड विश्वावर अमिताभ नावाचे वादळ घोंघावत आहे. आतापर्यंत कितीही नायक आले आणि गेले, हा महानायक मात्र आजही वयाची 75 ओलांडली तरी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. जाहीरात असो, टॉक शो, चित्रपट, सामाजिक उपक्रम असो, हा माणूस सर्वांच्या पुढे असतो. अमिताभ यांची प्रतिभा एवढी प्रचंड आहे की तो एकीकडे आणि दुसरीकडे बॉलिवूड असे चित्र आहे. – सोनम परब

Check Also

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …