लेख-समिक्षण

व्यवस्थापनाचा ‘कुंभ’ रिकामाच!

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीचा प्रकार नवीन नाही. यापूर्वी दिवाळी, छटपूजेच्यावेळी गर्दीचा उच्चांक राहिलेला आहे आणि चेंगराचेंगरीचे प्रकारही घडले आहे. पण त्यावेळी जखमींची संख्या फारशी नसल्याने पुढे फार उपायांची आवश्यकता रेल्वेला वाटली नाही. पण यावेळी कुंभमेळ्याला जाणार्‍या भाविकांनी गर्दीचे उच्चांक मोडले आणि दुर्घटना घडली. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी छटपूजेच्या वेळी देखील अशीच चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वेने छटपूजेच्या काळात रेल्वे स्थानकाच्या बाहेर गर्दी नियंत्रित करण्याची व्यवस्था केली. यावेळी तशी सोय केली नाही. याचा अर्थ आपण जुन्या घटनांमधून कसलाही बोध घेत नाही. ही स्थिती जोवर राहील तोवर निष्पाप नागरिकांचे प्राण जाणे थांबणे शक्य नाही.
यागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामुळे उत्तर भारतातील बहुतांश रेल्वे स्थानकावर भाविकांच्या गर्दीने कळस गाठला आहे. रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात प्रयागराजला रेल्वे सोडण्यात येत असल्या तरी गर्दी पाहता ही संख्या कमीच वाटत आहे. त्यातही प्रशासनाच्या ढिलेपणाचा फटका भाविकांना सहन करावा लागत आहे. नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर घडलेली चेंगराचेंगरीची घटना रेल्वे व्यवस्थापनाच्या त्रुटींवर बोट ठेवणारी आहे. या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. याचे कारण रेल्वेने अचानक फलाट बदलणे की एकाच ठिकाणी गरजेपेक्षा अधिक गर्दी होणे, याबाबत ठोस कळू शकले नाही. पण या गोष्टी तपासानंतर समोर येतीलच. मात्र उत्तर प्रदेशात कुंभमेळा सुरू असताना रेल्वेने अपेक्षेप्रमाणे तयारी केली नसल्याचे दिसून आले आहे. कुंभमेळ्याच्या काळात स्थानकावर येणार्‍या संभाव्य प्रवाशांच्या संख्येचे आकलन करून रेल्वेच्या अधिकार्‍यांनी केलेली व्यवस्था ही मोक्याच्या क्षणी अपुरी पडली. म्हणून महिला आणि मुले गर्दीत दबले गेले आणि ते आपला जीव वाचवू शकले नाहीत.
यापूर्वीच्या घटना
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीचा प्रकार नवीन नाही. यापूर्वी दिवाळी, छटपूजेच्यावेळी गर्दीचा उच्चांक राहिलेला आहे आणि चेंगराचेंगरीचे प्रकारही घडले आहे. पण त्यावेळी जखमींची संख्या फारशी नसल्याने पुढे फार उपायांची आवश्यकता रेल्वेला वाटली नाही. पण यावेळी कुंभमेळ्याला जाणार्‍या भाविकांनी गर्दीचे उच्चांक मोडले आणि दुर्घटना घडली. अर्थात ही गर्दी अचानक उसळलेली नाही. 144 वर्षानंतर होणार्‍या कुंभमेळ्यासाठी प्रवाशांची गर्दी होणार असल्याचे रेल्वेला कल्पना होती. यानुसार गर्दीला हाताळण्यासाठी रेल्वेने उपाययोजना देखील केली. परंतु या घटनेने त्यांच्यातील उणिवा नव्या रुपातून समोर आल्या. एकार्थाने तयारी पुरेशी नसल्याचे स्पष्ट झाले.
वेगळे स्थानक का नाही?
रेल्वेकडून प्रयागराजला जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात रेल्वे सोडण्यात येत आहेत आणि तशी घोषणाही केली जात आहे. गरज भासल्यास आणखी रेल्वे सोडण्यात येतील, असेही म्हटले जात आहे. याप्रमाणे कुंभमेळ्याला जाण्यासाठी राजधानीतील स्थानकावर गर्दी होणे अपेक्षित होते. कारण देशभरातून सर्वाधिक रेल्वेगाड्या राजधानीत येतात आणि उत्तर प्रदेशात जाण्यासाठी नवी दिल्लीतून जाणे सोयीचे असते. अशावेळी राजधानीतील सर्व ठिकाणाहून प्रयागराजला रेल्वे सोडण्याऐवजी वेगळे स्थानक प्रयाजराजागसाठी राखून ठेवता आले नसते का? ही बाब रेल्वे अधिकार्‍यांच्या लक्षात का आली नाही. कारण याच रेल्वेने प्रयागराज येथे तशीच सुविधा केली आहे. प्रयागराज येथे बाहेरून येणार्‍या रेल्वेसाठी दुसरे स्थानक असून कुंभमेळ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दुसर्‍या स्थानकाची व्यवस्था केली आहे. अशीच व्यवस्था दिल्लीत सफदरजंग किंवा अन्य दुसर्‍या स्थानकात करता आली असती. प्रयागराजला जाणार्‍या गाड्या याच स्थानकातून सोडल्या गेल्या असत्या आणि अशा स्थानकावर केवळ प्रयागराजला जाणारेच प्रवासी आले असते.
गर्दीचा अंदाज
याच रेल्वे स्थानकावर अनारक्षित तिकीटाची विक्री केली जात हेाती. तेव्हा अधिकार्‍यांना गर्दीचा अंदाज आला नाही का? गर्दी हाताबाहेर जात असल्याचे त्यांना लक्षात आले नाही का? प्रवाशांची गर्दी अचानकपणे फलाट क्रमांक चौदा आणि पंधरावर उसळलेली नव्हती. स्थानकाच्या प्रवेशद्वारातूनच हे प्रवासी फलाटावर आले होते. अशावेळी स्थानकात येणार्‍या प्रवाशांची संख्या पाहून अधिकार्‍यांना गर्दी उसळत असल्याचे लक्षात आले नाही का?
सीसीटीव्हीची मदत नाही
एवढेच नाही तर प्रत्येक फलाटावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याच्या मदतीने गर्दीचे आकलन करता आले असते आणि त्यानुसार व्यवस्था करायला हवी होती. परंतु अधिकार्‍यांनीं त्याकडे कानाडोळा केला. घटनेच्या वेळी बोटावर मोजण्याइतपत सुरक्षा कर्मचारी होते आणि त्यांना गर्दीला आवर घालता आला नाही. याचाही तपास करायला हवा. घटनेच्या वेळी सीसीटीव्हीचे संचलन करणारा वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता का? कदाचित त्याने गर्दी पाहून तातडीने निर्णय घेतला असता. अर्थात दोन रेल्वे मार्गाच्या मधोमध असलल्या फलाटावर एकावेळी किती प्रवासी असतात, हे अधिकार्‍यांना ठाऊक असेलच असे कारण नाही. पण फलाटाची रचना करताना तेव्हा दोन्ही फलाटावर उभ्या राहणार्‍या रेल्वेच्या एकुण प्रवाशांच्या संख्येचे आकलन असणे क्रमप्राप्त आहे. अशावेळी एकाचवेळी दुप्पट संख्या आल्याने व्यवस्था कोलमडून पडणे स्वाभाविकच आहे.
फलाट का बदलले?
दुसरा चिंताजनक मुद्दा म्हणजे, गर्दी हाताबाहेर गेलेली असताना फलाट बदलल्याची बातमी गर्दीत कशी पसरली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फलाट बदलण्यात आले की नाही हे अद्याप कळालेले नाही. परंतु जर खरच फलाट बदलले असेल तर रेल्वेचा हा मोठा निष्काळजीपणा म्हणावा लागेल. आयुक्त, रेल्वे सुरक्षासह रेल्वेच्या अनेक समित्यांनी वेळोवेळी केलेल्या शिफारशीत फलाट बदलताना पुरेशी काळजी घ्यावी अशी सूचना केलेली आहे. पर्यायच नसेल तरच फलाट बदलावे असे म्हटले आहे. पण आताच्या घटनेतील सत्य चौकशीनंतरच बाहेर येईल. फलाट खरोखरच बदलले की नाही, हे कळेलच. परंतु रेल्वेने अचानक फलाट क्रमाकांत बदल केला असेल तर ती मोठी चूक मानावी लागेल.
धडा का घेतला नाही?
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी छटपूजेच्या वेळी देखील अशीच चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वेने छटपूजेच्या काळात रेल्वे स्थानकाच्या बाहेर गर्दी नियंत्रित करण्याची व्यवस्था केली. यावेळी तशी सोय केली नाही. प्रत्यक्षात स्थानकाच्या बाहेरच्या भागातच गर्दी थांबवायला हवी आणि जी रेल्वे फलाटावर येते, त्याच रेल्वेचे प्रवासी फलाटावर सोडायला हवेत. पण या घटनेनंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मर्यादित प्रमाणात प्रवासी फलाटावर सोडले जात आहेत. अर्थात अशी सुविधा छटपूजेच्या वेळी होते. पण सध्याच्या उपायाला वरातीमागून घोडे, असेच म्हणावे लागेल. आापण जुन्या घटनांमधून कसलाही बोध घेत नाही. ही स्थिती जोवर राहील तोवर निष्पाप नागरिकांचे प्राण जाणे थांबणे शक्य नाही. -कमलेश गिरी

Check Also

तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …