हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहिला तर काही कथा अशा आहेत की त्या काळ बदलला, समाज बदलला, प्रेक्षकांच्या अपेक्षा बदलल्या तरी पुन्हा पुन्हा नव्या रूपात समोर येत राहिल्या. त्यापैकी सर्वाधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकून राहिलेली कथा म्हणजे ‘एक माणूस विरुद्ध व्यवस्था’ ही. ही चित्रपटातील संघर्षाची चौकट सामान्य माणसाच्या मनातील असंतोष, अपेक्षा, न्यायाची आस आणि बदलाची आकांक्षा यांचे कलात्मक प्रतिबिंब आहे. म्हणूनच प्रत्येक पिढीला या कथेत स्वतःचा चेहरा दिसतो आणि प्रत्येक काळ या कथेला नवा अर्थ देत राहतो. – सोनम परब
चित्रपटगृहात पडद्यावर एखादा नायक संपूर्ण व्यवस्थेला आव्हान देताना दिसतो तेव्हा प्रेक्षक त्या पात्रामध्ये स्वतःचे प्रश्न, स्वतःची घुसमट आणि स्वतःची स्वप्ने शोधत असतो. व्यवस्थेतील अन्याय, भ्रष्टाचार, विषमता किंवा असंवेदनशीलता यांविरुद्ध उभा राहणारा नायक अनेकदा लाखो लोकांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करू लागतो. त्यामुळे त्याचा संघर्ष वैयक्तिक न राहता तो सामूहिक अनुभव बनतो. या कथानकाची मुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या सामाजिक वास्तवाशी निगडित काळात आढळतात. त्या काळातील चित्रपटांनी व्यवस्थेतील विसंगतींवर प्रभावी प्रकाश टाकला. गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’ या चित्रपटातील कवी व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तिचा स्वीकार करण्यास नकार देतो. त्याचा हा नकारच त्याचा प्रतिकार ठरतो. ‘गंगा जमुना’मधील संघर्ष सामाजिक अन्यायातून जन्म घेतो, तर ‘मुझे जीने दो’ मध्ये गुन्हेगाराच्या मागे उभे असलेले सामाजिक वास्तव उलगडते. या चित्रपटांनी संघर्षाची बीजे रोवली; आवाज कमी होता, पण आशय अत्यंत प्रभावी होता.
यानंतर आदर्शवाद आणि व्यवस्थेतील संघर्ष अधिक स्पष्ट स्वरूपात समोर आला. ‘सत्यकाम’ हा त्याचा सर्वोत्तम नमुना मानला जातो. प्रामाणिकपणा, नैतिकता आणि तत्त्वनिष्ठा यांवर विश्वास ठेवणारा नायक जेव्हा व्यवहारवादाने व्यापलेल्या व्यवस्थेशी सामना करतो, तेव्हा त्याचा संघर्ष अधिक वेदनादायी ठरतो. येथे लढाई कोणत्याही खलनायकाशी नसते; ती मूल्ये आणि वास्तव यांच्यात असते. या संघर्षातून भारतीय समाजातील आदर्शवादाची मर्यादा आणि त्याचे महत्त्व दोन्ही अधोरेखित झाले.
1970 चे दशक आले आणि या कथेला नवा चेहरा मिळाला. देशातील सामाजिक अस्थिरता, बेरोजगारी, आर्थिक संकटे आणि राजकीय अनिश्चितता यांमुळे सामान्य माणसाच्या मनात साचलेला रोष पडद्यावर झळकू लागला. जंजीर आणि दीवार यांनी या असंतोषाला शब्द दिले. अमिताभ बच्चन यांचा ‘अँग्री यंग मॅन’ हा केवळ चित्रपटातील नायक नव्हता; तो संपूर्ण पिढीच्या निराशा आणि संतापाचा चेहरा बनला होता. या काळातील नायक व्यवस्थेकडे उत्तरांची मागणी करत होता. त्याला नियमांवर विश्वास उरला नव्हता. कारण त्याने नियमांचे अपयश अनुभवले होते. 1980 च्या दशकात ही कथा अधिक परिपक्व झाली. संघर्षाचे स्वरूप मानसिक आणि नैतिक स्तरावरही पोहोचले. ‘आक्रोश’ आणि ‘अर्धसत्य’ यांसारख्या चित्रपटांनी व्यवस्थेची गुंतागुंत उलगडली. येथे सत्ताकेंद्रे, सामाजिक संरचना, संस्थात्मक मर्यादा आणि स्वतःच्या कमकुवतपणाशी लढणारा मनुष्य होता. विजयापेक्षा सत्याचा शोध अधिक महत्त्वाचा ठरला. त्यामुळे या चित्रपटांनी प्रेक्षकांना विचार करायलाही भाग पाडले.
1990 च्या दशकात पुन्हा एकदा संघर्षाचा स्वर अधिक आक्रमक झाला. उदारीकरणाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारतात भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि संस्थात्मक अपयश यांवर तीव्र टीका करणारे चित्रपट समोर आले. ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘क्रांतिवीर’ यांमधील नायक थेट व्यवस्थेशी भिडताना दिसला. त्याच्या आवाजात संताप तर होताच; पण त्यामागे न्यायाची मागणीही होती. त्यामुळे हे चित्रपट लोकप्रिय ठरले आणि त्यांनी व्यापक सामाजिक चर्चेलाही चालना दिली.
नव्या शतकात या कथानकाचा आवाका आणखी वाढला. ‘गंगाजल’, ‘अ वेनस्डे’ सारख्या चित्रपटांनी संघर्षाच्या नैतिक प्रश्नांवर भर दिला. नायक कधी व्यवस्थेच्या आत राहून लढतो, तर कधी तिच्या बाहेर उभा राहून. योग्य आणि अयोग्य यांतील सीमा अधिक धूसर होत जाते. न्यायासाठी केलेल्या कृतींची किंमत काय असते, हा प्रश्नही या चित्रपटांनी उपस्थित केला.
अलिकडच्या काळात ‘व्यवस्था’ या संकल्पनेचा अर्थ अधिक व्यापक झाला आहे. भ्रष्टाचार किंवा प्रशासकीय अकार्यक्षमता यापलीकडे जाऊन सामाजिक विषमता, जातीय अन्याय, लिंगभेद आणि पूर्वग्रह यांचाही त्यात समावेश झाला. आर्टिकल 15, जय भीम, पिंक आणि मुल्क यांसारख्या चित्रपटांनी समाजाच्या खोल स्तरांवरील अन्याय समोर आणला. येथे संघर्ष सत्तेबरोबरच विचारसरणी, सामाजिक मानसिकता आणि ऐतिहासिक विषमता यांच्याविरुद्ध आहे.
बहुतांश वेळा चित्रपटांमध्ये शेवटी नायक जिंकतो, व्यवस्था झुकते आणि न्यायाचा विजय होतो. यातील वास्तव मात्र अधिक गुंतागुंतीचे आहे. बदल संथ असतो, संघर्ष दीर्घकाळ चालतो आणि कोणत्याही एका व्यक्तीमुळे संपूर्ण व्यवस्था बदलत नाही. तरीही ही कथा लोकांना आकर्षित करते, कारण ती आशेचा धागा जिवंत ठेवते. सामान्य माणसाच्या मनात ‘बदल शक्य आहे,’ ’न्याय मिळू शकतो’ आणि ‘अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याला अर्थ आहे,’ हा विश्वास ती रुजवते. याच कारणामुळे ‘एक माणूस विरुद्ध व्यवस्था’ ही कथा आजही तितकीच सुसंगत वाटते. काळ बदलतो, प्रश्न बदलतात, व्यवस्थेची रूपे बदलतात; परंतु अन्यायासमोर उभा राहणारा, प्रश्न विचारणारा आणि हार न मानणारा माणूस कायम मनात घर करुन राहतो. भारतीय चित्रपटसृष्टीने या संघर्षाला अनेक रंग दिले, अनेक चेहरे दिले आणि अनेक अर्थ दिले. परंतु त्याचा केंद्रबिंदू एकच राहिला, तो म्हणजे व्यवस्थेपेक्षा मोठी असते ती न्यायाची आकांक्षा आणि त्या आकांक्षेला जिवंत ठेवणारा सामान्य माणूस.
बदलत्या काळानुसार ‘नायक’ या संकल्पनेत परिवर्तन होत गेले. पूर्वीचा नायक शारीरिक ताकदीच्या बळावर अन्यायाविरुद्ध उभा राहत असे; परंतु आजचा नायक अनेकदा बुद्धिमत्ता, माहिती, कायदा किंवा सामाजिक जागरूकतेच्या आधारे संघर्ष करतो. डिजिटल युगात माहिती हेच नवे शस्त्र बनले आहे. त्यामुळे आधुनिक चित्रपटांमध्ये एखादा पत्रकार, पोलीस अधिकारी, वकील किंवा सामान्य नागरिकही व्यवस्थेविरुद्धच्या लढाईचा केंद्रबिंदू बनताना दिसतो. यावरून समाजातील सत्ताकेंद्रे बदलत असल्याचे आणि संघर्षाची साधनेही अधिक वैविध्यपूर्ण होत असल्याचे स्पष्ट होते.
या कथाप्रकाराच्या लोकप्रियतेमागे भारतीय समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमीही तितकीच महत्त्वाची आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून सामाजिक सुधारणांच्या चळवळींपर्यंत भारतीय जनमानसाने अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना नेहमीच आदर दिला आहे. त्यामुळे पडद्यावरील नायक हा केवळ काल्पनिक पात्र राहत नाही; तो प्रेक्षकांच्या सांस्कृतिक स्मृतींचा भाग बनतो. त्याच्यात त्यांना कधी स्वातंत्र्यसैनिक दिसतो, कधी समाजसुधारक, तर कधी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध झगडणारा सामान्य नागरिक. म्हणूनच अशा कथा मनोरंजनापलीकडे जाऊन सामाजिक भावनांशी जोडल्या जातात.
विशेष म्हणजे, या चित्रपटांनी व्यवस्थेवर टीका केली करतानाच अनेकदा समाजालाही आरसा दाखवला आहे. व्यवस्थेतील दोष निर्माण होण्यामागे सामाजिक उदासीनता, मौन आणि तडजोडींची मानसिकताही असते यावर या चित्रपटांनी मार्मिक भाष्य केले. अनेक चित्रपटांमध्ये नायकाच्या संघर्षापेक्षा समाजाची निष्क्रियता अधिक अस्वस्थ करणारी वाटते. यामुळे प्रेक्षकांना आत्मपरीक्षणाची संधीही मिळते.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता, सामाजिक माध्यमे, माहितीचे केंद्रीकरण आणि नव्या प्रकारच्या सत्ताकेंद्रांच्या युगात ही कथा आणखी नव्या रूपात समोर येण्याची शक्यता आहे. भविष्यातील चित्रपटांमध्ये संघर्ष भ्रष्ट अधिकाऱ्यांशी किंवा गुन्हेगारी टोळ्यांशी नसून माहितीच्या नियंत्रणाशी, वैयक्तिक स्वातंत्र्यावरील मर्यादांशी किंवा तंत्रज्ञानाच्या गैरवापराशी असू शकतो. मात्र कथानकाचा गाभा बदलणार नाही. कारण प्रत्येक काळात समाजाला अशा व्यक्तीची गरज असते जी प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवते. म्हणूनच ‘एक माणूस विरुद्ध व्यवस्था’ ही कथा केवळ समाजाच्या सामूहिक मनोविश्वाचा अविभाज्य भाग बनली आहे.
Check Also
रणवीर-फरहान वादात सलमानची मध्यस्थी
‘डॉन 3’ चित्रपटावरून अभिनेता रणवीर सिंग आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यात निर्माण झालेला वाद …
पांचजन्य वृत्तपत्र