लेख-समिक्षण

भारताकडे येणाऱ्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला

इराण आणि अमेरिकेतील युद्ध भडकलेले असतानाच, बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या थायलंडच्या एका मालवाहू जहाजासह तीन जहाजांवर पुन्हा हल्ले झाले. या हल्ल्‌‍यामुळे एका जहाजाला भीषण आग लागली असून, जहाजावरील खलाशांना वाचवण्यासाठी तातडीने बचाव मोहीम राबवण्यात आली आहे, असे वृत्त ‌‘एएफपी‌’ने दिले. या व्यापारी जहाजावरील दोन भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक भारतीय बेपत्ता आहे. हा हल्ला इराणने केला असल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडमध्ये नोंदणीकृत असलेले ‌‘मयुरी नारी‌’ हे महाकाय जहाज संयुक्त अरब अमिरातीमधील खलिफा बंदराहून गुजरातच्या कांडला बंदराकडे निघाले होते. होर्मुझच्या अरुंद सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना अज्ञात क्षेपणास्त्राने भारताकडे येणाऱ्या या मालवाहू जहाजाला क्षेपणास्त्राने लक्ष्य केले. या हल्ल्‌‍याचा नेमका तपशील आणि कारणांचा सध्या तपास केला जात आहे, असे थाई नौदलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वांत महत्त्वाची मार्गिका मानली जाते, जिथून जगातील एकूण खनिज तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के वाहतूक होते.
हल्ल्‌‍यानंतर जहाजात आग लागली, ज्यामुळे क्रू मेंबर्सना लाईफबोट्समध्ये जहाज सोडून जावे लागले. हल्ल्‌‍याची माहिती मिळताच ओमानच्या नौदलाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 20 खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, बेपत्ता असलेल्या तीन खलाशांचा शोध घेतला जात आहे. 23 क्रू मेंबर्स होते, त्यापैकी तीन जहाजावर होते. त्यापैकी दोन भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक भारतीय बेपत्ता आहे. रॉयल थाई नेव्हीने पुष्टी केली की सुटका केलेले क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत आणि त्यांना थायलंडला परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे. जहाजावरील आग आता नियंत्रणात आली असली तरी, नुकसानीचा नेमका अंदाज अद्याप आलेला नाही. हल्ल्‌‍यानंतर जहाजाच्या मुख्य भागातून आणि वरील संरचनेतून धुराचे लोट बाहेर येताना दिसले. नौदलाने जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये, जहाजाला आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी खलाशी लाइफ राफ्टच्या साहाय्याने समुद्रात उतरतले. हे जहाज 178 मीटर लांब असून सुमारे 30,000 टन क्षमतेचे आहे. ‌‘प्रेशियस शिपिंग‌’ या थाई वाहतूक कंपनीच्या मालकीचे हे जहाज आहे.
दरम्यान, इराणने आखाती अरब राष्ट्रे आणि व्यावसायिक जहाजांना लक्ष्य केल्यामुळे या भागातील तणाव कमालीचा वाढला आहे. इराणने आपल्या तेल निर्यात करणाऱ्या शेजारील देशांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. यामुळे ‌‘हॉर्मुझची सामुद्रधुनी‌’ मधील जहाजांच्या वाहतुकीला धोका निर्माण झाला असून जागतिक ऊर्जा अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. युनायटेड किंगडम मरीन ट्रेड ऑपरेशन्स (यूकेएमटीओ) ने यापूर्वीच ओमानच्या उत्तरेला 11 नॉटिकल मैलांवर एका जहाजावर हल्ला झाल्याचा अहवाल दिला होता. या पार्श्वभूमीवर, या भागातून प्रवास करणाऱ्या सर्व जहाजांना खबरदारी घेण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

बच्चू कडू यांची ‌‘प्रहार‌’ इतिहासजमा

विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती …