बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. हे एन्काउंटर आता वादग्रस्त ठरले असून कोर्टानेही यावरून ताशेरे ओढले आहेत. एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रमच संशयाच्या भोवर्यात अडकला आहे. एवढंच नव्हे तर हे एन्काउंटर असूच शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयात याचिका दाखल झाली असताना अक्षय शिंदे चकमक प्रकरणाच्या तपासाला गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) वेग दिला आहे. सीआयडीचे अधिकारी चौकशीसाठी मुंब्रा पोलीस ठाण्यात आले होते. दिवसभर हे अधिकारी पोलीस ठाण्यात होते.
बदलापूरमधील एका शाळेत दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास रस्त्यावर पोलिस वाहनामध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये मृत्यू झाला होता. तर, सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांचे पिस्तुल खेचत अक्षयने या पिस्तूलामधून केलेल्या गोळीबारात मोरे जखमी झाले आहेत. चकमकीच्या या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून पोलिसांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा अक्षयविरुद्ध मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर, अक्षयच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या संपूर्ण घटनेचा तपास सीआयडीकडून केला जात आहे.
दरम्यान अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी अक्षयच्या वडिलांनी पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली. त्यावर खंडपीठाने म्हटले की, हे एन्काउंटर असू शकत नाही. त्याने जेव्हा हातात पिस्तुल घेऊन कोणावर रोखली तेव्हा इतर अधिकार्यांनी त्याला रोखले का नाही. तो फार स्ट्राँग माणूस नव्हता. त्यामुळे हे स्वीकारणं कठीण आहे. हे एन्काऊंटर असू शकत नाही, असेही न्यायमूर्ती म्हणाले. घटनाक्रम व तपशील पाहिल्यानंतर अशा अनेक बाबी दिसत आहेत, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यामुळे लोकांनी शंका उपस्थित करू नयेत म्हणून या प्रकरणात पोलिसांचा संबंध असला, तरी पूर्णपणे निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने तपास करावा, असे निर्देशही न्यायालयाने सीआयडीला दिले आहेत. पोलीस वाहनातून आरोपीला घेऊन जात असताना चार पोलीस अधिकार्यांची गरज काय होती? यासाठी अतिरिक्त माणसांचा वापर झाला असे वाटत नाही का?, असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. तसेच, त्याने हातातून पिस्तुल खेचून घेतली तेव्हा चार पोलीस अधिकार्यांनी त्याला रोखायला हवे होते. चार पोलिसांना तो आवरता आला नाही का?, असाही प्रश्न न्यायालयाने विचारला.
अक्षयने तीन गोळ्या झाडल्या असे तुम्ही म्हणालात. एक गोळी पोलिसाला लागली. मग इतर दोन गोळ्या कुठे आहेत? आपण स्वसंरक्षणाकरता असा परिस्थिती पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचे प्रशिक्षण पोलिसांना दिलं जाते. त्याने यापूर्वी कधी शस्त्र वापरली आहेत का? जर त्याने पिस्तुल लोड केली असे तुम्ही म्हणत असाल तर त्याने याआधी शस्त्र वापरली असतील, असेही न्यायमूर्तींनी विचारलं. त्यावर सरकारी वकील म्हणाले की, त्याने पिस्तुल लोड केली नाही. झटापटीत पिस्तुल लोड झाली होती. त्याने याआधी कधीही शस्त्रे वापरली नाहीत. गंभीर गुन्हा असलेल्या माणसाला घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला. याबाबत नियमावली काय आहे? त्याच्या हाताला बेड्या होत्या का? असा सवालही न्यायमूर्तींनी विचारला. त्यावर सरकारी वकील वेनेगावकर म्हणाले, त्याच्या हाताला बेड्या होत्या. पण त्याने पाणी मागितले.
दरम्यान, बुधवारी सकाळी कागदपत्रांच्या संदर्भात सीआयडीचे अधिकारी मुंब्रा पोलिस ठाण्यात आले होते. संध्याकाळपर्यंत हे अधिकारी पोलिस ठाण्यात होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या अधिकार्यांमध्ये पोलीस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या अधिकार्ययांनी नेमकी काय चौकशी केली याचा तपशील कळू शकला नाही.
अक्षयच्या आई वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तर अक्षयच्या मृतदेहाचं दहन केलं जाणार नाही तर अक्षयचा मृतदेह पुरला जाणार अशी माहिती त्याच्या वडिलांनी या प्रकरणात दिलेले वकील अमित कटारनवरे यांनी दिली आहे. ङ्गपुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यात येणार आहे. अक्षयच्या मृतदेहाचं दहन होणार नाही. भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. मात्र अक्षय शिंदेच्या आई वडिलांना त्याचा मृतदेह पुरण्यासाठीही जागा मिळालेली नाही. मुलाला न्याय मिळवून द्यायचा अशी कुटुंबाची भावना आहे. कुटुंबाचीच ही भावना आहे की अक्षयचा मृतदेह पुरला जावा. त्यामुळे मृतदेहाचं दहन न होता तो पुरला जाणार आहे, असे ते म्हणाले.
Check Also
तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …
पांचजन्य वृत्तपत्र