1950 ते 1980 च्या दशकांपर्यंत बहुतांश चित्रपटांवर ग्रामीण भागाचीच छाप राहिली आहे. बैलगाडी, झोपडया, नदी-नाले, शेतीवाडी, पक्ष्यांचे थवे, डोंगर दर्या, पायवाट, ग्रामीण भागातील पेहराव, फेटा, धोतर पायजमा, पारंपरिक उद्योग, ग्रामदेवता या यासारख्या गोष्टी दिसायच्या. सध्याच्या काळात प्रदर्शित होणारे चित्रपट पाहिले तर ते उच्चभ्रु वस्तीचे दर्शन घडविणारे आहेत. पंचतारांकित हॉटेल्स, घरे, परदेशातील लोकेशन, समुद्रकिनारे, कॉर्पोरेट ऑफिस, महागड्या गाड्या, मेट्रो, विमान, एकमेकांवर कुरघोडी करणार्या कॉर्पोरेट कंपन्या, महागडे कपडे हे सर्वकाही पाहवयास मिळते. पूर्वीच्या चित्रपटांत हे अपवादात्मक दिसायचे. पण आता गावच पडद्यावरून गायब होताना दिसत आहे.
——–
हिंदी सिनेमाच्या प्रारंभीच्या काळात बहुतांश चित्रपटांतील कथानकांत ग्रामीण पार्श्वभूमी असायची. कालांतराने चित्रपटातून गाव दिसणे कमी झाले आणि त्याची जागा कॉर्पोरेट कल्चरने घेतली. चित्रपटातून गाव हद्दपार होणे आणि ग्रामीण जीवनाशी नाळ तुटण्याचे कारण म्हणजे गल्लाभरू कथानकांना वाढती मागणी आणि प्रेक्षकांची बदललेली अभिरुची याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
गेल्या काही वर्षांतील चित्रपट आठवून पाहा. खेडेगाव कोठे दिसले का? ‘लगान’नंतर कदाचित एखादा चित्रपट असेल की संपूर्ण चित्रपटात गावाचे दर्शन घडले असेल. यानंतर एक चित्रपट ‘पीपली लाइव्ह’ आला होता. परंतु त्यात शेतकर्यांसाठीच्या योजना अधिकार्यांकडून कशा लाटल्या जातात, हे दाखविले होते.
ग्रामीण भागांवरील चित्रपट
1950 ते 1980 च्या दशकांपर्यंत बहुतांश चित्रपटांवर ग्रामीण भागाचीच छाप राहिली आहे. बैलगाडी, झोपडया, नदी-नाले, शेतीवाडी, पक्ष्यांचे थवे, डोंगर दर्या, पायवाट, ग्रामीण भागातील पेहराव, फेटा, धोतर पायजमा, पारंपरिक उद्योग, ग्रामदेवता या यासारख्या गोष्टी दिसायच्या. ‘गाव हमारा, शहर तुम्हारा’, ‘दो बीघा जमीन’, ‘एक गाव की कहानी’, मनोजकुमार यांचा ‘उपकार’, ‘मेरा गाव मेरा देश’ यासारख्या चित्रपटांना या श्रेणीत ठेवता येईल. 1980 च्या गोविंद निहलानी यांनी गावावर केंद्रीत ‘आक्रोश’ चित्रपट काढला. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. या चित्रपटाचे कथानक लहनिया भीकू नावाच्या एका शेतकर्यावर बेतलेले आहे. तो जमीनदाराच्या अत्याचाराला वैतागलेला असतो. त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार होतो,पण तुरुंगात जावे लागते लहनियाला. पत्नी आत्महत्या करते. पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी त्याला तुरुंगातून बाहेर काढले जाते. पण अंत्यसंस्काराच्या वेळी सामूहिक बलात्कार करणारे लोक त्याच्या बहिणीकडे वाईट नजरेने पाहतात. यावर लहनिया चिडतो आणि जवळच असलेल्या कुर्हाडीने त्यांच्यावर घाव घालतो. हे कथानक होते गावातील दु:ख आणि वेदना सांगणारे. या काळात दरोडेखोरांच्या जीवनावर आधारित देखील चित्रपट झळकले होते. त्यातही गाव दिसायचे, अत्याचार व्हायचे आणि दरोडेखोर होण्यामागचे कारणही सांगितले जायचे.
‘शोले’मधील पात्रांत हरवले गाव
बॉलिवुडच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटात ‘शोले’ची गणना होते. हा चित्रपट रामगड नावाच्या गावाभोवती फिरतो. वास्तविक हे गाव चित्रपटात असून नसल्यासारखे होते. दरोडेखोर गब्बरसिंह, ठाकूर बलदेव सिंह यांच्या संघर्षात आणि अन्य पात्रांत हे गाव फारसे दिसले नाही. चित्रपटातील गाण्यातही गावची झलक पाहवयास मिळाली नाही. या चित्रपटात लोकगीतही नव्हते. गब्बर सिह हा आपल्या अड्डयावर अरबी धुनमधील ‘मेहबुबा मेहबुबा’ गाणे ऐकतो. म्हणजे या चित्रपटात गाव होते, परंतु ग्रामीण बाजचा अभाव होता.
गावाचे रुपडे बदलतेय
सध्याच्या काळात प्रदर्शित होणारे चित्रपट पाहिले तर ते उच्चभ्रु वस्तीचे दर्शन घडविणारे आहेत. पंचतारांकित हॉटेल्स, घरे, परदेशातील लोकेशन, समुद्रकिनारे, कॉर्पोरेट ऑफिस, महागड्या गाड्या, मेट्रो, विमान, एकमेकांवर कुरघोडी करणार्या कॉर्पोरेट कंपन्या, महागडे कपडे हे सर्वकाही पाहवयास मिळते. पूर्वीच्या चित्रपटांत हे अपवादात्मक दिसायचे. पण आता गावच पडद्यावरून गायब होताना दिसत आहे. यामागचे कारण आजचा प्रेक्षकवर्ग. यापैकी असंख्य लोकांनी गावचे दर्शनही घेतलेले नाही. अशावेळी त्यांना गाव कसे आवडेल. दुसरीकडे गाव देखील पूर्वीसारखे कोठे राहिले. गाव अणि शहर यांच्यातील अंतर कमी होत आहे. तसेच गावात राहणार्या लोकांचे राहणीमान देखील बदलत चालले आहे. प्रामुख्याने नव्या पिढीतील मुलांना शहराप्रमाणेच राहणीमान हवे असते. त्यांच्या राहण्यात, वागण्यात, आहार विहारात बदल झाला आहे. अशावेळी पडद्यावर ग्रामीण भाग दिसणार कसा?
व्यवसायाचा प्रभाव
गावातील राहणीमान आणि परंपरा दाखविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजश्री प्रॉडक्शनने आता मोठ्या कुटुंबावर आधारित मल्टीस्टार चित्रपटांची निर्मिती सुरू केली आहे. एकेकाळी ‘नदिया के पार’, ‘बालिका वधू’, ‘गीत गाता चल’ यासारख्या सदाबहार चित्रपटांची निर्मिती राजश्री प्रॉडक्शनने केली. परंतु या प्रॉडक्शन हाऊसने देखील शहराकडे वाटचाल केली आहे. मुळ मुद्दा व्यवहाराचा आहे. बॉक्स ऑफिसच्या कमाईसाठी सुरू असलेल्या जीवघेण्या स्पर्धेत निर्मात्यांना सर्वाधिक गल्ला कमावण्याचे वेध लागले आहेत. म्हणूनच सिनेमाच्या पड्द्यावर ग्रामीण भाग धुसर होत आहे आणि लोकगीतेही हरवत आहेत. अर्थात हा ट्रेंड आताच आलेला नाही. 1980 च्या उत्तरार्धात आणि 1990 च्या पूर्वार्धात उतरती कळा लागली. निर्मात्यांना गावची विहीर दाखविण्याऐवजी स्विमिंग पूल दाखविणे अधिक फायद्याचे वाटू लागले.
प्रेक्षकांच्या आवडीनुसार निर्मिती
आजच्या काळातील प्रेक्षक हे पडद्यावर ग्रामीण भाग कमी शहरी अधिक आणि देश कमी तर परदेश अधिक पाहणे पसंत करत आहेत. पडद्यावरून खेडेगाव गायब झाल्याने ग्रामीण जनजीव लोकांच्या विस्मरणात गेले आहे. गावात असणारी आपुलकी, प्रेम, साधेभोळेपणा, जिव्हाळा, कष्ट, आदरभाव, लोकसंगीत या गोष्टी बाजूला पडत गेल्या. आजच्या बहुतांश चित्रपटात काल्पनिक प्रेम, धिंगामस्ती, मारधाड अधिक दिसते. वास्तविक सिनेमाचा उद्देश केवळ मनोरंजन करण्याचा नसायचा, सिनेमाला समाजाचा आरसा देखील म्हटले जाते आणि या आरशात आहे ते प्रतिबिंब उमटत असते. आज आपल्या देशातील सुमारे 60 टक्के जनता गावात राहाते. तरीही पडद्यावर ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व कमी होत आहे आणि ही बाब चिंताजनक आहे. – सोनम परब
Check Also
गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …
पांचजन्य वृत्तपत्र