लेख-समिक्षण

देवीयों और सज्जनो…

भरपूर मसाला असणार्‍या कौटुंबिक कथानकांवर आणि पौराणिक साहित्यावर आधारीत मालिकांनी प्रदीर्घ काळ छोट्या पडद्यावर राहण्याचा विक्रम केल्याची अनेक उदाहरणे आहेत; परंतु सलग अडीच दशकं टिव्हीवर चालणारा ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसी हा कदाचित एकमेव गेम शो असावा. एखादी मालिका टिव्हीवर सुरू असेपर्यंतच ती प्रेक्षकांच्या ध्यानात राहते. पण केबीसी याला अपवाद ठरले. वर्षांत दोन ते अडीच महिने या कार्यक्रमाचे प्रसारण होते आणि प्रेक्षक मात्र त्याची दहा महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत असतात. ही प्रथा गेल्या पंचवीस वर्षांपासून अविरत सुरू आहे. दरवर्षी त्याची लोकप्रियता वाढतच आहे. प्रारंभी या शोचे संचलन करण्यास बच्चन यांच्या कुटुंबियांनी अटकाव केला होता. सिनेसृष्टीतील महानायक असणारी व्यक्ती एका गेम शोचे अँकरिंग करते, ही बाब तुमच्या लोकप्रियतेला धक्का देणारी ठरू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. परंतु या शोने मिळवलेले यश पाहता अमिताभ यांनी हा भ्रम खोडून काढला.
———-
‘देवींयो और सज्जनो…’ असा आवाज कानावर पडताच महानायक अमिताभ बच्चन यांचा ऐतिहासिक ‘कौन बनेगा करोडपती’ गेम शो पाहण्यासाठी बहुतेक घरांमध्ये टीव्हीसमोर बसण्याची लगबग सुरू होते. केबीसीची सुरुवात 2000 मध्ये झाली आणि पाहता पाहता या कार्यक्रमाने रौप्यमहोत्सवी वर्षात पर्दापण केले. टेलिव्हिजनच्या दुनियेत कौटुंबिक मालिकांनी, पौराणिक मालिकांनी अनेक विक्रम केले आहेत; परंतु सलग अडीच दशकं टिव्हीवर चालणारा केबीसी हा कदाचित एकमेव गेम शो असावा.
केबीसीची रचना मनाचा ठाव घेणारी असल्याने प्रेक्षकांना हा कार्यक्रम खूपच भावला. पण या यशाचे खरे श्रेय अर्थातच बिग बी अमिताभ बच्चन यांना जाते. त्यांनी या गेम शोला दिलेली उंची पाहता त्यांच्या प्रतिभेची प्रचिती येते. पंचवीस वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांनी केबीसीत पर्दापण केले तेव्हा त्यांचा बॅडपॅच सुरू होता. मात्र त्यांना नव्याने स्थीरस्थावर करण्यात केबीसीचा मोठा हात राहिला आहे, हे सत्य नाकारता येत नाही.
एखादी मालिका टिव्हीवर सुरू असेपर्यंतच ती प्रेक्षकांच्या ध्यानात राहते. पण केबीसी याला अपवाद ठरले. वर्षांत दोन ते अडीच महिने या कार्यक्रमाचे प्रसारण होते आणि प्रेक्षक मात्र त्याची दहा महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत असतात. ही प्रथा गेल्या पंचवीस वर्षांपासून अविरत सुरू आहे. दरवर्षी त्याची लोकप्रियता वाढतच आहे. हा शो प्रभावी ठरण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची मांडणी आणि सादरीकरण. यातही सर्वात महत्त्वाची कडी म्हणजे अमिताभ बच्चन. एखाद्या गेम शोचे सलग 25 वर्षांपासून प्रसारण होणे आणि त्यापैकी 24 वर्षे एकच समालोचक असणे हा विक्रमच मानला जाईल. मागील काळात एका वर्षी शाहरुख खानने या शोचे नेतृत्व केले, परंतु त्याला अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे वलय तयार करता आले नाही. हॉट सीटवर बसणार्‍या स्पर्धकास अमिताभ बच्चन हे सोळा प्रश्न विचारतात आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला पैसे मिळतात. सुरुवातीला सर्वात मोठी रक्कम ही एक कोटी रुपये होती. कालांतराने ती पाच कोटी आणि आता सात कोटी रुपये झाली आहे.
या गेम शोने अमिताभचे स्टारडम अधिक व्यापक केले. प्रारंभी या शोचे संचलन करण्यास त्यांच्या कुटुंबियांनी अटकाव केला. तुम्हाला जर प्रेक्षकांनी टिव्हीवर पाहिले तर तुमच्या लोकप्रियतेला धक्का पोचू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. परंतु या शोने मिळवलेले यश पाहता अमिताभ यांनी हा भ्रम खोडून काढला. प्रश्नोत्तरे वगळता केबीसीच्या शोमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले. टीआरपी आणि मनोरंजन लक्षात घेता कार्यक्रमाच्या स्वरुपात बदल करण्यात आले. मात्र आजही या गेमचा फोकस हा प्रश्नोत्तरावरच राहिलेला आहे. लाइफ लाइनचे प्रमाण ही कमी जास्त राहिलेले आहे.
गेम शोच्या वेळी अमिताभ बच्चन हे स्पर्धकाच्या मनावर ताण येऊ देत नाहीत. आपल्या आयुष्याशी संबंधित तसेच चित्रपटाचे जुने किस्से सांगत मनातील काही गोष्टी उलगडून सांगतात. त्याचवेळी स्पर्धकाला भावनिक साद घालतात आणि त्यावरच लक्ष केंद्रीत करतात. स्पर्धकाच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष, अडचणी, कामगिरी, आशा, आकांक्षा अशी एक एक बाजू समोर आणतात. स्पर्धकही त्यांच्या मताचा आदर करतो आणि स्वत:चा जीवनपट त्यांच्यासमोर मांडतो. एखादा सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून येतो तेव्हाही अमिताभ या गेमशोचे गांभीर्य टिकवून ठेवतात. केबीसी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना या शोचे चैतन्य अजूनही शाबूत आहे. हॉटसीटपर्यंत येणारी मंडळी मोठमोठी स्वप्न घेऊन येतात आणि परतताना काही ना काही घेऊन जातात. मात्र स्पर्धकांसाठी पैशापेक्षा सर्वात मोठी गोष्ट असते ती बीग बीशी संवाद.
केबीसीची सुरुवात झाली तेव्हा अमिताभ बच्चन यांना खरोखरच एका लाइफलाइनची गरज होती. कारण त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळत होते. एबीसीएल कंपनी तोट्यात गेली होती. मात्र या शोनंतर त्यांची स्थिती सावरली गेली. अमिताभ यांनी फिटनेस सांभाळत या कार्यक्रमाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकांशी संवाद साधण्याचे अमिताभ यांचे कसब वैशिष्टयपूर्ण असून त्यावर त्यांच्या वयाचा कोणताही परिणाम जाणवत नाही. वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या कविता, किस्से आणि अधूनमधून विनोद करण्याची त्यांची शैली प्रेक्षकांवर छाप पाडणारी आहे. फास्टेस्ट फिंगर फर्स्टनंतर जेव्हा स्पर्धक हॉटसीटवर विराजमान होतो, तेव्हा अनेकांची भंबेरी उडते. मात्र बच्चन हे त्यांच्या मनावरचे दडपण सहजपणे दूर करतात आणि आपलेसे करून त्यांना खेळण्यासाठी सज्ज करतात.
आज अडीच दशकांनंतरही हॉटसीटपर्यंत मजल मारणार्‍या स्पर्धकांचे किस्से आश्चर्यकारक असतात. कोणी दोन दशकांपासून केसीबीत येण्यासाठी धडपड करत असतो तर कोणी केबीसी सुरू झाल्यानंतर जन्मलेला असतो.मात्र अमिताभ बच्चन हे हॉटसीटवर बसणार्‍या स्पर्धकाच्या मनात ऊर्जा भरल्याशिवाय राहत नाहीत. फास्टेट फिंगर फर्स्टच्या वेळी प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्यातील ऊर्जा ही थक्क करणारी असते. ज्येष्ठ असूनही बच्चन सेटवर धावत येतात आणि स्पर्धकाला हॉटसीटपर्यंत नेतात, मग सुरू होतो प्रश्नांचा सिलसिला.
पात्र अजरामर केले
अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातील सर्वच पात्रे अजरामर केली. दमदार आवाज, संवादशैली, स्टाईल, भारदस्त उंची या गोष्टी त्यांच्या अभिनयाला चार चांद लावणार्‍या आहेत. ‘शोले’तील जय असो किंवा शराबीमधील विजय. त्यांनी प्रत्येक पात्रात जीव ओतून काम केले आणि लोकांच्या मनावर ही पात्रे कोरली गेली. केबीसीचे नेतृत्व करताना बच्चन यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाचा पूरेपूर वापर केला. कोणत्याही शोचे संचलन करायचे असेल तर बच्चन यांच्या केबीसीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले जाते. शिवाय केबीसीने अनेकांच्या आयुष्यात कायापालट केला. कोणी झोपडीतून आलिशान फ्लॅटमध्ये गेला तर कोणी गंभीर आजारावर उपचार करू शकला, तर कोणी मुलीचा विवाह थाटामाटात लावू शकले. विशेष म्हणजे हॉटसीटवर बसणारा व्यक्ती हा त्याची स्थिती लपवून ठेवत नाही.
कोणत्याही पटकथेशिवाय प्रारंभ
केबीसीचा विचार मांडला तेव्हा केबीसीच्या सादरीकरणासाठी कोणत्याही प्रकारची स्क्रिप्ट, रचना तयार केलेली नव्हती. समालोचक म्हणून अमिताभ हे स्पर्धकाशीं काय बोलतील, कोणते मुद्दे मांडतील याबाबत काहीही तयारी नव्हती. केवळ प्रश्नोत्तराची तयारी झाली होती. पण अमिताभ हे प्रत्येक भागानंतर शोमध्ये बदल करत गेले आणि तो शो अधिकाधिक सजीव झाला. त्यांनी या शो मध्ये एक नवीन भाषा विकसित केली. कंम्प्यूटर महाशय, कंम्प्यूटर जी, लॉक कर दिया जाय, देवी जी, या शब्दांचा भरपूर वापर केला.
अनेक शो आले आणि गेले
पंचवीस वर्षांपूर्वी केबीसीची सुरुवात झाली आणि अल्पावधीतच त्याच्या लोकप्रियतेने कळस गाठला. त्यामुळे त्याची स्पर्धा करण्यासाठी अनेक शो आणले गेले. यात अनुपम खेर आणि मनीषा कोईराला यांचा ’सवाल दस करोड का’ आणि सलमान खानचा ‘दस का दम’. शिवाय गोविंदाने देखील एका गेम शोचे सादरीकरण केले. मात्र केबीसीसमोर त्यांचा निभाव लागला नाही. वास्तविक अमिताभ बच्चन यांचे व्यक्तीमत्त्वच एवढे जबरस्त आहे की त्याच्यापुढे सर्वच जण फिके पडू लागतात. त्याची परिणीती म्हणजे केबीसीचे रौप्यमहोत्सवी वर्षांत दमदार पर्दापण.- सोनम परब

Check Also

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …