प्रेम गणपती यांचा जन्म 1973 साली तामिळनाडूतील तूतीकोरिन या खेडेगावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि सहा भावंडे अशी भरपूर मंडळी होती. त्यांनी 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण शक्य झाले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी चेन्नईत 250 रुपयांची नोकरी पत्करली आणि मिळालेली रक्कम घरी पाठवत राहिले.एक दिवस एका परिचिताने प्रेम यांना मुंबईत येऊन 1200 रुपयांच्या नोकरीचे आमिष दाखवले. घरच्यांची परवानगी न घेता ते त्या व्यक्तीबरोबर मुंबईसाठी निघाले. पण जेव्हा ते वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी मुंबईच्या बांद्रा स्टेशनवर उतरले, तेव्हा तो परिचित त्यांच्या हातातील 2000 रुपये घेऊन पसार झाला. परत गावी जाण्यास पैसे नव्हते आणि ओळखीचं कोणीच नव्हतं. त्यामुळे प्रेम यांनी मुंबईतच थांबून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.
दुसर्याच दिवशी त्यांना माहिममधील एका बेकरीमध्ये भांडी धुण्याची नोकरी मिळाली महिना 150 रुपये पगार. पुढील दोन वर्षे त्यांनी काही हॉटेलांत काम करत अनुभव घेतला. 1992 मध्ये त्यांनी एक लहानसा स्टॉल सुरू केला. फक्त 1000 रुपयांत भांडी, स्टोव्ह आणि डोसा बनवायचं साहित्य घेऊन त्यांनी वाशी रेल्वे स्टेशनबाहेर इडली-डोसा विकायला सुरुवात केली. त्यांचे डोसे लोकांना चविष्ट वाटू लागले आणि त्यांच्या व्यवसायाने वेग पकडला. काही महिन्यांतच त्यांना दरमहा 20 हजार रुपये उत्पन्न मिळू लागले.
1997 मध्ये त्यांनी 5000 रुपये भाड्याने एक छोटे दुकान घेतले. दोन कामगार ठेवले. या दुकानाचे नाव ठेवलं ‘प्रेम सागर डोसा प्लाझा’. त्यांच्या दुकानात अनेक विद्यार्थी येत असत. प्रेम यांनी त्यांच्याशी मैत्री करून लॅपटॉप वापरणे शिकलं आणि इंटरनेटवरून विविध डोसा प्रकारांची माहिती गोळा करू लागले. काही काळातच त्यांनी 20 वेगवेगळ्या प्रकारांचे डोसे तयार करून ग्राहकांना देण्यास सुरुवात केली. 2002 पर्यंत ‘डोसा प्लाझा’चे मासिक उत्पन्न 10 लाख रुपयांवर पोहोचले. 2005 पर्यंत त्यांनी 104 डोसा प्रकार विकसित केले आणि ‘डोसा प्लाझा’ नावाने 27 आउटलेट्स सुरू केली. आज त्यांच्या भारतभर 45 आउटलेट्स आहेत आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्येही 5 आउटलेट्स सुरू आहेत.
एका बेकरीतील भांडी धुणार्या तरुणाने केवळ चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एक जागतिक ब्रँड उभा केला. मनात ठाम निर्धार असेल, तर कोणतंही अपयश तुम्हाला थांबवू शकत नाही ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी
तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …
पांचजन्य वृत्तपत्र