नवरात्र, गुढी पाडवा आणि ईद यांसारख्या सणांमुळे निर्माण झालेली सणासुदीची मागणी, वाहनांच्या किमतींवर ऑटोमोबाइल कंपन्यांनी दिलेली सवलत, आगामी काळात दरवाढ होण्याची शक्यता, नव्या मॉडेल्सचे लोकार्पण आणि अधिक दर्जेदार पर्याय उपलब्ध होण्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस वाहनविक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.
मागील आर्थिक वर्षात देशाच्या किरकोळ बाजारांतील प्रवासी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत ग्रामीण भागाच्या सशक्त कामगिरीमुळे भारतातील खेड्यांमध्ये वाढत असलेल्या आर्थिक क्षमतेचे प्रतिबिंब दिसूत येत आहे. भविष्यात देशातील ग्रामीण भाग ऑटोमोबाइल उद्योगाच्या अपेक्षांचे केंद्र ठरू शकेल, अशीही शक्यता निर्माण झाली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, 2024-25 हे वर्ष वाहनविक्रीच्या दृष्टीने लवचिक ठरले असून या कालावधीत प्रवासी वाहने, दुचाकी आणि त्रिचक्री वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. मागील वर्षातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागात झालेली दमदार कामगिरी. दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात ग्रामीण बाजारात 8.39 टक्के वाढ झाली असून, ती शहरी भागातील वाढीपेक्षा (6.77 टक्के) अधिक आहे. प्रवासी वाहनांच्या बाबतीत शहरी भागातील 3.07 टक्क्यांच्या तुलनेत ग्रामीण भागात 7.93 टक्क्यांची वाढ झाली. त्रिचक्री वाहनांच्या विक्रीतही ग्रामीण भागात 8.70 टक्के वाढ झाली, तर शहरी भागात ही वाढ केवळ 0.28 टक्के होती.
तथापि, या कालावधीत व्यावसायिक वाहनांची विक्री घटली आणि ग्रामीण भागात संभाव्यता वाढूनही ट्रॅक्टर विक्रीतही घसरण झाली. खरं तर, मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या तीन आठवड्यांत वाहनांची मागणी मंदावलेली होती, आणि त्यामागे खरमास हे कारण नमूद करण्यात आलं. परंतु नंतर नवरात्र, गुढी पाडवा आणि ईद या सणांमुळे वाढलेली मागणी, कंपन्यांनी दिलेल्या सवलती, लवकरच दरवाढ होण्याची शक्यता, नव्या मॉडेल्सचे सादरीकरण आणि दर्जेदार व्हेरिएंट्स उपलब्ध होणे, या सगळ्यांचा परिणाम म्हणून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात वाहनविक्रीत लक्षणीय वाढ झाली.
ग्रामीण भारतात विविध कारणांमुळे निर्माण झालेली समृद्धी आणि तेथील सुधारलेल्या मूलभूत सुविधा पाहता, वाहन उद्योगात यंदाही ग्रामीण भागातून जास्त मागणी येईल, हे निश्चितपणाने म्हणता येईल. – जगदीश काळे
Check Also
दिलासादायक माघार
केंद्र सरकारने बहुचर्चित ‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र