लेख-समिक्षण

कर्जमाफीवरून आ. बच्चू कडूंचा घरचा आहेर

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधान परिषद सभागृहात दोन सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्यात हा वाद झाला. कर्जमाफीच्या मुद्यावर मंत्री बोलत असताना आ. कडू यांनी त्यांना प्रश्न केला. त्यावरून आ. दरेकर यांनी आक्षेप घेत आ. कडू यांना चागलेच सुनावले. त्यावर आ. कडू यांनी कर्जमाफीतील प्रोत्साहन रक्कम मिळाली नसल्याचे सांगून घरचा आहेर दिला. या वादात शेवटी विधान परिषदेच्या सभापतींना मध्यस्थी करावी लागली.
विधान परिषदेच्या सभागृहात कर्जमाफीच्या मुद्यावरून शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी राज्यमंत्री बाबासाहेब पाटील यांना प्रश्न केला. तुमच्याकडून उत्तरे आली पाहिजेत, परंतु तुम्ही देत नाही, असे दिसून येते असे कडू म्हणाले. त्यावर आ. प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला. प्रश्नोत्तरावेळी असेच झाले आणि आता राज्याचे मंत्री सरकारकडून उत्तर देत असताना मध्येच असे थांबवले. त्यामुळे काही प्रथा परंपरा बिघडायला लागल्यात. वारंवार हे सुरू आहे. त्यामुळे यापुढे हे होणार नाही याची दक्षता सभापतींनी घ्यावी, अशी मागणी दरेकरांनी केली. त्याशिवाय बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात. त्यांचे नेतृत्व करतात मग तुम्हाला उत्तरे पाहिजे की, केवळ दिखावा करायचाय. सरकारच्या मंत्र्यांचे भाषण सुरू असताना अशाप्रकारे अडथळा आणणे हे बरोबर आहे का? असे संतापून आ. दरेकर यांनी विचारले. तेव्हा आ. बच्चू कडू यांनीही मी इथे नवीन आलो नाही, असे ओरडून म्हटले. त्यावर आ. दरेकर यांनी म्हटले की, तुम्ही ओरडू नका, तुमच्या दहापटीने जास्त ओरडतो. तुमच्या स्टाईलने सभागृहाचे कामकाज चालणार नाही. सभागृहाचे कामकाज दादागिरीवर चालणार नाही. ज्यांना हुल द्यायची, त्यांना द्या, असे आक्रमक विधान त्यांनी सभागृहात केले.
सरकारने घोषणा केलेल्या कर्जमाफी योजनेवर आ. बच्चू कडू  यांनी अनेक आक्षेप नोंदवले. तसेच सरकारने योग्य ते बदल करून घ्यावेत, अशी मागणी केली. आ. कडू म्हणाले की, राज्यातील 2017 सालच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना तसेच नवीन योजनांत प्रोत्साहनपर दिली जाणारी रक्कम काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कर्जमाफीत नाव आलेले आहे, पण बँकेत मात्र सरकारने पैसेच दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवे कर्ज भेटत नाहीये. कर्जमाफीची वाट पाहावी लागत आहे. उच्च न्यायालयानेही याबाबत सरकारला पैसे द्यावे लागेल, असे म्हणत त्यांनी कर्जमाफी योजनेवर आक्षेप नोंदावला आहे. आ. कडू यांनी एखाद्या शेतकऱ्यावर दोन लाख कर्ज असेल तर तुम्ही 50 हजार द्यायचे आणि शेतकऱ्याने दीड लाख भरावे, असे होत असेल तर ही एका प्रकारची बँकेची वसुलीच म्हणावी लागेल. या बाबत निर्णय घ्यावा लागेल, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, सभागृहातील वातावरण तापलेले पाहून सभापती प्रा. राम शिंदे यांनी या वादावर मध्यस्थी केली. सभागृहाची शिस्त आणि नियम सगळ्या सदस्यांनी पाळणे गरजेचे आहे. एकमेकांना आपसांत प्रश्न प्रतिप्रश्न करणे, मंत्री उत्तर देताना अर्ध्यावरच बोलणे त्यातून काय साध्य होणार आहे? अनेक चर्चेत सदस्य भाग घेतात. ज्येष्ठ मंत्र्यांनी सुरुवात केली आणि लगेच त्यांना प्रतिप्रश्न विचारणे हे बरोबर नाही. सभागृहात काही सदस्य नवीन आहे. त्यामुळे या सभागृहाची जी काही प्रथा परंपरा आहे. कुणीही उठतेय,  कुणी व्हेलमध्ये येतेय तर कुणी क्रॉस करतेय. त्यामुळे मला कुणावर कारवाई करण्याची वेळ येऊ नये म्हणून याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे सभापती म्हणाले.
दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिंदे यांच्या पक्षातून आमदार बच्चू कडू व नंदूरबारचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात निवडणूक न घेता एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून शिवसेनेच्या कोट्यात असलेल्या या जागेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानपरिषदेचे उपसभापतीपद एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे आहे.
नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे हे पद सध्या रिक्त आहे. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा एकदा शिंदे गटाने विधानपरिषदेत आमदारकी दिली आहे. त्यामुळे आता उपसभापतीपदासाठी पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. याच पावसाळी अधिवेशनात ही निवड केली जाऊ शकते, असे सांगितले जात होते. परंतु आता पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या उपसभापतींची निवड होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.

Check Also

अन्वयार्थ फुटीचा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली ‌’ऑपरेशन टायगर‌’ची चर्चा ही अफवा नव्हती तर, एक …