अयोध्येतील श्र्ीराम मंदिरातील दानपेट्यांमधील देणग्यांच्या रकमेत झालेल्या कथित अपहाराच्या प्रकरणाने देशभरातील कोट्यवधी रामभक्तांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर आणि अनेक पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर उभे राहिलेले श्रीराम मंदिर हे हिंदू समाजाच्या सांस्कृतिक स्मृतीचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे या मंदिराशी संबंधित कोणतीही अनियमितता ही केवळ आर्थिक गैरव्यवहार म्हणून पाहता येत नाही. ती थेट भाविकांच्या विश्वासाशी जोडलेली बाब ठरते. म्हणूनच या प्रकरणाची सुरुवातीपासूनच अत्यंत गांभीर्याने दखल घेतली जाणे अपेक्षित होते. मात्र सुरुवातीला ज्या प्रकारे या आरोपांकडे दुर्लक्ष झाले आणि नंतर हळूहळू तपासाची प्रक्रिया सुरू झाली, त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कोणत्याही मोठ्या मंदिरात दररोज काही देणग्या जमा होत असतात. राममंदिरासारख्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध धार्मिक स्थळी ही रक्कम अधिकच मोठी असणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत आर्थिक व्यवहारांसाठी बहुस्तरीय नियंत्रण, तांत्रिक देखरेख आणि नियमित लेखापरीक्षण यंत्रणा असणे आवश्यक असते. मात्र या प्रकरणात दानपेट्या उघडण्यापासून ते रक्कम मोजण्यापर्यंत आणि ती बँकेत जमा करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी होत्या. सर्वात गंभीर बाब म्हणजे सुरुवातीला या आरोपांचे खंडन करण्यात आले. जर काहीही गैरप्रकार झाला नव्हता, तर नंतर संशयित व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि मालमत्तेचे तपशील कसे समोर आले, हा प्रश्न उपस्थित होतो. आणखी एक चिंताजनक पैलू म्हणजे अधिकृत यंत्रणांपेक्षा राजकीय विरोधकांकडून प्रथम आवाज उठविला गेला. कोणत्याही धार्मिक संस्थेच्या व्यवस्थापनाला स्वतःच्या आर्थिक व्यवहारांबाबत सर्वाधिक जागरूक असणे अपेक्षित असते. परंतु येथे परिस्थिती उलटी दिसली. आरोप सार्वजनिक पातळीवर येईपर्यंत व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. यामुळे दानाच्या पैशांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली अंतर्गत देखरेख कितपत प्रभावी होती, याबाबत शंका निर्माण होणे साहजिक आहे. मंदिरात येणारा प्रत्येक भाविक आपापल्या कुवतीनुसार दान म्हणून काही दक्षिणा अर्पण करतो. काहीजण मोठ्या देणग्या देतात. या प्रत्येक रुपयामागे भावनिक मूल्य असते. त्यामुळे दानाच्या रकमेत झालेली हेराफेरी ही भाविकांच्या श्रद्धेचा विश्वासघात ठरते. धार्मिक संस्थांना समाजाकडून मिळणारा सन्मान टिकवून ठेवण्यासाठी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना पर्याय नाही. असे असूनही विविध राज्यांतील अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये वेळोवेळी दानपेट्यांतील रक्कम, सोने-चांदीच्या दागिन्यांची नोंद किंवा मालमत्तांच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक प्रक्रियांना अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनविणे आवश्यक ठरते. दानपेट्या उघडण्याची प्रक्रिया पूर्णपणे सीसीटीव्ही निरीक्षणाखाली असावी. रक्कम मोजण्याचे काम अनेक स्तरांवरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हावे. प्रत्येक व्यवहाराची डिजिटल नोंद ठेवली जावी. नियमित अंतराने स्वतंत्र लेखापरीक्षण केले जावे आणि त्याचा अहवाल सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून दिला जावा. जगातील अनेक मोठ्या धार्मिक संस्थांनी अशा प्रकारच्या प्रणाली यशस्वीपणे राबविल्या आहेत. श्रद्धा आणि पारदर्शकता यांचा समतोल साधणे अशक्य नाही. – प्रसाद पाटील
Check Also
निर्वाळ्याचा अन्वयार्थ
विशेष मतदार यादी पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया कायदेशीरदृष्टया वैधच आहे, असा निर्वाळा अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिला. …
पांचजन्य वृत्तपत्र