तपपूर्तीचे मूल्यमापन

नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली त्याला 9 जून रोजी दोन वर्षे पूर्ण झाली आणि मोदी यांच्या एकूण पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला बारा वर्षे पूर्ण झाली. सलग बारा वर्षे पंतप्रधानपदाची कारकीर्द पूर्ण करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत. सर्वसाधारणपणे भारतीय संस्कृतीमध्ये बारा वर्षांची तपश्चर्या सर्वमान्य आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीकडे पहावे लागणार आहे. 2014 मध्ये जेव्हा सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांच्या हातात सत्ता आली तेव्हा त्यांच्याकडून देशातील जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या. आज त्यापैकी किती अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत याचा आढावा स्वतः नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांच्या सरकारनेही घेणे गरजेचे आहे. मोदी सत्तेवर आल्यापासूनच भारतातील लोकशाही संस्था संकटात आल्याचा दावा विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात असलेला हा आरोप खोडून काढण्यात नरेंद्र मोदी यांना अद्याप यश आलेले नाही. दिवसागणिक या प्रकारच्या आरोपांची तीव्रता वाढत चालली आहे. मध्यप्रदेशमधील राज्यसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला त्यावरून भारतातील निवडणूक आयोगासह अनेक सरकारी संस्थांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गेल्या बारा वर्षांच्या कालावधीमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने यश मिळवलेच, पण अनेक विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवून सत्तांतरही घडवले. त्यामागे मोदी यांच्या नावाचा करिष्मा होता हे नाकारून चालत नाही. नरेंद्र मोदी यांनी काहीच केले नाही असे विरोधी पक्षांनी म्हटले असले तरी, गेल्या बारा वर्षांमध्ये काही दृश्य असा विकास निश्चितच झालेला दिसतो. देशातील दळणवळणाच्या सोयी असो वा संदेशवहनाचे आधुनिक प्रकार असो, त्यामध्ये भारताने मोठी आघाडी घेतल्याचे दिसते. इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करून यूपीआयसारख्या माध्यमाचा वापर करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश बनला आहे. ‌‘एक देश एक कर‌’ या संकल्पनेतून तयार करण्यात आलेली जीएसटी करप्रणाली आणि नवीन आयकर कायदा हीसुद्धा एक महत्त्वाची घडामोड मानावी लागेल. मोदी यांच्या या बारा वर्षांच्या कालावधीमध्येच जगासह भारत देशालासुद्धा करोना महामारीचा जोरदार फटका बसला होता. पण याच कालावधीतही भारतीय अर्थव्यवस्थेला सुस्थिर करण्यात नरेंद्र मोदी प्रशासनाला यश आले होते. ईडी, सीबीआय, आयकर यासारख्या यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांतील नेत्यांना कारवाईचा बडगा दाखवून भाजपामध्ये आणण्याचे कारस्थानही या बारा वर्षांमध्ये सातत्याने केले गेले. आता देशाचा नेता म्हणून ही बारा वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना देशातील बहुतांशी नागरिकांमध्ये स्वतः विषयी विश्वासाची भावना निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि विरोधी पक्षांच्या व्यासपीठावरून जी सातत्याने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जाते त्याची दखल नरेंद्र मोदी यांना आता घ्यावीच लागेल. – प्रतीक्षा पाटील

Check Also

तमिळनाडूतील राजकीय रंग

तामिळनाडूच्या राजकारणामध्ये सध्या अत्यंत अभूतपूर्व आणि वेगाने घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. प्रसिद्ध अभिनेते …