पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. राज्यात आमदार फुटल्यानंतर आता टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची मागणी केली. या बंडखोर खासदारांनी एनडीएला पाठिंबा देण्याची घोषणाही केली आहे, ज्यामुळे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवण्यात आलेल्या या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या 20 खासदारांमध्ये जादवपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि गायिका सायनी घोष यांचेही नाव समाविष्ट आहे. सायनी घोष या टीएमसीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानल्या जात होत्या, त्यामुळे त्यांचा बंडखोर गटात झालेला सहभाग राजकीय वतुर्ळात आश्चर्य आणि चर्चेचा विषय ठरला आहे. सायनी घोष याआधी बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी गायलेल्या एका गाण्यामुळे प्रचंड वादात सापडल्या होत्या. भाजप नेत्यांनी या गाण्यावरून ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करत जोरदार निशाणा साधला होता. अशा परिस्थितीत आता थेट सायनी घोष यांनीच ममता बॅनर्जी यांची साथ सोडून एनडीएला पाठिंबा देणाऱ्या बंडखोर गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील या मोठ्या राजकीय भूकंपामुळे तृणमूल काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून, या फुटीचा केंद्र सरकारच्या राजकारणावर आणि संसदेतील संख्याबळावर काय परिणाम होतो? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ममता बॅनर्जी गटाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. सुष्मिता देव एकेकाळी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती होत्या. सुष्मिता देव यांच्या राजीनाम्यामुळे हे संकट अधिकच गंभीर झाले आहे. यापूर्वी, तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील दीर्घकाळचे मुख्य प्रतोद सुखेंदू शेखर रॉय यांनीही पक्ष सोडला होता. काही दिवसांपूर्वीच, लोकसभा खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सुष्मिता देव यांचा आसामचे मुख्यमंत्री हिमंता विस्व सरमा यांच्यासोबत एक फोटो पुढे आला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसची पकड ढिली होत आहे. आमदार पक्ष सोडून जात आहेत, खासदार पक्ष सोडून जात आहेत आणि जुने मित्रपक्ष पक्षाकडे पाठ फिरवत आहेत. तीन दशकांपूर्वी, ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षाचे दार नाकारून एक वेगळा मार्ग स्वीकारला होता. आज, तेच दार त्यांना पुन्हा खुणावत आहे. आणि ह्या वेळी, त्या नकार देत नाहीत. 8 जून रोजी, विरोधी आघाडीच्या बैठकीत ममता आणि सोनिया गांधी यांनी एकमेकींना मिठी मारली. हे दृश्य सर्वांनी पाहिले. पण जे दिसले नाही, ते म्हणजे त्या मिठीमागे एक राजकीय संदेश दडलेला होता. दुसऱ्या दिवशी, 9 जून रोजी, ममता स्वतः 10, जनपथ येथे गेल्या आणि त्यांनी सोनिया यांच्याशी बराच वेळ संवाद साधला. त्यानंतर, 10 जून रोजी, ममता यांचे भाचे आणि तृणमूलचे सरचिटणीस, अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. ही भेट दीड तास चालली. अभिषेक यांच्या हातात एक जाड फाईल होती. राजकीय वतुर्ळात असा दावा केला जातो की, त्या फाईलमध्ये विलीनीकरणाचा आराखडा होता. याची पुष्टी झालेली नाही, पण ते नाकारलेही गेलेले नाही. सूत्रांनुसार, सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा आणि अभिषेक यांना सरचिटणीसपदाचा प्रस्ताव दिला. ममता बॅनर्जी यांनी त्यावर विचार करण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितला. मात्र, दुसऱ्याच दिवशी अभिषेकने राहुल गांधींशी संपर्क साधला. या घाईवरून असे दिसते की, ममता बॅनर्जी यांच्याकडे वेळ कमी आहे. अभिषेकने ममता बॅनर्जी यांच्यासाठी राज्यसभेचे सदस्यत्व आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली आहे. राहुल गांधींनी पक्षाला आश्वासन दिले आहे की या प्रस्तावांवर विचार केला जाईल.
Check Also
ये रे ये पावसा…
सुमारे तीन महिन्यांच्या अत्यंत कडक अशा उन्हाळी हंगामानंतर केवळ धरतीच नव्हे तर धरतीवर राहणारे सर्व …
पांचजन्य वृत्तपत्र