लेख-समिक्षण

विचित्र कोंडीत आखाती युद्ध

आखाती युद्धाला 55 दिवस झाले आहेत आणि युद्ध एकाच वेळी शांतता आणि संघर्ष या विचित्र कोंडीत सापडले आहे. विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिमहत्त्वाकांक्षी धोरणामुळे युद्ध संपण्याऐवजी लांबण्याच्या अवस्थेत आले आहे.एकीकडे युद्धबंदी आणि दुसरीकडे इराण आणि अमेरिका दोघांनीही हार्मुज समुद्रधुनीच्या नाकेबंदीसाठी ठोकलेले शड्डू पाहता खरोखरच युद्धबंदी प्रामाणिकपणे किती अमलात आणली जाईल याबद्दल शंका वाटू लागते. इस्लामाबाद येथे शांततेची फेरी किती यशस्वी होते याबद्दल अनेक राजकीय पंडितांना शंका वाटते. मुळात या बोलणीचा आधार पक्का नसून मध्यस्थ पाकिस्तान काही अंतस्थ हेतू समोर ठेवून बोलणीचा घाट घालत आहे. सध्या पश्चिम आशियात वादळापूर्वीची शांतता दिसून येत आहे पुढे काय होईल याविषयी अभ्यासकांना चिंता वाटणे साहजिक आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एकीकडे युद्धबंदीत बेमुदत वाढ करण्यात आली आहे तर दुसरीकडे हार्मुजची नाकेबंदी दोन्ही पक्ष करत आहेत इराणकडून जहाजांना लक्ष बनविले जात आहे, मग प्रत्युत्तर म्हणून अमेरिका ही आपल्या नाविक दलाच्या आधारे नाकेबंदीसाठी पुढे सरसावत आहे. जहाजावरील हल्ल्‌‍यामुळे शांतता मार्गात बाधा उत्पन्न होणे साहजिक आहे. परंतु हे एक दबाव तंत्र आहे असे म्हटले जात आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव निर्माण करण्यासाठी करत असलेले प्रयत्न पाहता मग त्यातून शांतता कशी निर्माण होणार असा प्रश्न पडत आहे. ही सध्याची बेमुदत युद्धबंदी म्हणजे अमेरिकेने आपल्या युद्ध तयारीसाठी घेतलेली विश्र्ांती आहे की काय अशी शंकाही वाटू लागते, कारण डोनाल्ड ट्रम्प टप्प्याटप्प्याने लढाई करत आहेत. आता आखाती युद्ध तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी चर्चेचे नाट्य पुन्हा रंगत आहे. डोंगर पोखरून उंदीर काढावा त्या पद्धतीने या चर्चेतून काही ठोस फलनिष्पत्ती होईल असे वाटत नाही.
राजकीय बुद्धिबळाच्या पटलावर : डोनाल्ड ट्रम्प हे गोल्फ पटू आहेत तसेच ते राजकीय बुद्धिबळ सुद्धा खेळतात त्यांना आता इराणला चेकमेट द्यावयाचे आहे आणि आता पुढील 54 दिवसानंतर त्यांना आखातांमधील राजकीय गोल्फ मध्ये आक्रमक खेळ करून गोल करावयाचा आहे. डोनाल्ड ट्रम्प राजकीय बुद्धिबळाच्या पटलावर एक घर पुढे सरकत आहेत, आणि पुढील टप्प्यात इराणच्या राज्यकर्त्याला त्यांना सत्तेवरून हटवायचे आहे आणि आपल्याला पाहिजे तसा माणूस सिंहासनावर बसवायचा आहे. आणि त्याच्याकडून विपुल असा युरेनियम साठा तेल साठा यावर हुकमत निर्माण करावयाची आहे.
एकीकडे इराणला अन्वस्त्र निर्मितीपासून रोखावयाचे आहे दुसरीकडे त्याच्याकडचा जास्तीत जास्त युरेनियम साठा नियंत्रित करावयाचा आहे किंवा जमले तर त्यावर आपला वर्चस्व निर्माण करून इराणचे शक्ती सामर्थ्य हिरावून घ्यावयाचे आहे. पण इराण सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही तो सुद्धा ट्रम्पला चांगल्या प्रकारे खेळवत आहे आणि युद्ध लांबवत आहे युद्ध लांबवल्यामुळे अमेरिकेचे अर्थकारणावर राजकारणावर परिणाम होऊन ट्रम्प यांना लगाम बसेल असे इराणचे गणित आहे. अमेरिकेच्या युद्धविरामाविषयी इराणला विश्वास वाटत नाही. इराणला असे वाटते की थोडा विश्र्ाम घेऊन पुन्हा अमेरिका आक्रमक बनू शकते तूर्तास अमेरिकेने शांततेचे नाटक केले असले तरीही भविष्यात अमेरिका आक्रमक होऊन इराणला धूळ चारण्याचा प्रयत्न करेल असे भय वाटणे साहजिक आहे.
युद्ध थांबल्यानंतर इराणचे पुनर्वसन कोण करणार हा खरा प्रश्न आहे. आजवर इराणने कृषी उद्योग शिक्षण आरोग्य सामाजिक सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात पायाभूत सुविधा गमावले आहेत. लोकजीवन उध्वस्त झाले आहे हे सुरळीत कसे करावे याचे हा खरा प्रश्न आहे याबाबतीत इराणचा आग्रह असेल की अमेरिकेने झालेले नुकसान भरून देण्यासाठी डॉलरचा ओघ वाढविला पाहिजे. ट्रम्प महोदय मोठे चतुर आहेत त्यांना हे माहित आहे की अमेरिकेला शत्रू पक्ष जर्जर करावयाचे आहे. यापुढे इराणने हिज्बुल किंवा हमास यांना पाठिंबा देऊ नये एवढी इराणची शक्ती दुर्बल किंवा कमजोर करण्यावर अमेरिकेचा भर आहे.
इराणला लगाम आवश्यक : इराणने मागे एकदा भारतीय जहाजावर गोळीबार केला त्याचा काहीही परिणाम झाला नाही आता पुन्हा एक भारतीय जहाज अडविले आहे इराणच्या या वाढत्या कारवाया पाहता त्याला वेळीच लगाम घालण्याची आवश्यकता आहे. पाक सरकारने घडविलेल्या पहिलगाम दहशतवादी हल्ल्‌‍याला एक वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भारत कधीही दहशतवादाला थारा देणार नाही घाबरणार नाही आणि त्याचा पराभव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असे अभिवचन त्यांनी दिले आहे.
भारताची दहशतवाद विरोधी भूमिका ही ठोस सिद्धांतावर आधारलेली आहे. आपली भूमिका पार पाडण्यासाठी भारत आता पूर्वीपेक्षा जास्त बलशाली झाला आहे. पाकिस्तान पेक्षा भारत अधिक सक्रिय आहे, बलशाली आहे आणि शांततेसाठी यथार्थ भूमिका पार पाडू शकतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जर्मनीत केलेल्या निवेदनामध्ये भारत सुद्धा शांतता प्रस्थापनेत मध्यस्ताची भूमिका पार पडू शकेल असे म्हटले आहे. जर्मनी सारख्या युरोपीय देशाशी भारत आणि संरक्षण करार करून युरोपात आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.
समारोप : युद्ध लांबले तर त्याचा प्रतिकूल परिणाम आखाती देशांच्या अर्थकारणावर होऊ शकतो ताज्या माहितीनुसार या देशांचे 15 बिलियन पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. आणि तीन टक्के पासून 14% पर्यंत विविध देशावर विविध प्रकारे प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत, असा परिणाम कमी करण्यासाठी या सर्व आखाती देशाने सावध पवित्रा घेऊन वाटचाल केली पाहिजे.
भावी शांतता प्रस्ताव हा सर्वसमावेशक असावा त्यामध्ये एकांगी असमतोल किंवा अतिशय युक्त किंवा लाजणारी कोणतीही गोष्ट असू नये ज्या ज्या वेळी युद्ध खर्च किंवा शांततेमध्ये अटी लादल्या जातात त्यात्या वेळी कडवट प्रतिक्रिया उद्भवते आणि युद्ध संपण्याऐवजी पुन्हा एकदा हे सर्व जर रोखावायचे असेल तर शांतता प्रस्ताव किती कलमाचा आहे यापेक्षा तो किती सखोल आहे, किती सर्वसमावेशक आहे, आणि शांततेला किती गती देणार आहे यावर त्याचे यश अवलंबून असणार आहे.
शांतता बोलणे दुसऱ्या टप्प्यावर आहे हा दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक धोकादायक वळणाचा आणि अधिक संकटाचा आहे. त्यामुळे अमेरिका इराण आणि मध्यस्थ या तिघांनी सुद्धा शांतता समतोल आणि सामोपचाराचा दृष्टिकोन ठेवून मार्ग काढला पाहिजे. कोण मागे जाणार नाही आम्ही बरोबरच आहोत अशी हेकेखोर आणि आडमुठे भूमिका न घेता दोन्ही देशाने एक एक पाऊल मागे घेऊन शांततेसाठी चर्चा केली, काही समन्वय घडविला तर त्यामुळे केवळ इराणचेच नव्हे तर सबंध जगाचे सुद्धा त्यामुळे फायदे होणार आहेत. आणि तसे झाले तर भविष्यात आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील दोस्त राष्ट्रांनी आता एकत्र येऊन अमेरिकेचे अध्यक्ष महोदयांनी आता शांततेसाठी धावा केला पाहिजे तसे झाले तर भविष्यकाळात शांतता व स्थैर्याची नवी पहाट होऊ शकेल या शंका नाही.- प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

Check Also

‌‘एल निनो‌’ चा ताप

भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याचे सांगत सरासरीच्या 92 टक्के पाऊस …