‘बस्तर फायटर्स’: मातीतील सुपुत्रांचा लढा
बस्तरचा 42 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग केरळ राज्यापेक्षाही मोठा आहे. घनदाट जंगले, डोंगरदऱ्या आणि नद्यांनी व्यापलेल्या या दुर्गम भागात बाहेरील दलांना काम करणे सुरुवातीला अत्यंत आव्हानात्मक होते. यावर उपाय म्हणून आम्ही ‘डीआरजी’ (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) आणि ‘बस्तर फायटर्स’ या दलांची उभारणी केली. यात 100 टक्के स्थानिक तरुणांची भरती करण्यात आली. या जवानांना इथल्या भौगोलिक परिस्थितीची खडान् खडा माहिती आहे, त्यांना स्थानिक गोंडी, हल्बी आणि भतरी बोलीभाषा अवगत आहेत. आपल्याच भागाच्या शांततेसाठी आणि विकासासाठी जेव्हा स्थानिक तरुण बंदूक हातात घेऊन उभे ठाकले, तेव्हा नक्षलवाद्यांचे ‘लोकल नेटवर्क’ उद्ध्वस्त झाले. आमची महिला कमांडो पथकेही यात मागे नव्हती; त्यांच्यामुळे ग्रामीण महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आणि नक्षलवाद्यांचा खोटा प्रचार थांबला.
भारतीय नकाशावर एकेकाळी ‘रेड कॉरिडॉर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंडकारण्यातील परिस्थिती आज पूर्णतः बदलली आहे. 31 मार्च 2026 ही तारीख भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल, कारण याच दिवशी आम्ही नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाचे आमचे ध्येय साध्य केले. जिथे कधी सुरुंगांचे स्फोट आणि माओवाद्यांच्या दहशतीमुळे जनजीवन विस्कळीत व्हायचे, तिथे आज शांतता आणि विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. हा बदल एका रात्रीत घडलेला नाही, तर त्यामागे सुरक्षा दलांचे अतुलनीय शौर्य, अचूक रणनीती आणि स्थानिक जनतेचा वाढता विश्वास या त्रिसूत्रीचे पाठबळ आहे. . समन्वयाचे चक्रव्यूह आणि निर्णायक प्रहार- नक्षलवादाचा खात्मा हे केवळ पोलीस दलाचे यश नसून तो शासनाचा एक दृढ संकल्प होता. आमच्या ऑपरेशनल रणनीतीचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे विविध दलांमधील अभूतपूर्व समन्वय. डीआरजी, एसटीएफ, बस्तर फायटर्स, कोब्रा यांसारख्या विशेष दलांसह सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी या केंद्रीय दलांनी खांद्याला खांदा लावून काम केले. पूर्वी नक्षलवादी आंतरराज्यीय सीमांचा फायदा घेत असत; एका राज्यात ऑपरेशन सुरू झाले की ते दुसऱ्या राज्यात पळून जात. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व नक्षल प्रभावित राज्यांमध्ये असा समन्वय प्रस्थापित केला की नक्षलवाद्यांना लपण्यासाठी कोणतीही जागा शिल्लक राहिली नाही.
या संघर्षातील सर्वात मोठा ‘टर्निन पॉईंट’ मे 2025 मध्ये आला. अबूझमाडच्या दुर्गम जंगलात झालेल्या एका भीषण चकमकीत सीपीआय (माओवादी) संघटनेचा सरचिटणीस बसवराजू याचा मृतदेह जप्त करण्यात आला. संघटनेचा सर्वोच्च नेता मारला गेल्यामुळे नक्षलवाद्यांचे नेतृत्व पूर्णपणे विस्कळीत झाले. त्यानंतर कोरागुट्टा हिल्समध्ये सलग 21 दिवस चाललेल्या ऐतिहासिक ऑपरेशनने नक्षलवाद्यांची शस्त्रास्त्र निर्मितीची फॅक्टरी आणि त्यांचे शेवटचे सुरक्षित आश्र्यस्थान उद्ध्वस्त केले. या मोहिमांमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आणि उरलेले केडर मोठ्या संख्येने शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात सामील होऊ लागले. दहशत ते विश्वासाचा प्रवास- नक्षलवादाचा उगम जरी जल, जंगल आणि जमिनीच्या मुद्द्यावरून झाला असला, तरी कालांतराने ही संघटना केवळ हिंसा आणि दहशतीच्या जोरावर टिकून होती. निष्पाप आदिवासींची हत्या करणे, रस्ते आणि वीज पुरवठा खंडित करणे आणि मुलांची सक्तीने भरती करणे ही त्यांची कार्यपद्धती होती. आम्ही केवळ बंदुकीने उत्तर दिले नाही, तर विकासाच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली. ‘बस्तर ऑलिम्पिक्स’ आणि ‘बस्तर पंडुम’ यांसारख्या मोठ्या उपक्रमांतून आम्ही स्थानिक जनतेशी थेट नाते जोडले. या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवांमुळे पोलीस आणि जनता यांच्यातील भिंत कोसळली. नियद नेल्लानार’ (तुमचा चांगला गाव) या योजनेअंतर्गत आम्ही अतिदुर्गम भागात पोलीस कॅम्प उभारले. हे कॅम्प केवळ सुरक्षेसाठी नव्हते, तर ते विकासाचे केंद्र बनले. कॅम्पसोबतच रस्ते, शाळा, रुग्णालये आणि रेशनची दुकाने पोहोचली. जेव्हा जनतेला प्रशासनाचा आधार जाणवू लागला, तेव्हा त्यांनी स्वतःहून नक्षलवादाला नाकारले. पूर्वी नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर होणारे खोटे आरोप आता पूर्णपणे थांबले आहेत, कारण गावकरी स्वतः आता पोलिसांचे मित्र बनले आहेत. जेव्हा जनतेला प्रशासनाचा आधार जाणवू लागला, तेव्हा त्यांनी स्वतःहून नक्षलवादाला नाकारले. . आव्हाने आणि भविष्यातील बस्तर ः एका अधिकाऱ्याच्या नात्याने सांगायचे तर, 2005-06 मधील चुरेगावची माझी पहिली चकमक आजही आठवते, जेव्हा आम्ही वीज कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी जंगलात गेलो होतो. तो काळ संसाधनांच्या कमतरतेचा होता. आज आपल्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे, दळणवळणाची साधने आणि जखमी जवानांना तत्काळ बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर्सची सुविधा आहे. तंत्रज्ञान आणि मानवी सामर्थ्याच्या जोरावर आम्ही हे युद्ध जिंकले आहे.आजचा बस्तर बदलला आहे.
आता आमचे लक्ष केवळ सुरक्षेवर नाही, तर शाश्वत विकासावर आहे. येथील तरुणांना आता मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस (लघु वनोपज), इको-टुरिझम आणि होम-स्टेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नक्षलवाद आता इतिहासाचा भाग झाला असून, बस्तर आता प्रगती आणि शांततेचा नवा अध्याय लिहित आहे. ही केवळ एका भागाची मुक्ती नाही, तर लोकशाहीच्या विजयाची गाथा आहे.-सुंदरराज पट्टिलिंगम,पोलीस महानिरीक्षक, बस्तर परिक्षेत्र
Check Also
अविवेकाच्या अंधारात श्रद्धेचा बाजार
महाराष्ट्र हा संतांचा, समाजसुधारकांचा आणि क्रांतीकारकांचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या मातीने देशाला विज्ञानाची कास …
पांचजन्य वृत्तपत्र