लेख-समिक्षण

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांची आणि पदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचीदेखील घोषणा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचादेखील कार्यक्रम जाहीर करण्यात आला. आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होतील.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. आसाम, केरळ आणि पदुच्चेरी या तीनही ठिकाणी एकाच दिवशी 9 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी निकाल जाहीर होतील. तामिळनाडूतही एकाच टप्प्यात निवडणूक होईल. तामिळनाडूमध्ये सर्व 234 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होईल आणि 4 मे रोजी निकाल जाहीर होतील.
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडेल. पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान पार पडेल. तर दु4 मे रोजी मतमोजणी होईल. यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये पूर्वी आठ टप्प्यात निवडणुका होत असत, परंतु यावेळी निवडणुका दोन टप्प्यात होतील. आयोगाने व्यापक विचारविनिमय केला होता आणि सर्वांसाठी प्रक्रिया अधिक सोयीस्कर करण्यासाठी टप्प्यांची संख्या कमी करणे योग्य मानले होते.
आसाममध्ये 126 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होईल. आसाममध्ये 9 एप्रिलला सर्व 126 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर 4 मे रोजी निकाल जाहीर होतील. या निवडणुकीसाठी सर्व उमेदवार हे 23 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहेत. तर 26 एप्रिलला अर्ज मागे घेता येईल.
तामिळनाडूमधील 234 विधानसभा जागांसाठी मागील निवडणुकांप्रमाणेच 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी 4 मे रोजी होईल. तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 10 मे 2026 रोजी संपत आहे. राज्यातील शेवटच्या निवडणुका 6 एप्रिल 2021 रोजी झाल्या होत्या आणि मतमोजणी 2 मे 2021 रोजी झाली होती. या व्यतिरिक्त गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड, त्रिपुरा राज्यातील पोटनिवडणुकांचीदेखील घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात राहुरी आणि बारामती विधानसभा या दोन मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तेथे 23 एप्रिलला मतदान होईल आणि 4 मे रोजी निकाल जाहीर होतील, असे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बारामती आणि राहुरी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच आमची इच्छा आहे, त्यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा. पण जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारच बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची चर्चा आहे. राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून माजी आमदार प्राजक्ता तनपुरे हे निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते.

Check Also

बच्चू कडू यांची ‌‘प्रहार‌’ इतिहासजमा

विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती …