काही माणसे आपल्या कार्यक्षेत्रात केवळ नाव कमवत नाहीत, तर इतिहास घडवतात. क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा-जेव्हा विक्रमांची चर्चा होते, तेव्हा विराट कोहली हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. विराटचे हे यश केवळ नशिबाचा भाग नसून, त्यामागे अफाट कष्ट, शिस्तबद्ध सराव आणि तंदुरुस्तीसाठीचा कठोर डाएट यांचा मोठा वाटा आहे. आयुष्यात कितीही उतार-चढाव आले तरी विराटने आपला सकारात्मक दृष्टिकोन कधीही सोडला नाही.
विराटच्या मते, कष्टाला कोणताही पर्याय नसतो. तुमच्याकडे उपजत टॅलेंट असो वा नसो, कठोर परिश्रमाशिवाय गत्यंतर नाही. केवळ प्रतिभाशाली असून उपयोग नाही, तर त्या प्रतिभेला कष्टाची जोड देणे अनिवार्य असते. यासोबतच आपली नियत साफ असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुमचे काम प्रामाणिक हेतूने प्रेरित असेल, तर यश तुमची पाठ सोडत नाही. विराट नेहमी सांगतो की, तुम्ही जे काही काम कराल, त्यावर मनापासून प्रेम करायला शिका. जेव्हा एखादे काम ओझे म्हणून न पाहता आनंदाने केले जाते, तेव्हा कोणतीही अडचण तुमचा मार्ग रोखू शकत नाही.
स्वतःशी प्रामाणिक राहणे हा विराटच्या जीवनाचा मूळ मंत्र आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत खरे असता, तेव्हा तुम्हाला कशाचीही भीती वाटत नाही. ज्या क्षणी तुम्ही प्रगतीचा ध्यास घेता आणि ठरवता की मला पूर्वीपेक्षा अधिक बेस्ट व्हायचे आहे, त्या क्षणापासून संपूर्ण सृष्टी तुम्हाला साथ देऊ लागते. संधी लहान असो वा मोठी, तिचे सोने करण्याची जिद्द असायला हवी. जर यशाची शक्यता केवळ एक टक्का जरी असेल, तरी ती एक संधी तुमच्यासाठी पुरेशी ठरली पाहिजे. मोठी यशशिखरे चिकाटीने सर केली जातात, सबबी सांगून किंवा बहाणेबाजी करून नाही. उणिवा शोधण्यापेक्षा हिंमत एकवटून कामाला लागणे हेच यशाचे गमक आहे.
आयुष्यातील पराभवाकडे पाहण्याचा विराटचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा आहे. तो म्हणतो की, तुम्ही त्या दिवशी खऱ्या अर्थाने पराभूत होता, ज्या दिवशी तुम्ही स्वतःहून हार मान्य करता. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात, तोपर्यंत तुमचा विजय शक्य आहे. शेवटी, ईश्वरावर श्रद्धा ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. कठोर मेहनत करणे आपल्या हातात आहे, परंतु निकाल त्याच्यावर सोडून द्यावा. त्याची योजना आपल्या कल्पनेपेक्षाही उत्तम असते, हा विश्वास विराटने नेहमीच व्यक्त केला आहे.
विराटकडे विचारांची विराट शिदोरी आहे ही बाब त्याचे वरील विचारावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
शून्यातून बनला कोट्याधीश…
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू …
पांचजन्य वृत्तपत्र