लेख-समिक्षण

द्रमुकचे पायही मातीचेच

शाची राजधानी दिल्ली 1 फेब्रुवारी रोजी जेव्हा अर्थसंकल्पीय भाषणाच्या चर्चेत मग्न होती, अगदी त्याच दिवशी तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाने आपल्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शंखनाद केला. 1 फेब्रुवारीला माघी पौर्णिमा होती आणि याच दिवशी तामिळ संस्कृतीतील महत्त्वाचा ‌‘थाईपुसम‌’ उत्सव साजरा केला जातो. तामिळनाडूतील धार्मिक जनतेसाठी या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. च
दीर्घकाळ स्वतःला नास्तिक म्हणवून घेणाऱ्या द्रमुक पक्षाने आपल्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभासाठी याच दिवसाची निवड केली. ‌’थाईपुसम‌’ हा शब्द थाई आणि पुसम या दोन शब्दांपासून बनला आहे. थाई हा तामिळ महिना असून त्यातील पहिल्या पौर्णिमेला हा सण साजरा होतो. पौराणिक कथांनुसार, याच दिवशी भगवान मुरुगन (कार्तिकेय) यांनी आपली माता पार्वतीकडून मिळालेल्या दिव्य शस्त्राने सूरपद्मण या राक्षसाचा वध केला होता. तामिळनाडूत या दिवशी सरकारी सुट्टी असते, परंतु यंदा हा सण रविवारीच आला. या दिवशी भाविकांनी शिवमंदिरांमध्ये, विशेषतः भगवान मुरुगन यांच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. साहजिकच, श्र्द्धाळू जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी द्रमुकने या दिवसाची निवड केली, ज्यातून असा संदेश गेला की आता या पक्षालाही धर्माच्या पाठिंब्याची गरज भासू लागली आहे. द्रमुकसमोर सध्या सत्ताविरोधी लाटेसोबतच अभिनेता विजय यांचा पक्ष ‌‘टीव्हीके‌’ आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी ‌‘अण्णाद्रमुक‌’चे मोठे आव्हान आहे.
द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी आपल्या युतीची गणिते जवळपास निश्चित केली आहेत. काही किरकोळ अडचणी असल्या तरी त्या येणाऱ्या काळात सुटतील, अशी चिन्हे आहेत. द्रमुकची जुनी आघाडी या निवडणुकीतही कायम राहण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरी त्यांचा करार निश्चित मानला जात आहे. तामिळनाडू आणि पुडुचेरीचे काँग्रेस प्रभारी गिरीश चोडणकर हे द्रमुक नेतृत्वाशी चर्चा करत असून, लवकरच पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल या करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी येणार आहेत.
234 सदस्यांच्या विधानसभेसाठी काँग्रेस 33 जागांची मागणी करत आहे, तर मागील निवडणुकीत त्यांना 25 जागा मिळाल्या होत्या. मात्र, पुडुचेरीमध्ये काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. तिथे आपला दबदबा असल्याने काँग्रेसला स्वतःचा मुख्यमंत्री हवा आहे, तर दुसरीकडे द्रमुकनेही तिथे नेतृत्वाचा दावा ठोकला असून त्यांचे नेते जगतरक्षकन यांनी स्वतःची उमेदवारीही मांडली आहे. दिल्लीत काँग्रेसच्या ‌’डाटा अनालिसिस‌’ विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील एक गट अभिनेता विजय यांच्याशी युती करण्यासाठी आग्रही आहे. चक्रवर्ती यांच्या मते, विजय यांच्याकडे निवडणुकीत विजयाची अधिक चांगली संधी आहे. प्रवीण आणि विजय हे दोन्ही राजकारणात नवे असले तरी त्यांच्या राजकीय प्रगल्भतेची चर्चा होत असते.
द्रमुकची इतर घटक पक्षांशीही बोलणी झाली असून ते माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्याही संपर्कात आहेत. दुसरीकडे, अण्णाद्रमुकच्या सर्व गटांना एकत्र आणण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने आता तो नाद सोडून दिला आहे. मात्र, भाजपने टी. टी. व्ही. दिनकरन यांना आपल्यासोबत घेण्यात यश मिळवले आहे. तसेच, उत्तर तामिळनाडूत प्रभाव असलेल्या ‌’पिएमके‌’ पक्षासोबतही त्यांनी समझोता केला आहे. अण्णाद्रमुक 150 ते 160 जागा स्वतःकडे ठेवून उरलेल्या जागा मित्रपक्षांना देण्याची शक्यता आहे. भाजप 30 जागांची मागणी करत असला तरी 22 जागांवर त्यांचे समाधान होऊ शकते. अभिनेता विजय यांनी राजकारणात धडाक्यात प्रवेश केला आणि अनेक पक्षांना युतीचे आवाहन केले. दुर्दैवाने, कोणत्याही प्रमुख पक्षाने त्यांना प्रतिसाद दिला नाही. आता विजय यांनी सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यांचे उमेदवार पारंपरिक पक्षांच्या मतांमध्ये मोठी घट करू शकतात. आता कळीचा प्रश्न हाच आहे की, विजय यांचा फटका नक्की कोणाला बसणार? द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे दोन्ही पक्ष विजय यांच्यामुळे आपले नुकसान होणार नसल्याचा दावा करत असले, तरी त्यांच्या या दाव्यात फारसे तथ्य नसल्याचे त्यांनाही ठाऊक आहे.

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …