लेख-समिक्षण

अजित पवार यांना अखेरचा निरोप

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात गुरुवारी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला.
या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुंबईचे पीएसओ व त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाचा भीषण अपघात झाला आहे.
विमान बारामतीत लँडिंगदरम्यान भीषण अपघातात कोसळले. विमान शेजारील शेतात सकाळी 8.30 वाजेच्या आसपास विमान कोसळले. त्यावेळी मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. हे दृश्य पाहून आजूबाजूच्या वस्तीवरील लोकांनी धाव घेतली. त्यांना दिसले की, भीषण अपघातात विमान जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळाताच दिल्लीहून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, खासदार सुप्रिया सुळे बारामतीकडे रवाना झाले. ज्येष्ठ नेते व अजितदादांचे काका शरद पवार हे बारामतीतील रुग्णालयात दाखल झाले. तसेच प्रतिभा पवार या देखील रुग्णालयात दाखल झाल्या. रुग्णालय परिसरात नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. अजित पवारांच्या पार्थिवावर गुरुवारी अत्यसंस्कार करण्यात आले.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातातील निधनाची घटना घडली. लोकसभेत उपमुख्यमंत्री आणि माजी खासदार अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोघांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून बारामती येथील विमान अपघाताबाबत माहिती घेतली. तसेच गुरुवारी बारामतीमध्ये करण्यात आलेल्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे अनेक राजकीय मंडळींना अश्रू अनावर झाले होते. अनेक ठिकाणी गावे, मार्केट यार्ड बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. शिक्षण संस्था आणि शाळा महाविद्यालय बंद होती. यासोबतच अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बारामती बंद करण्यात आली होती. रूग्णालयाबाहेर अजितदादा यांच्या हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या पांगणात मोठा जनसागर उसळला होता.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागाने (प्रोटोकॉल) तीन दिवसांच्या शोक जाहीर केला. या काळात, महाराष्ट्रातील ज्या इमारतींमध्ये नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, त्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला. या काळात कोणतेही सरकारी मनोरंजन कार्यक्रम झाले नाहीत. बुधवारी महाराष्ट्रातील सर्व राज्य सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली.
अजित पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त करणारा संदेश पोस्ट केला. त्यांनी लिहिले की, दादा गेले! एक प्रामाणिक नेते, माझे मित्र आणि सहकारी अजित दादा यांचे विमान अपघातात निधन हृदयद्रावक आहे. माझे हृदय सुन्न झाले आहे. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी एक खंबीर आणि चांगला मित्र गमावला आहे. हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. हे असे नुकसान आहे जे भरून काढता येणार नाही. आज महाराष्ट्रासाठी खूप कठीण दिवस आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात दु:खाचे वातावरण आहे. त्यांच्यासारख्या नेत्याला गमावणे हे खूप मोठे नुकसान आहे. मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली आहे आणि त्यांनी शोक व्यक्त केला आहे. आम्ही राज्यात तीन दिवसांचा शोक जाहीर केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …