लेख-समिक्षण

समुद्रातील सूक्ष्मजीवांबाबत नवं संशोधन

का लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवर 6.5 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरसारख्या प्राण्यांसह अनेक प्रजाती नष्ट झाल्या. डायनासोरप्रमाणेच समुद्रातील सरीसृप, अपृष्ठवंशीय व अनेक सूक्ष्मजीवही नष्ट झाले होते, त्याला कारण या लघुग्रहाचा आघात हे मानले जाते. त्यावेळी जगातील समुद्रात मोठे बदल झाले, तरी अगदी खोलवर असलेले काही सूक्ष्मजीव मात्र त्यातून वाचले होते. ते कसे वाचले असावेत याचे कोडेच आहे. या आघातावेळी समुद्रातील सजीवांचे मुख्य अन्न असलेले शैवाल व जीवाणू नष्ट झाले होते. असे असले तरी तळाच्या भागात हे सूक्ष्मजीव जिवंत राहिले, याचे कारण शोधण्याचे प्रयत्न अजूनही चालू आहेत. ब्रिटनमधील कार्डिफ विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, सागराच्या वरच्या भागातील शैवाल व जीवाणू नष्ट झाले होते हे खरे असले, तरी त्यांचेच काही प्रकार लघुग्रहाच्या आघातानंतरही टिकून राहिले होते. त्यामुळे सागरी जीवांना तळाशी असतानाही अन्न मिळत होते.
महासागरांमधील काही सजीवांचे जे जीवाश्म आहेत. त्यातील माहितीचे विश्लेषण करून हा उलगडा करण्यात आला आहे. महासागरातील वरच्या भागातून अन्न खालच्या भागात जात होते ते सेंद्रिय द्रव्य होते व अगदी कमी प्रमाणात ते उपलब्ध झाल्यामुळे उल्कापाषाणाच्या आघातानंतरही महासागरातील काही जीव टिकून राहिले होते. या संशोधनात वैज्ञानिकांनी दक्षिण अटलांटिकच्या तळाकडील भागात खोदकाम करून काही जीवाश्म मिळवले आहेत. आघातानंतर सागरी जीवांची अन्नसाखळी तुटली होती, ती पूर्ववत होण्यास नंतर 17 लाख वर्षेलागली. पण आधीच्या अंदाजानुसार अन्नपुरवठा पूर्ववत होण्यास 34 लाखांहून अधिक वर्षेलागली असे मानले जात होते. डायनासोर ज्या आघातात मारले गेले त्यात सागरी परिसंस्थाही नष्ट झाली होती. अनेक सागरी सरीसृप प्राणी त्यांची अन्नाची गरज वेगळ्या पद्धतीने भागवत होते, असे कार्डिफ विद्यापीठाचे हिथर बीर्च यांनी सांगितले. त्या काळात अचानक आघात होऊन बहुतांश जीवसृष्टी नष्ट झाली. त्यात प्लॅक्टन या सागरी वनस्पती नष्ट झाल्या, तरी शैवाल व जीवाणू काही प्रमाणात सागराच्या तळाशी टिकून राहिले. त्यामुळे सागरी तळाशी असलेल्या जीवांना अल्पप्रमाणात का होईना अन्नपुरवठा होत राहिला. असे असले तरी सागराच्या तळाशी असलेला अन्नपुरवठा आणखी सुरळीत होण्यास 20 लाख वर्षेलागली, असे विर्च यांचे मत आहे. अनेक वैज्ञानिकांच्या मते, 6.5 कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या युकाटन भागात 110 कि.मी. व्यासाचा लघुग्रह कोसळला होता. या लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवर सूर्याची ऊर्जा येणे बंद झाले व हरितगृह वायूंनी तापमान वाढत गेले आणि जीवसृष्टीचा बराच हास झाला होता. इकॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …