आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू यांच्या शिवसेना (ठाकरे) आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युती जाहीर केली. त्याशिवाय मुंबईत कोण किती जागा लढवणार, याबाबतही ठाकरे बंधूंकडून माहिती देण्यात आलेली नाही. बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू सावधपणे पाऊले उचलत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यांच्या युतीचा प्रचार असा केला जात आहे, जणू रशिया आणि युक्रेन एकत्र आले आहेत आणि झेलेन्स्की व पुतिन चर्चा करत आहेत. ही युती केवळ स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेले आहेत. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फफडणवीस यांनी राज-उद्धव ठाकरे यांच्या युतीची खिल्ली उडवली.
या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जागावाटपाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हे सांगणार नाही. महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवण्याची खूप टोळी फि रतेय. त्यात आणखी दोन टोळ्या वाढल्या आहेत. ते राजकीय पक्षामधील मुले पळवतात. जे निवडणूक लढवणार आहेत, त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे, हे कळवले जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, जुन्या व्हिडिओवरून हिंदुत्वावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचाही एक व्हिडिओ फिरतोय, ज्यात ते ‘अल्लाह हाफि ज’ असे बोलतायेत. त्यामुळे या गोष्टी मला कु णी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत. समोरचे काय बोलतायेत, त्यावर माझे व्हिडिओ तयार असतील, असा सूचक इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची ही युती आहे. मराठी माणूस सहसा कुणाच्या वाट्याला जात नाही. त्याच्या वाटेला कुणी आले तर त्याला सोडत नाही. आज मुंबईचे लचके तोडायचे काम सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिल्या पाच लढवय्यांमध्ये प्रबोधनकार होते. विधानसभेवेळी भाजपाने अपप्रचार केला होता बटोगे तो कटोगे..तसेच आता मी मराठी माणसांना आवाहन करतोय, आता जर चुकाल तर संपाल, फुटाल तर पूर्णपणे संपून जाईल. तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. आजची घोषणा सध्या मुंबईपुरती असली तरी बाकीच्या महापालिकांमधील युतीवर आज आणि उद्यापर्यंत शिक्कामोर्तब होईल. नाशिकमध्येही युती झाली आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू आहे, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. आज आम्ही शिवसेना-मनसेची युती जाहीर केली आहे. इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. जे-जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. भाजपातील जे अस्सल मराठी प्रेमी आहेत तेदेखील युतीत येऊ शकतात. महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना जे हवंय ते आम्ही पाहू, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे. जे लोक हिंदुत्ववादाशी फारकत घेतात, मतांसाठी लांगुलचालन करतात त्यांची काय अवस्था होते, हे सर्वांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाहिले आहे. आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत. आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजा पद्धतीवर आधारित नाही, तर तो भारतीय जीवनपद्धतीवर आधारित आहे. भारतीय जीवनपद्धतीला स्वीकारणारा आमचा हिंदुत्ववाद आहे. प्रभू श्रीरामांना मानणारा प्रत्येक जण हिंदुत्ववादी आहे. मग त्याची जात धर्म आम्ही पाहत नाही. आमचे हिंदुत्व व्यापक आहे. त्यामुळे पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे बंधूंना सुनावले. ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे पण त्यामुळे फार काही राजकीयदृष्ट्या घडणार नाही. पक्षाला निवडणुकीतील आपले अस्तित्व टिकवण्याकरता जे करावे लागते, त्या दृष्टीने दोन पक्षांनी अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली ही युती आहे. यामुळे फार काही परिणाम होईल, असे मला वाटत नाही. कारण मुंबईकरांचा सातत्याने या मंडळींनी विश्वासघात केला आहे. मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचे काम यांनी केले. मराठी माणूस यांच्यासोबत नाही. अमराठी माणसांवर हल्ले केल्याने तेही यांच्यासोबत नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचाराचा, स्वहिताचा आहे. आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही. त्यांनी अजून दोन चार लोक सोबत घेतले तरी मुंबईकर हे महायुतीचे काम पाहून, भविष्यातील काम बघून महायुतीच्याच पाठीशी उभे राहतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र