लेख-समिक्षण

एका अभिनेत्रीचा संघर्ष‌‘महिमा‌’

शाहरुख खानच्या ‌‘परदेस‌’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री महिमा चौधरीचे वास्तवातील आयुष्य एखाद्या गंभीर चित्रपटाच्या कथेसारखेच खडतर राहिले आहे. शूटिंगदरम्यान झालेला जीवघेणा अपघात, कराराशी संबंधित कायदेशीर गुंतागुंत, ब्रेस्ट कॅन्सरसारखा गंभीर आजार आणि वैवाहिक आयुष्यातील चढउतार या सगळ्यांचा तिने निकराने सामना केला. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बोलताना महिमाने आपल्या आयुष्यातील या कठीण काळाचा उल्लेख केला. 1999 साली अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल यांच्यासोबत ‌‘दिल क्या करे‌’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला भीषण अपघात झाला होता. या अपघातातून ती थोडक्यात बचावली. मात्र तिच्या चेहऱ्यात तब्बल अतिशय सूक्ष्म काचेचे 67 तुकडे घुसले होते.
महिमा सांगते की, त्यावेळी डॉक्टरांना मायक्रोस्कोपच्या मदतीने एकेक करून ते काचेचे तुकडे काढावे लागले. अपघातानंतर दुसऱ्या दिवशी चेहरा प्रचंड सुजलेला होता आणि चेहऱ्याची ठेवण पूर्णपणे बदलल्यासारखी वाटत होती. त्या अवस्थेत काही मित्रांनी तिच्या चेहऱ्यावरील शस्त्रक्रियेबद्दल विनोदी टिप्पणीही केली होती. त्या काळात पुढे आयुष्य कसे घडणार, याची कोणतीही स्पष्टता नव्हती, असेही ती प्रांजळपणे सांगते.
या अपघातानंतर महिमाला जवळपास वर्षभर घरी बसून राहावे लागले. तशातच पहिल्या चित्रपटानंतर कायदेशीर अडचणींनाही सामोरे जावे लागले. तरीही या सगळ्या संकटांपुढे न झुकता महिमाने पुन्हा स्वतःला सावरले आणि अभिनयाकडे परतण्याचा मार्ग शोधला.
सध्या महिमा चौधरी आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‌‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी‌’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 19 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून त्याच्या प्रचारात महिमा व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेता संजय मिश्रासोबत ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याआधी ‌‘नादानियां‌’ या चित्रपटात अभिनेत्री खुशी कपूर आणि अभिनेता इब्राहिम अली खानसोबत ती झळकली होती. – अपर्णा देवकर

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …