लेख-समिक्षण

‌‘तारक मेहता…‌’ बंद होणार?

‌‘तारक मेहता का उल्टा चश्मा‌’ हा गेली 18 वर्षेसुरू असलेला विनोदी सिटकॉम भारतीय घराघरांत लोकप्रिय झाला आहे. गोकुळधाम सोसायटीतील व्यक्तिरेखांभोवती फिरणारा हा कार्यक्रम लाखो प्रेक्षकांना भावला आहे आणि त्यातील कलाकारांबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगळीच आपुलकी निर्माण झाली आहे. 2008 मध्ये सुरुवात झालेली ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पसंती मिळवलेल्या सिटकॉमपैकी एक मानली जाते. अनेक प्रेक्षकांनी या मालिकेमध्येच बालकलाकारांना वाढताना पाहिले आहे. गेल्या काही वर्षांत या मालिकेभोवती अनेक वाद उद्भवले, काही कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले, तर काहींनी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर अलीकडेच ही मालिका बंद होत असल्याची बातमी समोर आल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली.
मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माता असित कुमार मोदी यांनी ही चर्चा पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. ‌‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी‌’च्या 25व्या वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होताना असित मोदी यांनी सध्या तरी मालिका बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असे सांगत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
या सर्व गदारोळात मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता शिसोदे यांनी मात्र या कार्यक्रमाला निरोप दिला आहे. गोकुळधाम सोसायटीमध्ये भाजी विक्रेत्या सुनीता म्हणून प्रेक्षकांना परिचित असलेल्या प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट करत हा निर्णय जाहीर केला. आपल्या पोस्टमध्ये तिने स्पष्टपणे नमूद केले की, ज्या लोकांना आपल्या भावनांची कदर नसते किंवा ज्यांच्याकडून आत्मसन्मानाला धक्का बसतो, अशांसोबत काम करू नये. ‌‘सुनीता‌’ ही भूमिका मिळाल्याबद्दल तिने निर्मात्यांचे आभार मानले आणि महिला मंडळातील सहकलाकारांना मिस करणार असल्याचे लिहिले. तिचे शोमधून बाहेर पडणे मालिकेसाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. कलाकार बदलत राहिल्याने कथानकाची गती काही काळ मंदावते, वातावरणात संभ्रम निर्माण होतो, पण तरीही या मालिकेने वर्षानुवर्षेटिकवलेली लोकप्रियता आणि घराघरांत मिळवलेला स्नेह यामुळे प्रेक्षकांची नाळ अजूनही या कार्यक्रमाशी तशीच जोडलेली आहे.- स्वाती देसाई

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …