भारतीय समाजात आजही दुसऱ्या विवाहाला मान्यता मिळताना दिसत नाही. विशेषतः पहिली पत्नी हयात असताना किंवा तिच्यासोबत घटस्फोट झालेला नसताना दुसरा विवाह करणे ही सरळसरळ प्रतारणाच असते. परंतु सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे आयुष्य पाहिल्यास त्यांनी ही प्रतारणा लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही केल्याचे दिसते. दिलीप कुमार, धर्मेंद्र, राज बब्बर, राजेश खन्ना, विनोद खन्ना, आमीर खान, सैफ अली खान यांसारख्या नायकांच्या दुसऱ्या-तिसऱ्या विवाहांच्या चर्चांमुळे चंदेरीनगरीतील एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर आली. – सोनम परब
चित्रपटसृष्टीतील कोणताही अभिनेता करिअरच्या शिखरावर पोहोचला की त्याचे प्रेमसंबंधही चर्चेत येतात. लोकप्रियतेसोबत अशा नात्यांची दुमदुमणारी चर्चा वाढते. अनेक प्रसंग विवाहापर्यंत पोहोचतात. पण एक पत्नी असताना दुसरे लग्न करणाऱ्या कलाकारांचा उत्तरार्ध अनेकदा अस्वस्थतेने भरलेला दिसतो. सामाजिक क्षेत्रात पहिली पत्नी शांत राहते किंवा परिस्थिती झेलते, परंतु समाज मात्र नैतिकतेचा प्रश्न पुन्हा उपस्थित करतो. कुटुंबातील पत्नी आणि मुलांना हे नाते स्वीकारणे कठीण जाते. त्यामुळे अनेक प्रसंगी घराच्या चारभिंतीतले सत्य बाहेर येते.
चित्रपटातील कलाकारांचे जीवन सर्वसामान्यांपेक्षा वेगळे नसते. पडद्यावर कोणतीही भूमिका पार पाडली तरी वास्तव आयुष्यात आनंद, वेदना, ताणतणाव हे सर्व अनुभव समान असतात. कुटुंबातील ताण आणि संबंधातील ओढाताण ही वास्तवाची बाजू चित्रपटातील कथानकांपेक्षा खूप वेगळी असते. चित्रपटात शेवट सुखाचा दाखवला जातो; पण आयुष्याच्या उत्तरार्धात त्या नात्यांचे खरे स्वरूप उलगडते. लोकप्रियतेच्या टोकावर असलेल्या कलाकारांचे दुसरे लग्न झाले की परिस्थिती बदलते. कधी सोयीची, कधी विस्कळीत अशी परिस्थिती दिसते; पण दुसऱ्या लग्नाचे ओझे कुटुंबावर जडते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनिक संघर्षातून बाहेर पडणे अवघड जाते.
अलीकडेच आपली जीवनयात्रा संपून अनंताच्या प्रवासाला गेलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचेही संपूर्ण आयुष्य दोन विवाहांच्या चौकटीत उभे राहिले. प्रकाश कौर यांनी पहिल्या पत्नी म्हणून धर्मेंद्र यांना आयुष्यभर आधार दिला. पण धर्मेंद्र यांच्या जीवनात काही वर्षांपूर्वी हेमा मालिनी यांच्या रूपाने दुसरा अध्यायही सुरू झाला होता. अखेरच्या काळात प्रकाश कौर यांचा घरातला मान अबाधित राहिला आणि हेमा मालिनी यांनीही धर्मेंद्र यांच्या उत्तरार्धात साथ दिली. दोन विवाहांचे अस्तित्व जपत धर्मेंद्र यांनी दोन्ही नात्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला; परंतु भावनिक क्लिष्टता शेवटपर्यंत टिकून राहिली.
बॉलीवूडचे महानायक दिलीप कुमार यांनी 1966 मध्ये सायरा बानो यांच्याशी विवाह केला. सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांना स्थैर्य, साथ आणि भावनिक नाती दिली. मात्र, त्यांच्यापासून अपत्य नसल्याची खंत चर्चेत राहिली आणि 1981 च्या सुमारास दिलीप कुमार यांच्या आयुष्यात आसमा रहमान आली. तिच्याशी झालेले दिलीपसाहेबांचे दुसरे लग्न गुप्त राहिले. लवकरच हे नाते तुटले. आपल्या आत्मचरित्रात दिलीप कुमार यांनी हा लग्नासंबंधी घेतलेला निर्णय आपली चूक असल्याचे स्पष्टपणे मान्य केले आहे. या धक्क्यानंतर दिलीप कुमार पुन्हा सायरा बानो यांच्या सहवासात परतले. दुसरे लग्न हे दिलीप कुमार यांच्या प्रतिमेवर काळी सावली टाकणारे ठरले असले तरी सायरा बानो यांच्या शांत स्वभावाने या प्रसंगावर पडदा टाकला.
अभिनेते राज बब्बर यांनी नादिरा बब्बर यांच्याशी विवाह केलेला असतानाही स्मिता पाटील यांच्याशी त्यांचे प्रेमसंबंध जुळले आणि तिच्याशी राज यांचा विवाहही झाला. तथापि, स्मिता पाटील यांच्या अकाली निधनानंतर राज बब्बर पुन्हा नादिरा बब्बर यांच्या सहवासात परतले. राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. कालोघात त्यांचे नाते तुटले तरी ताटातूट झाली नाही. नंतर अनीता आडवाणी यांनी राजेश खन्ना यांच्या दुसऱ्या विवाहाचा दावा केला. या संपूर्ण कथेत राजेश खन्ना यांच्या वैयक्तिक आयुष्याभोवती मोठे गूढवलय शेवटपर्यंत कायम राहिले.
अभिनेते विनोद खन्ना यांच्या आयुष्यात गीतांजली आणि कविता दफ्तरी या दोघींशी झालेल्या विवाहांमुळे बरीच गुंतागुंत निर्माण झाली होती. दोन्ही नाती वेगळ्या भावनिक अर्थाने जोडली गेली होती. तथापि, विनोदजी आध्यात्मिक मार्गावर वळल्यामुळे कुटुंब आणि चित्रपट या दोन्हींपासून त्यांचा दुरावा वाढत गेला. परिणामी ही नाती तुटली.
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खान याने रीना दत्ता यांच्याशी 1986 मध्ये विवाह केला. पण 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट घेतला. रीना-आमिर यांना जुनैद आणि आयरा नावाची दोन मुलं आहेत. त्यानंतर त्याने किरण रावसोबत दुसरे लग्न केले आणि त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे. आमिर आणि किरण राव यांचा 2021 मध्ये घटस्फोट झाला. आता आमिर गौरीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आधीच्या दोन्ही विवाहबंधनातून आमीर सौहार्दाने विभक्त झाले आहेत. अभिनेता सैफ अली खान यांने आपल्या वयाहून मोठ्या असणाऱ्या अमृता सिंह यांच्यासोबत पहिला विवाह केला होता. परंतु काही कारणांनी हे दोघे विभक्त झाले. यानंतर करीना कपूरसोबत सैफचा विवाह झाला. आज तिच्यासोबत दोन मुलांच्या साथीने सैफ आपले वैवाहिक आयुष्य जगत आहे. अभिनेता संजय दत्तने रिचा शर्मा, रिया पिल्लई आणि नंतर मान्यता दत्त असे तीन विवाह केले. प्रत्येक टप्प्यात संजय दत्तच्या आयुष्यात भावनिक घालमेल आणि कौटुंबिक गुंतागुंत ठळक राहिली.
आपल्या सदाबहार गाण्यांनी चार पिढ्यांना मोहित करणारे बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी या सर्वांच्या पुढे जात चार विवाह केलेहोते. रुमा गुहा ठाकुरता, मधूबाला, योगिता बाली आणि लीना चंदावरकर यांच्यासोबतच्या वैवाहिक नात्यांनी किशोरदांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळी झालर लाभली. दिलीप कुमार यांचे दुसरे लग्न त्रासद ठरले, धर्मेंद्र यांच्या दोन्ही विवाहांत समतोल दिसला, तर राजेश खन्ना यांच्या नात्यांतील गुंतागुंत गुप्ततेतून उघड झाली.
सिनेजगतातील या दुसऱ्या विवाहांच्या कथा एक वेगळे वास्तव उघड करतात. लोकप्रियता किंवा यश व्यक्तीच्या अंतर्मनातील असुरक्षिततेला लपवते, पण त्यांना नाहीसे करत नाही. रुपेरी पडद्यावरील झगमगाटाच्या मागे कलाकारांना अनेकदा भावनिक पोकळी जाणवते आणि त्या पोकळीला भरून काढण्यासाठी ते नवे नातेसंबंध शोधू लागतात. अशा शोधातून अनेक जण दुसऱ्या विवाहाकडे वळतात. सुरुवातीला हा निर्णय प्रेमाचा अथवा धैर्याचा वाटतो, परंतु पुढे जाताना कौटुंबिक समीकरणे, मुलांची भावना आणि सामाजिक दडपण यांमुळे हे नाते गुंतागुंतीचे बनते. त्यामुळे दुसरा विवाह जितका सोपा दिसतो, तितका तो जगताना सहज नसतो.
मुळात भारतीय समाजात दुसऱ्या विवाहाला आजही सहज मान्यता मिळत नाही. कलाकार कितीही प्रसिद्ध असला तरी पहिल्या पत्नीचे मौन, दु:ख आणि कुटुंबातील अंतर्गत ताणतणाव सतत त्यांना बोचत असतात. काही कलाकार दुसऱ्या पत्नीबरोबर राहिले, पण पहिल्या कुटुंबाबद्दल अपराधीपणा त्यांच्या मनातून गेला नाही. समाज विश्वासघाताच्या भावनांना सहज माफ करत नाही आणि हे वास्तव कलाकारांसाठीही अपरिहार्य असते. कलाकाराचे खरे आयुष्य चित्रपटांऐवजी वास्तवाच्या कठोर भूमीवर उभे असते. पडद्याव दाखवले जाणारे प्रेम, संघर्ष आणि सुखांत इतके व्यवस्थित नसते. त्यांची वैयक्तिक आयुष्यातील नाती अनेकदा विस्कटलेली, वेदनादायक आणि गुंतागुंतीची असतात. अनेक कलाकारांनी दोन विवाह अनुभवले, परंतु शेवटी त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात भावनिक आधार देणारे नातेच अधिक महत्त्वाचे ठरले.
पांचजन्य वृत्तपत्र