लेख-समिक्षण

कहाणी रुपेरी पुष्पप्रेमाची

फुल हे सौंदर्य, सुवासिक आणि मोहकतेचे प्रतीक आहे. केवळ महिलाच नव्हे तर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या वयोगटातील प्रत्येकाला फुलांविषयी आकर्षण राहिले आहे. भगवंताच्या पूजेतही फुलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदी चित्रपटांतही विविध रंगाच्या आणि रुपाच्या फुलांनी नायिकेच्या सौंदर्यात भर घातलेली दिसून येते. कृष्णधवल काळापासून ते इस्टमनकलरपर्यंतच्या चित्रपटांवर फुलांचा बहर पाहवयास मिळाला आहे. त्याचवेळी चित्रपट गीतांत प्रेम आणि विरहात फुलांनी मोलाची भूमिका बजावली आहे.- सोनम परब
बाग बगीचा पाहून कोणाचेही मन ताजेतवाने होते.टवटवीत आणि मनाला प्रफुल्लीत करणारे फुले उत्साह निर्माण करतात आणि वातावरणात सकारात्मकता आणतात. या फुलांनी बॉलिवुडमध्येही महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. एखादी नायिका तिच्या केसात फुलांचा गजरा घालत असेल तर तिचे सौंदर्य आणखीच बहरते. नर्गिसपासून ते नर्गिस फाकरीपर्यंत हेलनपासून ते हेमामालिनीपर्यंत, रेखापासून राखीपर्यंत, मीनाकुमारीपासून मुमताजपर्यंत, शर्मिला टागोरपासून शिल्पा शेट्टीपर्यंत, मालासिन्हापासून माधुरी दिक्षीतपर्यंत प्रत्येक पिढीतील नायिकांचे सौंदर्य फुलांनी वृद्धिंगत केले आहे. निर्मात्यांना, दिग्दर्शकांना फुलांचे आकर्षण नेहमीच राहिले असून नायिकांकडे अधिकाधिक लक्ष वेधून घेण्यासाठी फुलांचा मुक्तहस्ताने वापर केला आहे. प्रत्येक प्रकारचे, रंगाचे फुल चित्रपटात प्रासंगिक ठरले आहे.
फुलांमुळे दृश्यांत मोहकता
चित्रपट प्रसंगात श्रीनगर, म्हैसुरचे गार्डन, दिल्लीचे लोधी गार्डन असेल आणि तेथे नायक नायिकांचे गीत असेल तर ‌‘सोने पे सुहागा‌’च म्हणावे लागेल. नायक नायिकेचा प्रेमाचा बहर हा फुलांनी द्विगुणीत होतो. गीत किंवा एखाद्या प्रसंगात फुले दिसतात तेव्हा ते दृश्य आणखीच उठावदार दिसते. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. राखी आणि शशी कपूर यांच्यावर साकारलेले गीत ‌‘ओ मेरी शर्मिली‌’ मध्ये ताजेतवाना दिसणारा गुलाब, तर शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना यांच्यावर साकारलेले ‌‘कोरा कागज था ये मन मेरा‌’ हे गीत फुलाने अधिकच सजीव झाले. सदाबहार गीतांत ‌‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू‌’ मध्ये राजेश खन्ना, सुजीतकुमार जेव्हा धावत्या रेल्वेत बसलेल्या शर्मिला टागोरला छेडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शर्मिला यांच्या डोक्यातले लाल फुल हे प्रसंगाला आणखीच रोमॅटिंक करते. प्रत्यक्षात फुल कोणतेही असो ते अगदी आकर्षकतेने सादर केले तर गीत आणि प्रसंगांत बोलकेपणा येतो.
मुमताज यांना अनोखा गजरा
मुमताज या स्टाईल आयकॉन म्हणून ओळखल्या जातात. राजेश खन्ना आणि मुमताज यांची जोडी सुपरहिट मानली गेली आणि आजही त्यांचे गाणे तरुणपिढीला भूरळ पाडणारे आहेत. ‌‘अपना देश‌’ चित्रपटातील गीत ‌‘कजरा लगा के, गजरा सजा के बिजुरी गिरा के जईओ ना‌’ मध्ये मुमताज यांनी बेलाच्या फुलाचा गजरा ज्या पद्धतीने घातला, तो आजही महिलांसाठी स्टाईल आहे. लग्नसमारंभात किंवा उत्सवाच्या काळात महिलावर्ग मुमताजच्या स्टाईलप्रमाणे गजरा घालताना दिसतात. याच चित्रपटातील अन्य गीत ‌‘सुन पंचा, सुन तारा, कोई जीता, कोई हारा‌’ यात मुमताजच्या अभिनयाचे कौतुक झालेले असताना त्यांच्यासमवेत गाणाऱ्या सहकलाकारांनी देखील केसात फुल लावले असून संपूर्ण गाण्यावर त्याची छाप पडली आहे.
1973 मध्ये ‌‘लोफर‌’ चित्रपटात फरीदा जलाल यांच्या विवाहात लाल शरारा कुर्ती घातलेल्या मुमताज यांनी गजऱ्यालाही वैभव मिळवून दिले. गजरा कसा असावा आणि कसा डोक्यात घालावा याचा वस्तुपाठच मुमताज यांनी घालून दिला. याच चित्रपटातील प्रसिद्ध गीत ‌‘मै तेरे इश्क मे मर न जाऊ कहीं‌’ या गीतात त्यांनी प्रिंटेड साडीबरोबरच पांढऱ्या शेवंतीचे फूल घालून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालण्याचा प्रयत्न केला.
सौदर्य वाढविणारे फुल
आज मै जवान हो गयी हु (मै सुंदर हू) गीतात लीना चंदावरकर, पल पल दिल के पास कोई रहता है (ब्लॅकमेल) मध्ये राखी यांचे सौंदर्य आणि त्यांचा वावर हा फुलांनी आणखीच मोहक केला आहे. ‌‘हरियाली और रास्ता‌’ मध्ये मनोजकुमार आणि माला सिन्हा याच्यावर साकारलेले ‌‘बोल मेरी तकदीर मे क्या है‌’ या गीतात माला सिन्हा यांनी केसात शेवंतीचा वापर हा त्यांच्या स्मितहास्याची मोहकता वाढविण्याचे काम करणारे ठरला. 1992 मध्ये प्रदर्शित तहलका मध्ये ‌‘दिल दीवाने का डोला दिलदार के लिए‌’ यात नायिकेने संपूर्ण वेणीला फुलांनी सजविले आणि त्याचा एवढा प्रभाव वाढला की अनेक वर्ष ही फॅशन म्हणून प्रचलित राहिली. तत्कालिन काळात नववधू वेणीत अशाच प्रकारची फुले लावण्याबाबत आग्रही राहत असत.
फुलांनी सजविलेले सदाबहार गीत
हिंदी चित्रपटात एकीकडे नायिकांच्या केशरचनेसाठी फुलांचा वापर केलेला असताना शायर, गीतकारांनी देखील आपल्या गीतात फुलांचा अतिशय कौशल्याने वापर केला आहे. कधी कधी तर प्रतीकाच्या रुपाने फुलांची उपस्थिती दिसते. ‌‘आरजू‌’ चित्रपटात ‌‘ऐ फुलो की राणी बहारो की मलिका‌’, ‌‘सुरज‌’चे गीत ‌‘बहारो फुल बरसाओ, मेरा मेहबुब आया है‌’, सरस्वती चंद्र मधील ‌‘फुल तुम्हे भेजा है खत मे, प्रेम पुजारी मध्ये फुलो के रंग से‌’ सारख्या गीतांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. या गीतांनी आजही लोकांच्या मनावर राज्य केले आहे. सोशल मीडियाच्या काळातही या सदाबहार गीतांवर रील तयार केले जातात आणि काळानुसार हे गीत ट्रेडिंगमध्ये राहिले आहे. चित्रपटांच्या नावावरही फुलांचा वरचष्मा दिसतो. फुल बने अंगारे, दो फुल, फुल और कांटे, फुल, आदींचा उल्लेख करता येईल.

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …