लेख-समिक्षण

सफाई कामगार ते असिस्टंट मॅनेजर

जीवनात परिस्थिती जेव्हा माणसाला झुकवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा धैर्यच इतिहास लिहितं. महाराष्ट्रातील प्रतीक्षा तोंडवलकर यांची कहाणी हेच सिद्ध करते. ज्या बँकेत त्यांनी कधी काळी झाडू हातात घेतला होता, त्याच भारतीय स्टेट बँकेत त्या आज असिस्टंट रीजनल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत.
प्रतीक्षा यांचा जन्म पुण्याजवळील एका अतिशय गरिब कुटुंबात झाला. वडील मजुरी करत होते. त्यांच्या उत्पन्नावर कसंबसं घर चालायचं. त्यामुळे शिक्षण थांबलेले होते. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. परंतु संसारातही सुख नव्हते. आर्थिक तंगी, जबाबदार्‍या आणि अस्थिरता अशा समस्यांचा त्या सामना करत होत्या. तशातच त्या २० वर्षांच्या असताना पतीचे निधन झाले. डोळ्यांसमोर अंधार पसरलेला होता. पण त्यांनी हार मानली नाही. दोन वेळच्या जेवणासाठी, कुटुंब सांभाळण्यासाठी त्यांनी एसबीआय बँकेत सफाई कामगार म्हणून काम सुरू केले. त्यावेळी त्यांना मिळणारा पगार फक्त ६०-६५ रुपये महिना होता.
दिवसभर बँकेत झाडू मारणे, टेबल साफ करणे आणि रात्री रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास ‡करणे हाच त्यांचा दिनक्रम बनला होता. त्यांच्या मेहनतीने प्रभावित होऊन बँकेतील काही सहकार्‍यांनी त्यांना पुस्तके आणून दिली, मार्गदर्शन केले. प्रतीक्षा यांनी या संघर्षमय प्रवासातून पुढे जात दहावी, बारावी पूर्ण केली आणि नंतर बीए व एमएची पदवी घेतली. त्या म्हणतात, माझ्याकडे पैसा नव्हता, पण माझ्याकडे स्वप्ने होती.
१९९३ मध्ये प्रतीक्षा यांचा पुनर्विवाह प्रमोद तोंडवलकर यांच्याशी झाला. प्रमोद यांनी त्यांना शिक्षण सुरू ठेवण्यास आणि स्पर्धा परीक्षा देण्यास प्रोत्साहन दिले. प्रतीक्षा यांनी एसबीआयची लार्क परीक्षा उत्तीर्ण केली आणि ज्या बँकेत त्या टेबल-खुर्चीखालची धूळ स्वच्छ करायच्या त्या खुर्चीवर अधिकारी म्हणून बसल्या. काळानुसार त्यांनी प्रत्येक जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. वरिष्ठ अधिकार्‍यांचा विश्वास संपादन केला. पदोन्नती मिळत गेली आणि आज त्या या बँकेत असिस्टंट रीजनल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. आज त्या अनेक महिलांसाठी प्रेरणा बनून उभ्या आहेत. आज त्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये अजूनही चमक दिसून येते.
परिस्थिती कशीही असली तरी सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिल्यास यश मिळतेच ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …