सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका डॉटर महिलेवर अत्याचार करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा विषय सध्या गाजत आहे. या विषयामध्ये एका पोलीस अधिकार्याचा समावेश असल्यामुळे त्याला गांभीर्य निश्चितच प्राप्त झाले आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या इतर विविध घटनांवर नजर टाकली तर गुन्हे आणि गुन्हेगार यांची हिंसक आणि विकृत मानसिकता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीचेच लैंगिक शोषण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका पित्याने किरकोळ कारणावरून पत्नीशी भांडण झाल्याने त्याचा राग मनात धरून आपल्या दोन जुळ्या मुलींची गळा चिरून हत्या केली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या एका नेत्याने नगरसेवक होऊ पाहणार्या आपल्या पत्नीचीही हत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. केवळ महाराष्ट्रातील घडणार्या घटना समोर येत असल्या तरी देशाच्या कानाकोपर्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे सातत्याने घडत असतात. फलटण येथे घडलेल्या आत्महत्येच्या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावर बोट जरी ठेवण्यात येत असले, तरी अशा प्रकारचे वैयक्तिक गुन्हे प्रतिबंधित करणे किंवा टाळणे कोणत्याही पोलीस खात्याला शय होत नाही हे वास्तव आहे. फलटणच्या घटनेमध्ये एक पोलीस समाविष्ट असल्यामुळेच ती घटना जास्त गंभीर आहे आणि अशा प्रकारच्या घटनांमध्ये प्रकरण दडपले जाण्याची भीती असल्यामुळेच त्याला महत्त्व द्यावे लागते आणि माध्यमांनीसुद्धा त्याच भूमिकेतून हा विषय सातत्याने लावून धरला आहे. गुन्हेशास्त्रातील नियमाप्रमाणे जे गुन्हे घडत असतात ते एकतर शरीराविरुद्धचे गुन्हे असतात किंवा मालमत्तेविरुद्धचे गुन्हे असतात. म्हणजेच मारामारी, खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न हे सगळे शरीराविरुद्धचे गुन्हे असतात आणि चोरी, दरोडे हे गुन्हे मालमत्तेच्या विरोधातील गुन्हे असतात. सतत अशा प्रकारचे गुन्हे कोठे ना कोठे घडतच असतात. या गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारांना शिक्षा देण्यामध्ये पोलीस खाते किती सक्षम आहे यावर कायदा व सुव्यवस्था अवलंबून असते. कोणत्याही शहराच्या कानाकोपर्यात किंवा निर्जन ठिकाणी एखादा गुन्हा जर घडत असेल तर तो गुन्हा घडू नये यासाठी पोलिसांना प्रत्यक्षपणे काहीच करता येत नाही. पण गुन्हा घडून गेल्यावर संबंधितांना शिक्षा देण्यासाठी मात्र पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते. एखाद्या शहरात सातत्याने चोर्यामार्यांचे प्रमाण वाढले असेल, स्त्रियांविरुद्ध गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असेल तर पोलिसांची अकार्यक्षमता लक्षात घेता येऊ शकते आणि पोलिसांचा वचक नाही असे म्हणता येऊ शकते. म्हणून पोलिसांनी आपला वचक निर्माण करणेसुद्धा महत्त्वाचे असते. गुन्हेगारांच्या मनात पोलीस खात्याबाबत आणि न्यायव्यवस्थेबद्दल वचक नसेल तर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत जाते. अशा प्रकारचे गुन्हे करणार्या गुन्हेगारांना जोपर्यंत कडक शासन होत नाही तोपर्यंत हिंसेची ही विकृत मानसिकताही कमी होणार नाही. म्हणूनच या ठिकाणी पोलिसांची जबाबदारी सर्वाधिक आहे. अत्यंत काटेकोरपणे तपास करून साक्षी पुरावे गोळा करून गुन्हेगाराला न्यायव्यवस्थेसमोर शासन देणे यालाच आता पोलीस प्रशासनाने प्राधान्य द्यायला हवे.– राकेश माने
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र