नेहमीच वादग्रस्त बोलणारे गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील महायुती सरकारचे घटक असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा अशा प्रकारच्या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आता देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाची दखल घेऊन गोपीचंद पडळकर यांना समज दिली असली, तरी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे राजकीय टीका करत असताना वैयक्तिक पातळीवर घसरून विनाकारण चुकीच्या पद्धतीने शेरेबाजी केली जात आहे, ती निश्चितच चिंताजनक आहे. एखाद्या गल्लीमध्ये किंवा शाळकरी पोरांमध्ये जेव्हा भांडणे होतात तेव्हा समोरच्याला दुखावण्यासाठी ही पोरे किंवा गल्लीतले गुंड ज्या प्रकारे शिवीगाळ करतात किंवा किंवा अतिशय खालच्या पातळीवरील भाषा वापरतात तशाच प्रकारे राजकीय नेतेही भाषा वापरू लागले तर राजकारणाची पातळी किती घसरली आहे याची कल्पनाच करता येणार नाही. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली वैयक्तिक टीका हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. गेल्या कालावधीमध्ये अशी अनेक उदाहरणे समोर येताना दिसतात. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आणि सहकारी नरेश म्हस्के यांनीही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन संजय राऊत यांचा उल्लेख केला. एकमेकांविषयी आदराने उल्लेख करणे तर बाजूलाच राहिले आहे, आता तर ‘अरे तुरे’ची भाषाच सर्रास बोलली जात आहे. मनोज जरांगे यांनीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातेबाबतही अशीच आक्षेपार्ह विधाने केली होती. बिहारमध्ये एका सभेमध्येही नरेंद्र मोदी यांच्या मातेबाबत अनुदार उद्गार काढण्यात आले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याबाबतही अनेकदा चुकीचे बोलले जाते. या सर्व घटना कमी होत्या म्हणून की काय उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाची विटंबना करण्याचे कामही काही समाजकंटकांनी केले. राजकीय नेत्यांना आपल्या शब्दांनी नामोहरम करताना विरोधी नेत्यांच्या मातेचा आणि पित्याचा उद्धार केल्याशिवाय आपला विचार त्या नेत्यापर्यंत पोहोचणार नाही हा एक चुकीचा समज सर्वच राजकीय नेत्यांच्या मनात निर्माण झालेला दिसतो. महाराष्ट्राचं वर्णन नेहमी सुसंस्कृत, पुरोगामी, सुशिक्षित अशी विशेषणे वापरून केले जाते. त्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची राजकीय संस्कृती समोर येत आहे ही अत्यंत लेशदायक बाब म्हणावी लागेल. आपला मुद्दा मांडण्यासाठी किंवा रेटण्यासाठी शालजोडीतील उपहासात्मक पद्धतीचा वापर करूनही सुसंस्कृत पद्धतीने टीका करता येते; पण विद्यमान महाराष्ट्रातील राजकारण्यांना अशा प्रकारची सुसंस्कृत टीका मान्य नसावी. शिवीगाळ करून आपला मुद्दा त्याच्यापर्यंत पोहोचला जातो असा एक समज राजकीय नेत्यांनी निर्माण करून घेतला आहे. हा समज निश्चितच घातक आहे.– जगदीश काळे
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र