लेख-समिक्षण

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ शेतकर्‍यांच्या बांधावर

मराठवाडा, पश्चिम विदर्भात पावसाने हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांनी ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी टाहो फोडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी बुधवारी लातूर, सोलापूर जिल्ह्यात दौरा केला. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. या दौर्‍यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एनडीआरएफच्या अटी शिथिल करून शेतकर्‍यांना मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार आणि इतर मंत्र्यांनी लातूर व सोलापूर जिल्ह्यांना भेटी दिल्या. सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा भागातील पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यावर लातूर जिल्ह्याला भेट देण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काल (मंगळवारी) आम्ही जवळपास २ हजार कोटी रिलीज केले. शेतकर्‍यांना मदत करणारच आहोत. पण त्यासोबत ज्यांच्या घराचे नकुसान झालेले आहे. अन्नधान्याच नुकसान झाल आहे, त्यांनाही मदत करणार आहोत. शासनाने हा निर्णय केलेला आहे की, कुठलेही अधिकचे निकष न लावता आवश्यकतेनुसार निकष शिथिल करून नागरिक केंद्रीत मदत करायची आहे. नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना, शेतकर्‍यांना, शेत मुजरांना मदत होईल अशा पद्धतीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत, असे ते म्हणाले.
आपत्ती सुरू असताना पैसा रिलीज करणे सुरू केलेले आहे. दिवाळीपूर्वी आम्ही सर्वांना मदत करणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे, त्यावर फडणवीस म्हणाले की, ओला दुष्काळ बोली भाषेतली टर्म आहे. पावसामुळे जे नुकसान झाले, त्या सर्वांची नुकसानभरपाई, टंचाईस्थितीत शेतकर्‍यांना ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व सवलती देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. पहिल्यांदा तातडीची मदत हा विषय महत्त्वाचा आहे, ती शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणार आहोत. केंद्र सरकारही मदत करणार आहे. एनडीआरएफला काही एडवान्स पैसे दिलेले असतात. ते खर्च करण्यास सुरुवात केली आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. जो काही निधी लागेल, तो देण्याच आश्वासन मंत्रिमंडळाने दिलेले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वत: भेट दिली. बुधवारी उपमुख्यमंत्री पवार यांनी हे सोलापूर जिल्ह्यातील त्यांनी कोर्टी या गावाला भेट दिली. त्यावेळी शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी मदत करताना दिवसभरात ६५ मिमी पाऊस पडल्याची अट ठेवणार नसल्याची ग्वाही दिली. अडचणीच्या काळात नियमांवर फार बोट ठेवू नका अशा सूचना त्यांनी तत्काळ अधिकार्‍यांना दिल्या. तर ड्रोनद्वारे पंचनामे करू, असे आश्वासन त्यांनी दिले. निधीची चिंता करू नका, असेही अजितदादा म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परांडा तालुयातील पूरबाधित करंजा गावाच्या शिंदेवस्ती आणि करळेवस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे पूर येऊन नुकसान झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी वस्तीतील नागरिकांशी संवाद साधून झालेल्या शेतीच्या नुकसानीची व मालमत्तेच्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्यासह जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. करंजा गावाजवळील शिंदे वस्तीतील चांगदेव शिंदे यांच्या पूरबाधित घराची पाहणी केली. या वस्तीतील गावकर्‍यांनी पुनर्वसन करण्याची मागणी केली.

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …