लेख-समिक्षण

सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती!

महाष्ट्राचे राज्यपाल सी. पी राधाकृष्ण यांची देशाच्या नव्या उपराष्ट्रपतिपदी निवड करण्यात आली आहे. संसदेतील निवडणूक प्रक्रियेत त्यांचा विजय निश्चित झाल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांना ४५२ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. राधाकृष्णन यांनी त्यांचा १५२ मतांनी पराभव केला. त्यानंतर, त्यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया ब्लॉकचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत होती. देशाच्या १७ व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मंगळवारी संसद भवनात मतदान पार पडले. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष व मंत्री जे.पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आदींनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ७६८ खासदारांनी मतदान केले. भारतीय संसदेत लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण ७८८ खासदार आहेत. सध्या दोन्ही सभागृहात सात जागा रिक्त आहेत. अशाप्रकारे एकूण ७८१ खासदारांना मतदान करायचे होते, त्यापैकी १३ जणांनी मतदानात भाग घेतला नाही. यापैकी बीआरएसचे चार, बीजेडीचे सात, अकाली दल एक आणि एक अपक्ष खासदाराने मतदान केले नाही. ४२७ एनडीए खासदारांनी मतदान केले.
एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. मतमोजणीच्या वेळी ७५२ मते वैध आढळली आणि १५ मते अवैध घोषित करण्यात आली. सीपी राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली, तर इंडिया ब्लॉकचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना फक्त ३०० पहिल्या पसंतीची मते मिळाली. त्यामुळे राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. दरम्यान, २१ जुलै रोजी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली आहे. राधाकृष्णन यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनातील औपचारिक समारंभात हा शपथविधी पार पडला.
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असलेल्या सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले आहे. १९९८ मध्ये ते पहिल्यांदा तमिळनाडूमधील कोइंबतूर येथून लोकसभेवर निवडून आले. १९९९ मध्ये ते पुन्हा एकदा कोइंबतूर लोकसभेवर निवडून आले. त्यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात वस्त्रोद्योग संबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. सार्वजनिक उपक्रमांसाठी (पीएसयू) संसदीय समितीचे आणि अर्थ विषयक संसदीय सल्लागार समितीचे देखील ते सदस्य होते. स्टॉक एस्चेंज घोटाळ्याची चौकशी करणार्‍या संसदीय विशेष समितीचे देखील ते सदस्य होते. २००४ साली सी. पी. राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौर्‍यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य होते. २००४ ते २००७ पर्यंत ते तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते. या पदावर असताना त्यांनी ९३ दिवसांची ‘रथयात्रा’ काढली होती. या रथयात्रेने १९००० किमी प्रवास केला. भारतातील सर्व नद्यांना जोडावे, दहशतवादाचे समूळ उच्चाटन करावे, समान नागरी कायदा लागू करावा, अस्पृश्यता निर्मूलन आणि अंमली पदार्थांचे उच्चाटन व्हावे या मागण्यांसाठी ही रथयात्रा काढली होती. त्यानंतर देखील त्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी दोन पदयात्रांचे नेतृत्वही केले.

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …