उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे पदसिध्द सभापती असलेल्या अचानक प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करत राजीनामा दिल्याची घोषणा संसद अधिवेशनाच्या प्रारंभी केली. यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ही केवळ व्यक्तिगत पातळीवरील वैद्यकीय बाब नसून भाजप सरकारने सर्वोच्च घटनात्मक पदांबाबत दाखविलेल्या असहिष्णुतेचे आणि अधिनायकी वृत्तीचे लक्षणीय उदाहरण म्हणून ही घटना ओळखली जाईल. सत्ताधारी भाजपने धनखड यांच्याशी असलेल्या तणावाच्या रेषा आधीच अधोरेखित केल्या होत्या. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी सापडलेल्या नोटांच्या प्रकरणी महाभियोग प्रस्तावावर सत्ताधार्यांनी गोंधळ घातला. मात्र, सभापती धनखड यांनी नियमांचा हवाला देत विरोधकांच्या प्रस्तावाला प्राधान्य दिले. त्यांच्या या घटनात्मक व निष्पक्ष भूमिकेमुळे सत्ताधार्यांमध्ये अस्वस्थता वाढली. विशेषतः भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभा कामकाजाच्या महत्त्वाच्या बैठकीस अनुपस्थित राहाणे हे केवळ दुर्लक्षित करणारे नसून सभापती धनखड यांचा जाणीवपूर्वक केलेला अवमानच होता, हे आता उघड होऊ लागले आहे. या घटनांनी सभापतिपदाच्या प्रतिष्ठेला ठिणगी लावली. संसदीय कार्यमंत्री आणि पक्षनेते सभापतींच्या बैठकीला न येणे त्यांच्या अधिकारावर रेकॉर्डिंगच्या मुद्द्यावरुन दबाव आणणे यामागे केवळ राजकीय मतभेद नव्हते, तर पूर्णपणे पदाचा आणि व्यक्तीचा अवमान करण्याचा स्पष्ट हेतू होता. ही परिस्थिती म्हणजे लोकशाही संस्थांच्या आत चालणार्या दबाव तंत्राचे दुस्साहसिक प्रदर्शन आहे. धनखड हे स्पष्ट वक्ते, परखड विचार मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांचे नेहमी खटके उडत असत. बॅनर्जी यांच्याशी त्यांनी नेहमीच संघर्षाची भूमिका घेतली. मात्र, दिल्लीतील सत्ता केंद्राला धनखड यांच्या स्पष्टपणाचा त्रास वाटू लागला. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी भाजपला पहलगाम हल्ला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत- पाकिस्तानमधील युध्द थांबविल्याचे केलेले विधान आणि या युध्दामध्ये भारताचे झालेले नुकसान यावर विरोधकांनी शस्त्र परजून ठेवले होते. राज्यसभेत धनखड यांनी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांना पहलगामवर अधिक वेळ बोलण्याची संधी दिली, हे सत्ताधारी भाजपला नको होते. वर्मांविरुध्द महाभियोगाचा विरोधकांचा प्रस्ताव स्वीकारणे आणि खर्गे यांना सरकारवर टीका करण्याची दिलेली संधी हे भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाला पटले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि नड्डा यांची खप्पामर्जी ओढवून घेतलेल्या धनखड यांना राजीनामा देणे भाग पडले. त्यांचे आरोग्याचे कारण निमित्त ठरले. पण पडद्यामागील कारस्थान वेगळेच आहे.– विलास कदम
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र