वाहतुकीचा एकही नियम कधीच मोडला नाही, अशी व्यक्ती शोधून सापडेल का? जाणूनबुजून नसेल; पण नकळत का होईना आपल्या हातून कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या नियमाचं उल्लंघन होतंच. आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये, कुणाचं नुकसान होऊ नये, कुणाच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, असा विवेकी विचार प्रत्येकानं केला असता तर नियम आणि कायद्यांची गरजच उरली नसती. रस्त्यांवरच्या अपघातांत दरवर्षी किती लोक जिवाला मुकतात, किती जखमी होतात आणि किती कायमचे जायबंदी होतात, याची आकडेवारी आपल्याला मिळतच असते. पण मनापासून किंवा भीतीपोटी, नियम पाळण्याची मानसिकता तयारच होत नाही. ‘मी महत्त्वाचा, माझी सोय आणि माझी वेळ महत्त्वाची’ हा विचार इतका प्रबळ असतो, की ‘माझा जीव महत्त्वाचा’ हाही विचार दुय्यम ठरतो. ‘एकवेळ दंड भरू; पण नियम मोडू’ असा बेदरकारपणा यातूनच जन्माला येतो. विशेष म्हणजे, दंडालाही आपण घाबरत नाही. ‘कार्स-२४’ या संस्थेनं जारी केलेल्या गेल्या वर्षीच्या अहवालातून हीच बेफिकीरी समोर आली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास जास्तीत जास्त काय होईल? तर दंडाची पावती फाडली जाईल. दंड भरायचा की नाही, हे नंतर ठरवू आणि नियम पाळायचे की नाही, हे त्याहीनंतर ठरवू… असा निलाजरा बाणा घेऊन, मृत्यूचीही तमा न बाळगता आपण गाड्या दामटतो आहोत.
गेल्या वर्षभराच्या कालात देशभरातल्या वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना ठोठावलेल्या दंडाची रक्कम पाहिल्यास सखेद आश्चर्याचा धक्का बसतो. ही रक्कम अनेक लहान देशांच्या ‘जीडीपी’पेक्षा जास्त आहे. अतिरेकी वेग, विनाहेल्मेट वाहन चालवणं, लेन मोडणं, नो पार्किंगमध्ये गाड्या लावणं अशा विविध कलमांखाली वाहतूक पोलिसांनी २०२४ मध्ये तब्बल बारा हजार कोटी रुपये दंडाच्या पावत्या फाडल्या. भरपूर पैसाअडका गाठीशी असेल तर माणूस अधिक सुसंस्कृतपणे वागतो, हा गैरसमजही यामुळं दूर झाला आहे. ज्याच्या खिशात पैसा खुळखुळतो, तो फक्त वरवरची रंगरंगोटी करून सभ्य असल्याचा आव आणतो; पण नियम मोडण्याच्या बाबतीत तो आघाडीवर असतो, असं हा अहवाल सांगतो. कारण ५५ टक्के दंड चारचाकी वाहनचालकांना झालाय तर ४५ टक्के दंड दुचाकी वाहनचालकांना झालाय. सगळ्यात महत्त्वाची आणि चिंतेची बाब अशी, की दंडाच्या फक्त पावत्याच फाटल्यात. तो वसूल झालेलाच नाही. बारा हजार कोटी रुपयांपैकी नऊ हजार कोटी रुपये वसूलच झालेले नाहीत, असं ‘कार्स-२४’ने म्हटलंय. असं असूनही संस्था म्हणते, ‘घाबरून नव्हे, तर जबाबदारीने नियम पाळा!’
जी माणसं घाबरूनसुद्धा नियमांना वाकुल्या दाखवतात, त्यांच्याकडून जबाबदारीच्या भावनेची अपेक्षा कशी करणार? वाहतूक पोलिसांनी फाडलेल्या पावत्यांची संख्या एका वर्षात आठ कोटींचा टप्पा ओलांडते, यातच सर्वकाही आलं! ओव्हरलोडिंग आणि ओव्हरस्पीडिंग या कारणांसाठी झालेल्या दंडाची रक्कम सर्वाधिक आहे. म्हणजेच, या कारणांमुळं उद्भवणारे धोके टाळता येण्याजोगे आहेत. अर्थात, बहुतांश धोके टाळता येण्याजोगेच असतात; पण विचार कोण करणार? नियमांचं पालन करवून घेणार्या यंत्रणाही ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी काम करतात हे लपून राहिलेलं नाही. नियम पाळण्याची मानसिकता ना चालकांची आहे ना यंत्रणेची!
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र