14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे लोकार्पण पार पडले. मुंबईहून आलेले पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. अमरावती ते मुंबई आणि मुंबई ते अमरावती विमानसेवेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विमानाचे बुकिंग हाऊसफूल होते. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. व्यापार आणि संपर्क वाढवण्याबद्दल मोदी बोलले. तर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाल्याचे सांगितले.
अमरावती येथील विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू, राज्याचे विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ आदीही उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी ’एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विमानतळाच्या उद्घाटनाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भ प्रदेशासाठी आनंदाची बातमी आहे. अमरावतीमध्ये एक सक्रिय विमानतळ व्यापार आणि कनेक्टिव्हिटीला चालना देईल.‘ केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी याला एक मैलाचा दगड म्हटले. त्यांनी ’एक्स’ वर लिहिले की, ‘बुधवार हा विदर्भासाठी ऐतिहासिक दिवस आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत अमरावती विमानतळाचे उद्घाटन करण्याचा मान मिळाला.पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, आरसीएस-व्हीजीएफ निधीतून उभारलेले हे विमानतळ अलायन्स एअरच्या पहिल्या आरसीएस अमरावती-मुंबई विमानाने उड्डाण करेल. तसेच, लवकरच आपण दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या एअर इंडिया फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ)मध्ये एक डेमो फ्लाइट पाहणार आहोत, जी भारताच्या एकूण विमान वाहतूक परिसंस्थेसाठी एक मोठी झेप आहे.
विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त करताना, राज्याचे विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ’एक्स’ वर लिहिले की, ‘अलायन्स एअरची पहिली उड्डाण सेवा, मुंबई-अमरावती-मुंबई सुरू करण्यात आली आणि एअर इंडियाच्या उड्डाण प्रशिक्षण संस्थेने एक प्रात्यक्षिक उड्डाण देखील सुरू केले. विदर्भाच्या विकासासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. विमानसेवेसोबतच, एअर इंडियाच्या माध्यमातून या विमानतळावरून पायलट प्रशिक्षण संस्था देखील स्थापन करण्यात आली आहे.
अमरावती विमानतळासोबतच आशिया खंडातील सर्वात मोठे एअर इंडियाचे वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे देखील लोकार्पण करण्यात आले. मुंबई ते अमरावती असे आठवड्यातून तीन वेळा असेल. सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस आठवड्यातून विमानसेवा असेल.14 वर्षानंतर अखेर अमरावतीकरांचं स्वप्न पूर्ण झाले आहे. मुंबई वरून पहिले लोकार्पण विमान अमरावती विमानतळावर सुरक्षित लँड झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा यासह इतर मंत्र्यानी पहिल्या विमानाने प्रवास केला. अमरावती विमानतळावर विमान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पहिले विमान लँड झाल्यानंतर अमरावती विमानतळावर मोठा जल्लोष करण्यात आला. अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला शानदार वॉटर कॅनन सलामी देण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन आणि संबंधित अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते, असे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी केले आहे.
Check Also
तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …
पांचजन्य वृत्तपत्र