अखेर औरंगजेबाच्या कबरीने नागपूरच्या महाल परिसरात दंगल घडवून आणली. गेल्या सोमवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी नागपूर पोलिसांनी 1250 हून अधिक संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मिडीया पोस्ट आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलिसांनी सहा गुन्हे नोंदवले आहेत. नागपुरातील कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 200 जणांची ओळख पटवून 60 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांवर हल्ला करणार्या एकालाही सोडणार नाही. जर ते कबरीमध्ये लपले असतील तरी आम्ही त्यांना तेथून शोधू काढू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिला आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करीत औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीवर हिरव्या रंगाची चादर टाकून जाळली. त्यामुळे समाज माध्यमांवर विविध अफवा पसरल्या व सायंकाळी दंगल पेटली. भालदारपुरा, हंसापुरीत अनेक वाहनांची जाळपोळ केली. सोबतच शंभरावर वाहनांची तोड-फोड करीत पोलिसांवरदेखील दगडफेक केली. त्यात 35 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. अतिरिक्त कुमक मागवत भालदारपुरा, चिटणीस पार्क येथील परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली.
कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी 50 हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले. या प्रकरणात तीन पोलीस ठाण्यांत एकूण 6 गुन्हे दाखल झाले आहेत. दंगलग्रस्त परिसरातील जवळपास 100 सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये दिसणार्या संशयितांची माहिती पोलिसांनी गोळा केली. सीसीटीव्ही फुटेजमधील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेणे सुरु केले असून त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर शांत आहे, ते नेहमी शांत असते. काही लोकांनी जाणीवपूर्वक हे केले आहे. औरंगजेबाची कबर जाळली. पण त्यामध्ये आयत नव्हती. तरीही जाणीवपूर्वक ‘आयत जाळली’ असे मेसेज व्हायरल करण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला करणार्यांवर कडक कारवाई होणार, त्याशिवाय शांत बसणार नाही. नागपूर प्रकरणात पोलिस आयुक्त आणि मी वेगळे बोललो नाहीत. पोलीस आयुक्तच मला ब्रिफ करतात. नागपूर प्रकरणात पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला, त्यांना कबरीतून बाहेर शोधून काढू. इतर प्रकरणात माफी मिळेल, पण पोलिसांवर हल्ला केला तर माफी मिळणार नाही. नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. 1992मध्ये जेव्हा सांप्रदायिक तणाव निर्माण झाला होता, तेव्हादेखील शहर शांत होते. मात्र यावेळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी सुरू आहे. ज्या चादरीवरून हा वाद झाला, त्या चादरीवर पवित्र कुराणची कोणतीही आयत लिहिलेली नव्हती. मात्र काही लोकांनी अफवा पसरवली, मेसेज व्हायरल करण्यात आले, त्यामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली, असे फडणवीस म्हणाले.
पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल म्हणाले की, नागपूरची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे समाजकंटक हे स्थानिकच होते त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकवण्याचे काम केलं. तसेच नागपूर मध्ये ज्या पद्धतीने घटना घडत गेल्याने हिंसाचार झाला त्यामध्ये कोणीही बाहेरून आल्याचे पुरावे मिळालेले नाही. तसेच या प्रकरणावर अद्याप देखील कारवाई सुरू असून ज्यांची ओळख पटत आहे त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. अशी माहीती त्यांनी दिली.
तर बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले की, औरंगजेब मुद्दा आजच्या काळात प्रासंगिक नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा हिंसाचार समाजिक आरोग्यासाठी योग्य नाही. याप्रकरणी पोलिस योग्य ती दखल घेऊन सखोल चौकशी करतील असे ते कर्नाटकच्या बंगळुरू येथे म्हणाले.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र