कल्पना सरोज ह्या एक प्रेरणादायी भारतीय उद्योजिका आहेत, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितींवर मात करून यशस्वी उद्योजकतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांचा जन्म 1961 साली महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा गावात एका मराठी दलित कुटुंबात झाला. त्यांचे वडील पोलिस कॉन्स्टेबल होते. 12 व्या वर्षीच त्यांचे लग्न झाले आणि त्या मुंबईतील झोपडपट्टीत पतीच्या कुटुंबासोबत राहत होत्या. तिथे त्यांना शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना वाचवून पुन्हा घरी आणले.
16 व्या वर्षी कल्पना सरोज पुन्हा मुंबईला गेल्या आणि एका वस्त्र कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. सरकारी कर्जाचा वापर करून त्यांनी शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला आणि नंतर फर्निचर व्यवसायातही यश मिळवले. त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातही पाऊल ठेवले आणि आपल्या उद्योजकीय कौशल्याने नाव कमावले. 2001 साली कमानी ट्यूब्स कंपनी दिवाळखोरीत गेली असताना, कल्पना सरोज यांनी ती कंपनी ताब्यात घेऊन पुन्हा नफ्यात आणली.
आज त्या अनेक प्रकारच्या व्यवसायात आहेत. अनेक कंपन्यांच्या मालक आहेत. त्यांनी सिनेक्षेत्रासह, आदरातिथ्य क्षेत्र तसेच पर्यटनाच्या क्षेत्रातही हातपाय पसरले आहेत. कृषी आधारित उद्योगातही त्या काम करत आहेत. करोडोंची संपत्ती त्यांच्या नावे आहे. त्यांची गणना सर्वात यशस्वी महिलाउद्योजिकांमध्ये केली जाते. समाजसेवक म्हणुनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना 2013 साली भारत सरकारने पद्मशी पुरस्काराने सन्मानित केले. तसेच, त्या भारतीय महिला बँकेच्या संचालक मंडळावर आणि भारतीय व्यवस्थापन संस्था बेंगळुरूच्या गव्हर्नर्स मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
कल्पना यांची ही यशोगाथा अनेकांना एखाद्या चित्रपटाची कहाणी वाटते. प्रतिकूल परिस्थितीत मेहनत, इमानदारी, साहसी वृत्तीने मार्गक्रमण केल्यास यशाचे उतुंग शिखर गाठता येते, गोष्ट कल्पना यांचे उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र