केंद्रात आणि बहुतांश राज्यांतील सत्ता हातातून गेल्यानंतर गांधी कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातूनच आव्हान देणार्यांची संख्या वाढली आहे. काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी आजारी असताना कपिल सिब्बल, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य काही बड्या नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ व सक्षम अध्यक्ष मिळावा म्हणून उठाव केला होता. त्यावेळी हा विषय काँग्रेस पक्षामध्ये फारच गाजला होता. उठाव केलेल्या नेत्यांना नोटिसा पाठविल्या गेल्या. परंतु, त्यांच्यावर पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. सोनिया गांधी आजारी असल्यामुळे पक्षासाठी त्या जास्त वेळ देऊ शकत नव्हत्या. पक्ष नेतृत्वाचे लक्ष वेधण्यासाठी पक्षांतर्गत झालेला उठाव वास्तवतेला धरूनच होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद सोडून राहुल गांधींकडे जबाबदारी सोपविली. परंतु, राहुलसुद्धा पक्षाला आजपर्यंत फारसे सावरू शकले नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने गत दोन निवडणुकांपेक्षा अधिक जागा जिंकल्या. मात्र, महाराष्ट्र, जम्मू- काश्मीर, दिल्ली, गुजरात यांसह अनेक विधानसभांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले. अशा सततच्या पराभवामुळे काँग्रेसला पक्षातील बड्या नेत्यांकडूनच आव्हान मिळू लागले आहे. या नेत्यांवर कारवाई केली तर ते पक्ष सोडून जातील आणि पक्षाला एकामागून एक धक्के बसतील, अशी काँग्रेसच्या नेतृत्वाला भीती असावी. गांधी कुटुंबीय आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना टीकेचे लक्ष करणारे शशी थरूर हे त्यापैकीच एक आहेत. सतत वादग्रस्त विधान करून स्वत:ला आणि पक्षाला अडचणीत आणणारे थरूर हे काँग्रेससाठी अधिकच जड झाले आहेत. कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे तर कधी माकपच्या नेत्यांचे कौतुक केल्यामुळे थरूर यांनी पक्षातून नाराजी ओढवून घेतली आहे. काँग्रेस नेत्यांच्या दृष्टीने ते दुर्लक्षित नेतृत्व झाले आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा माझी पक्षाला गरज असेल तर ठीक आहे अन्यथा माझ्याकडे इतर पर्यायदेखील उपलब्ध आहेत, असे विधान करून ते चर्चेत आले आहेत. पक्षाला त्यांनी एकप्रकारे अल्टिमेटमच दिला आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी काँग्रेससाठी गोंधळ निर्माण करत गांधी कुटुंबीयाची गोची करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्षाने थरूर यांचे विधान फारसे गांभीर्याने घेतले नसले तरी भाजपसाठी हे आयते कोलित दिल्यासारखे आहे. सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात थरूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तेव्हा काँग्रेसला विरोधकांनी घेरले होते. 2018 मध्ये थरूर यांनी त्यांच्या पुस्तकात जर भाजप पुन्हा जिंकला तर भारत हिंदू पाकिस्तान बनू शकतो, असा वादग्रस्त उल्लेख केला होता. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी खर्गे यांच्या विरोधात लढत दिली होती, असे एक ना अनेक प्रकरणांमुळे थरूर आता पक्षाला नाकापेक्षा मोती जड झाल्यासारखेच आहेत. – विनायक सरदेसाई
Check Also
दिलासादायक माघार
केंद्र सरकारने बहुचर्चित ‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र