लेख-समिक्षण

सुरक्षेवर लक्ष कधी ?

प्रयागराजमध्ये सुरु असलेला महाकुंभ 144 वर्षांनी आला. या महाकुंभात मौनी अमावास्येच्या दिवशी अमृत स्नान होणार होते. त्यापूर्वी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत तीस भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर सकाळी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. साधू, महंत आणि भाविक गंगा स्नान करत आहेत. भाविकांना काही अडचण होऊ नये म्हणून आखाड्यांनी त्यांच्या स्नानावर स्वतःहून बंदी आणली आहे. परंतु, ही चेंगराचेंगरी नेमकी झाली कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाकुंभात पाच कोटी भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. अचानक संगम नोजवर बॅरिकेड तुटला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. मात्र, दुसरे कारण असेही सांगितले जात आहे की, महाकुंभमेळा परिसरात एवढी गर्दी होती की काही महिलांचा श्वास गुदमरायला लागला. यानंतर ते एकमेकांवर पडल्या. त्यामुळे काही वेळातच बॅरिकेडिंग तुटून चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीनंतर आखाड्याच्या स्नानासाठी मोकळ्या करण्यात आलेल्या ठिकाणी रुग्णवाहिकांची रांग दिसून आली. सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामुळे इतर सुरु असलेल्या रस्त्यांवर जास्त गर्दी झाली आहे. यामुळेच गुदमरल्याने अनेकजण खाली पडून चेंगराचेंगरीत सापडले. महाकुंभमेळ्यात मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीने अनेक भाविकांच्या मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या. देश स्वतंत्र झाल्यानंतर 1954 च्या कुंभातही चेंगराचेंगरी झाली होती. त्या जत्रेदरम्यान मौनी अमावास्येच्या दिवशी त्रिवेणी धरणावर झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो भाविकांना प्राण गमवावे लागले. न्यायप्रविष्ट प्रशासनाने ही घटना लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण एका छायाचित्रकाराने त्याचा पर्दाफाश केला होता. चेंगराचेंगरीच्या वेळी केवळ दोन छायाचित्रकारांकडे छायाचित्रे होती. त्यावेळी एका छायाचित्रकाराने जीवाची पर्वा न करता अपघाताचा फोटो काढला होता आणि त्यानंतर सचित्र वृत्त प्रसिद्ध झाल्यावर सरकार अडचणीत आले होते. 2013 च्या कुंभमेळ्यात मौनी अमावास्येचे स्नान दहा फेब्रुवारीला होते. मोठ्या संख्येने यात्रेकरू प्रयागराज जंक्शन येथे पोहोचले होते. ओव्हरब्रीजवरही गर्दी झाली होती. सायंकाळी फलाट सहाकडे जाणार्‍या फूट ओव्हरब्रीजच्या पायर्‍यांवर अचानक चेंगराचेंगरी झाली. हाणामारीत अनेकजण ओव्हरब्रीजवरून पडले तर अनेकांना जमावाने चिरडले ओव्हरब्रीज कोसळून 36 जणांचा मृत्यू झाला होता. सध्या प्रयागराजला महाकुंभाचा सोहळा सुरू आहे. त्यात कोट्यवधी लोक कसे येत आहेत. त्या लोकांची आम्ही कशी व्यवस्था केली आहे, अशा प्रकारचे मार्केटिंग गेल्या काही काळापासून भाजप आणि उत्तर प्रदेश सरकार करत होते. त्यात चुकीचे काही नाही. पण कुंभ हा मार्केटिंगचा विषय नाही. योगी आणि इतर मंत्र्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा लाखो श्रध्दाळूंच्या सुरक्षेवर लक्ष देणे गरजेचे आहे. – जगदीश काळे

Check Also

दिलासादायक माघार

केंद्र सरकारने बहुचर्चित ‌‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026‌’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …