‌‘स्टार पॉवर‌’चे वलय आणि चित्रपट

हिंदी चित्रपटसृष्टीत काही दिग्दर्शक असे झाले, ज्यांनी केवळ चित्रपट बनवले नाहीत तर त्यांनी काळाची अभिरुची घडवली. सुभाष घई हे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव. ‌‘ताल‌’, ‌‘परदेस‌’, ‌‘हीरो‌’, ‌‘राम लखन‌’ किंवा ‌‘खलनायक‌’ यांसारखे चित्रपट पाहताना केवळ मोठे कलाकार दिसत नाहीत, तर त्यामागे उभा असलेला एक ठाम दिग्दर्शकीय दृष्टिकोन जाणवतो. म्हणूनच सुभाष घई यांनी अलीकडे केलेले विधान महत्त्वाचे ठरते. फक्त स्टार पॉवरवर चित्रपट चालत नाहीत, सिनेमा त्याच्या आशय, दिग्दर्शकीय दृष्टी आणि भावनिक प्रभावामुळे टिकतो, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानात केवळ नाराजी नाही, तर आजच्या हिंदी चित्रपटसृष्टीसमोरील एका गंभीर संकटाची जाणीव दडलेली आहे.- सोनम परब
एक काळ असा होता की, चित्रपटाचा केंद्रबिंदू कथा असायची. त्या कथेला योग्य दृश्यभाषा देणारा दिग्दर्शक हा चित्रपटाचा खरा शिल्पकार मानला जायचा. कलाकार महत्त्वाचे असत, परंतु ते कथेला पूरक असत. आज परिस्थिती उलट होताना दिसते. अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट केवळ एखाद्या सुपरस्टारच्या नावाभोवती उभे राहत आहेत. कथानक दुबळे असले, पटकथेत सातत्य नसले किंवा भावनिक खोलीच नसली, तरी प्रेक्षक केवळ स्टारच्या नावावर थिएटरमध्ये येतील, असा समज वाढला आहे. मात्र गेल्या काही वर्षांतील अनेक चित्रपटांच्या अपयशाने हा समज किती चुकीचा आहे, हे स्पष्ट झाले आहे.
चित्रपट हा मूलत: सामूहिक कलाविष्कार आहे. त्यात संगीत, अभिनय, छायाचित्रण, संपादन, संवाद, कला दिग्दर्शन अशा अनेक घटकांचा सहभाग असतो. परंतु या सर्व घटकांना एकसंध स्वरूप देण्याचे काम दिग्दर्शक करतो. म्हणूनच सुभाष घई यांनी दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीला चित्रपटाची खरी ताकद म्हटले आहे. एखादी साधी कथा देखील योग्य मांडणीमुळे प्रभावी ठरू शकते. उलट, प्रचंड खर्च, भव्य सेट्स आणि लोकप्रिय कलाकार असूनही कमकुवत दिग्दर्शनामुळे चित्रपट कोसळू शकतो.
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहिला, तर याची अनेक उदाहरणे आढळतात. राज कपूर यांच्या चित्रपटांमध्ये सामाजिक भाष्य आणि मानवी भावना यांचा सुंदर संगम होता. गुरुदत्त यांनी आपल्या चित्रपटांतून अंतर्मुख वेदना आणि कलात्मक संवेदनशीलता दाखवली. हृषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांत मध्यमवर्गीय जीवनातील साधेपणा आणि मानवी नात्यांचे वास्तव दिसले. या दिग्दर्शकांचे चित्रपट केवळ कलाकारांमुळे यशस्वी झाले नाहीत, तर त्यामागील विचारांमुळे आजही स्मरणात आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीत नव्वदच्या दशकानंतर मोठ्या प्रमाणावर ‌‘स्टार सिस्टीम‌’ अधिक मजबूत झाली. चित्रपटाच्या आशयापेक्षा त्याच्या उद्घाटनाच्या कमाईला अधिक महत्त्व दिले जाऊ लागले. प्रचार, सोशल मीडिया ट्रेंड, पहिल्या तीन दिवसांची कमाई आणि परदेशातील व्यवसाय हेच यशाचे निकष बनले. परिणामी पटकथा लेखन, संवाद आणि व्यक्तिरेखांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. अनेक चित्रपटांमध्ये कथानकापेक्षा दृश्य वैभवावर अधिक भर दिला गेला. परंतु प्रेक्षकांची अभिरुची केवळ चमकधमकीवर कायम टिकत नाही. त्यांना भावनिक प्रामाणिकता आणि कथेतला विश्वासार्हपणा अधिक महत्त्वाचा वाटतो.
सुभाष घई यांच्याच ‌‘खलनायक‌’ चित्रपटाचे उदाहरण घेता येईल. या चित्रपटात संजय दत्त, जॅकी श्र्ॉफ आणि माधुरी दीक्षित यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट नक्कीच होती. परंतु, केवळ त्यांच्या उपस्थितीमुळे हा चित्रपट यशस्वी झाला नाही. या चित्रपटातील पात्रांची गुंफण, खलनायकाच्या मनातील द्वंद्व आणि त्याला मिळालेली संगीताची जोड ही दिग्दर्शकाच्या दृष्टीची कमाल होती. घई यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका तरुणाची कथा अशा प्रकारे मांडली की प्रेक्षकांना त्या पात्राबद्दल सहानुभूती वाटू लागली. हे यश स्टार पावरचे नसून दिग्दर्शकीय कौशल्याचे होते. जर निव्वळ स्टार पावरच्या जोरावर चित्रपट चालले असते, तर आजच्या काळातील अनेक बड्या स्टार्सचे शंभर-दोनशे कोटींचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पत्त्यांसारखे कोसळले नसते. प्रेक्षक आता अधिक सुजाण झाला आहे, त्याला पडद्यावर केवळ ग्लॅमर नको आहे, तर त्याला खिळवून ठेवणारी कथा हवी आहे, याचे भान आजची चित्रपटसृष्टी विसरत चालली आहे.
अलीकडील काळात तुलनेने लहान बजेटचे आणि कमी प्रसिद्ध कलाकार असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. यामागे एक स्पष्ट संदेश आहे. प्रेक्षक आता अधिक सजग झाले आहेत. डिजिटल माध्यमांमुळे त्यांच्यासमोर जगभरातील विविध दर्जेदार आशय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे केवळ स्टारच्या प्रतिमेवर चित्रपट विकणे पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही. कथा, पटकथा आणि दिग्दर्शकीय मांडणी यांनाच आता निर्णायक महत्त्व प्राप्त होत आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे यशही याच संदर्भात अभ्यासण्यासारखे आहे. तेथे मोठे कलाकार असले तरी कथानक आणि भावनिक रचना यांना प्राधान्य दिले जाते. प्रेक्षकांना स्थानिक संस्कृती, मूल्ये आणि नात्यांशी जोडणारी कथा दिली जाते. म्हणूनच अनेक दक्षिण भारतीय चित्रपट संपूर्ण देशभर लोकप्रिय ठरले. त्यात भव्यता असली, तरी तिच्या केंद्रस्थानी कथा असते. हिंदी चित्रपटसृष्टीत मात्र काही काळ वास्तवापासून दूर गेलेल्या कृत्रिम भव्यतेला अधिक महत्त्व दिले गेले.
सुभाष घई यांच्या विधानाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सर्जनशीलतेचा अभाव. आज अनेक चित्रपट सुरक्षित व्यावसायिक गणितांवर आधारित बनवले जात आहेत. जुने चित्रपट पुन्हा बनवणे, लोकप्रिय गाण्यांचे पुनर्निर्माण करणे किंवा यशस्वी सूत्रांची पुनरावृत्ती करणे याकडे कल वाढला आहे. यात धोका कमी असला, तरी नव्या कल्पनांना संधी कमी मिळते. खऱ्या अर्थाने सिनेमा तेव्हाच पुढे जातो, जेव्हा दिग्दर्शक प्रयोग करण्याचे धाडस दाखवतो.
चित्रपटसृष्टी ही समाजाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब असते. जेव्हा सर्जनशीलतेपेक्षा बाजारपेठेचा दबाव वाढतो, तेव्हा कलात्मक दर्जा कमी होऊ लागतो. सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही; तो समाजाच्या भावविश्वावर, भाषेवर, संस्कृतीवर आणि विचारांवर प्रभाव टाकतो. त्यामुळे चित्रपट निर्मितीत आशय आणि संवेदनशीलतेला महत्त्व देणे आवश्यक ठरते.
आजच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीसमोर सर्वांत मोठे आव्हान म्हणजे प्रेक्षकांचा विश्वास पुन्हा मिळवणे. हा विश्वास केवळ सुपरस्टार्सच्या लोकप्रियतेने मिळणार नाही. त्यासाठी चांगल्या कथा, सक्षम लेखक, धाडसी दिग्दर्शक आणि वास्तवाशी जोडलेली मांडणी आवश्यक आहे. सुभाष घई यांचे विधान हे त्यामुळे एका ज्येष्ठ दिग्दर्शकाचे वैयक्तिक मत म्हणून मर्यादित राहत नाही, तर ते संपूर्ण उद्योगासाठी एक इशारा ठरते.
सिनेमा हा शेवटी मानवी भावनांचा प्रवास असतो. पडद्यावर दिसणाऱ्या व्यक्तींपेक्षा पडद्यामागील विचार अधिक काळ टिकतात. म्हणूनच एखादा चित्रपट किती मोठा होता, यापेक्षा तो प्रेक्षकांच्या मनात किती काळ जिवंत राहिला, हेच त्याचे खरे यश मानावे लागते.

Check Also

तापसी बनली ब्रँड ॲम्बसेडर

प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूची आता ‌‘इनॅमर‌’ या नामांकित ब्रँडच्या नवीन मोहिमेसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड …