हवाई दलाच्या स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग या लढाऊ विमान तेजस उडवणार्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. हे फायटर विमान देशातच विकसित करण्यात आले आहे. स्क्वॉड्रन लीडर्स भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासोबत, मोहना सिंग भारतीय हवाई दलात सामील झालेल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. कांठ आणि चतुर्वेदी या सुखोई लढाऊ विमानाचे पायलट आहेत. आतापर्यंत मोहना सिंग मिग फायटर उडवत असत. या महिला लष्करी अधिकार्यांचे कर्तृत्व ऐतिहासिक आहे. कारण त्या भविष्याचा भक्कम पाया रचत आहेत. भविष्यात सशस्त्र दलात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या रणरागिणींच्या कार्यकर्तृत्वाचा हातभार लागेल.
भारतात 2016 मध्ये महिलांना फायटर एअरक्राफ्ट पायलट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या या वैमानिकांची संख्या सुमारे 20 आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महिलांना लष्करी सेवेत नियमित कमिशन म्हणून समाविष्ट करण्याची प्रक्रिया 1958 मध्ये सुरू झाली, परंतु सुरुवातीला त्यांची भूमिका वैद्यकीय सेवेपुरती मर्यादित होती. प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांना 1992 मध्ये अल्प सेवेची संधी मिळाली. तरीही त्यांचा आजपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. जीवनाच्या इतर क्षेत्रांप्रमाणेच, सशस्त्र दलात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी महिलांना खूप संघर्ष करावा लागला आहे. आजही सैन्यात त्यांची संख्या केवळ चार टक्क्यांच्या आसपास आहे.
2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अल्प सेवा महिला अधिकार्यांना कायमस्वरूपी कमिशन मिळण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिला. सध्या वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त, महिला लष्कराच्या दहा विभागात काम करू शकतात, ज्यात अभियांत्रिकी, सिग्नल, आर्मी एअर डिफेन्स, आर्मी सर्व्हिस कॉर्प्स, आर्मामेंट, आर्मी एव्हिएशन कॉर्प्स, इंटेलिजन्स कॉर्प्स, शिक्षण आणि न्याय विभाग यांचा समावेश आहे.
लष्कर आणि हवाई दल तसेच नौदलात महिलांसाठी सेवा क्षेत्रांचा विस्तार होत आहे. 2019 मध्ये शुभांगी स्वरूप यांना नौदलासाठी डॉर्नियर सर्व्हिलन्स विमान उडवण्याची पहिली संधी मिळाली. एनडीए आणि सीडीएससारख्या परीक्षांचे दरवाजे उघडल्यानंतर महिला-तरुणींची भरती वाढली आहे. यावर्षी मार्चमध्ये सेवेत रुजू झालेल्या 2,630 अग्निवीर सैनिकांच्या तिसर्या तुकडीत 396 महिलांचा समावेश होता. लष्करी पोलिस दलातील महिलांची उत्साहवर्धक कामगिरी पाहून लष्कराने अधिकाधिक महिला सैनिकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक दुराग्रह आणि महिलांबद्दलचा भेदभाव यांचा पगडा असणार्या पुुरुषसत्ताक व्यवस्थेला या रणरागिणींची भरारी चपराक देणारी आहे.– सुचित्रा दिवाकर
Check Also
दिलासादायक माघार
केंद्र सरकारने बहुचर्चित ‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र