लेख-समिक्षण

रजनीकांत नावाचं पर्व

रजनीकांत हे नाव केवळ चित्रपटसृष्टीतील एक चमकदार ब्रँड नाही, तर त्यामागे संघर्ष, चिकाटी आणि अस्सल माणूसपणाची कहाणी आहे. त्यांनी पडद्यावरच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थिर स्थान मिळवलेच; पण खर्‍या आयुष्यातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि नम्रता यामुळे त्यांना जनसामान्यांचा आदर प्राप्त झाला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी अभिनय केला, आणि आजही त्यांचे नाव केवळ तमिळ सृष्टीपुरते मर्यादित नाही, तर जगभरातील चाहत्यांच्या मनात प्रेरणेचे प्रतीक बनले आहे.- सोनम परब
————
रजनीकांत या नावाचा अर्थच पडद्यावरच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाशी जोडला गेला आहे. त्यांच्या उपस्थितीत इतर कोणताही नायक फिकट भासतो. हे केवळ त्यांचे देखणे रूप किंवा ग्लॅमर यामुळे नाही, तर ते पडद्यावर जी व्यक्तिरेखा साकारतात, त्यापलीकडेही ते आपल्या अस्सल आणि प्रामाणिक रूपाने चाहत्यांसमोर उभे राहतात. ते नायक फक्त चित्रपटांत आहेत, खासगी आयुष्यात मात्र ते अलंकारिक मेकअप किंवा झगमगाटापासून दूर राहतात. त्यांचे आयुष्य साधे, जमिनीवरचे आहे.
सध्या त्यांच्या नव्या चित्रपट ‘कुली’ने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. पण या नावाशी त्यांचा संबंध नवा नाही. पाच दशकांपूर्वी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ते खरोखरच कुलीगिरी आणि बस कंडटरचे काम करीत होते. जीवनातील त्या साध्या टप्प्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि आज त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीत दोनच नावे अशी आहेत जी बेजोड मानली जातात‡तमिळ सृष्टीतील रजनीकांत आणि हिंदी सृष्टीतील अमिताभ बच्चन. मात्र या दोघांतूनही जर एखाद्या एकाला सर्वोच्च स्थान द्यायचे झाले, तर तो नायक रजनीकांत ठरतो. ते फार कमी चित्रपट करतात, पण जेव्हा ते पडद्यावर दिसतात, तेव्हा मनोरंजनाचा महापूर उसळतो. ़‘कुली’़नेही हेच सिद्ध केले. फक्त दोन आठवड्यांत या चित्रपटाने पाचशे कोटींचा टप्पा पार केला.
२०१८ मध्ये आलेल्या ‘२.०’ या चित्रपटाने तर सातशे कोटींच्या घरात कमाई करून जागतिक स्तरावर गाजावाजा केला. ‘जेलर’ या २०२३ मधील चित्रपटानेही सहाशे पन्नास कोटींच्या पुढे व्यवसाय केला. नव्या ‘कुली’़मध्ये आमिर खान यांनी विशेष उपस्थिती दाखवली. रजनीकांतच्या चित्रपटांचा मोह फक्त दक्षिणेत मर्यादित नसून जगभर पसरलेला आहे.
पडद्यावरील नायक आणि खर्‍या आयुष्यातला साधा माणूस
गेल्या पन्नास वर्षांपासून ते अभिनय करत आहेत. १९७५ मध्ये आलेल्या ‘कथा संगम’या चित्रपटातून त्यांची कारकीर्द सुरू झाली. आज चाहत्यांच्या दृष्टीने ते देवतुल्य आहेत. काहींनी तर त्यांच्या मंदिरांत मूर्ती बसवून पूजाअर्चा सुरू केली. चाहत्यांना चित्रपटाचे परीक्षण वाचण्याची गरजच नाही, ते सरळ तिकीट खरेदी करून चित्रपटगृहात धाव घेतात. तरीही रजनीकांत स्वतःला झगमगाटापासून दूर ठेवतात. साध्या जीवनशैलीत, मासूमतेच्या चेहर्‍याने ते लोकांमध्ये मिसळतात. पडद्यावर ते धडाडीचे, क्रोधी, शत्रूंना नामोहरम करणारे नायक वाटतात; पण प्रत्यक्षात त्यांनी कधी कुणाला थापड सुद्धा मारली नसावी.
नायकाच्या पारंपरिक कल्पनांना दिले आव्हान
रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीतील जुन्या समजुतींना धक्का दिला. नायक म्हणजे गोरा, चमकदार, देखणा ही कल्पना त्यांनी मोडून काढली. सांवळ्या रंगाच्या असूनही त्यांनी आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी स्वतःला फक्त व्यावसायिक पडद्यावरील नायक न ठेवता दबलेल्या समाजघटकांचा आवाज बनवले.‘काला’, ‘कबाली’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी वंचितांसाठी लढणार्‍या व्यक्तिरेखा साकारल्या. ७४ वर्षांच्या वयातही ते मोठ्या पडद्यावर अशी किमया घडवतात की अनेक तरुण नायक त्यांच्यासमोर फिके पडतात.
‘कुली’ या नावाशी असलेला खरीखुरा धागा
‘कुली’ हा केवळ चित्रपटाचा शीर्षक नसून त्यांच्या आयुष्याचा अध्याय आहे. खर्‍या आयुष्यात ते बस कंडटर आणि कुली म्हणून काम करीत असताना उपेक्षा, टोमणे आणि संघर्ष यांना सामोरे गेले. एका प्रसंगात त्यांनी मित्राचे सामान उचलल्यावर त्याने दिलेले दोन रुपये आणि तुच्छतेचे बोल यामुळे ते डोळ्यात पाणी आणून रडले होते. या संघर्षातूनच त्यांना अभिनयाच्या वाटेवर नेण्यात मित्र राज बहादूर यांचा मोठा हातभार होता. दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना रजनीकांत यांनी या मित्राचे नाव कृतज्ञतेने घेतले.
अभिनयाची पहिली पायरी आणि यशाची शिखरे
राज बहादूर यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी मद्रास चित्रपट संस्थेत प्रवेश घेतला आणि तेथे तमिळ भाषा शिकली. दिग्दर्शक के. बालचंद्र यांनी ़‘अपूर्व रागांगल’़मध्ये त्यांना लहानसा खलनायकाचा रोल दिला. सुरुवातीच्या दोन-तीन वर्षांत असेच विरोधी व्यक्तिरेखा त्यांना मिळत राहिले. पण ़‘भुवन ओरु केल्विकुरी’ड़मध्ये त्यांनी प्रथमच नायकाची भूमिका केली. त्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीने त्यांची जोडी अनेक चित्रपटांत झळकली.
१९७८ मध्ये आलेल्या ़‘बिल्ला’़ने त्यांना मोठे यश दिले. हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’़चा तमिळ रूपांतर होता. ‘मुंदरू मूगम’साठी १९८२ मध्ये त्यांना प्रथमच तमिळनाडू सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. १९९५ मध्ये आलेल्या ‘बातशा’़ने तर बॉस ऑफिसचे अनेक विक्रम मोडले.
तमिळ चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ
रजनीकांत यांनी तमिळ चित्रपटांना जागतिक स्तरावर पोहोचवले. ‘मुथू’हा जपानमध्ये प्रदर्शित होणारा पहिला तमिळ चित्रपट ठरला. ‘चंद्रमुखी’तुर्की आणि जर्मन भाषेत प्रदर्शित झाली. ‘शिवाजी’़ने ब्रिटन व दक्षिण आफ्रिकेत बॉस ऑफिसवर अव्वल स्थान मिळवले. कारकीर्दीच्या पहिल्या दहा वर्षांत त्यांनी शंभराहून अधिक चित्रपट पूर्ण केले.
अभिनयाची सुरुवात त्यांनी कन्नड रंगभूमीतून केली होती. तमिळ चित्रपटांत सर्वप्रथम अ‍ॅनिमेशनची ओळख करून देण्याचे श्रेयही त्यांना जाते. ‘राजा चायना रोजा’़मध्ये अ‍ॅनिमेशनचा वापर झाला होता. त्यांनी तमिळ, हिंदी, मल्याळम, कन्नड, तेलुगु यांसोबत बंगाली भाषेतही ‘भाग्यदेवता’चित्रपट केला. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता ‘अंधा कानून’ ज्यात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत होते.
रजनीकांत हे नाव म्हणजे केवळ एक नायक नाही, तर संघर्षातून उभा राहिलेला अस्सल माणूस आहे. त्यांनी दाखवून दिले की, पडद्यावरील तेजस्वी रूप आणि खर्‍या जीवनातील साधेपणा यांचा मेळ साधता येतो. म्हणूनच पाच दशकांनंतरही त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही, उलट नवनव्या पिढ्यांमध्ये ती वाढतच गेली आहे.
रजनीकांत यांनी अभिनयाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे कामही केले आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये फक्त मनोरंजन नाही तर सामाजिक समस्या, वंचितांचा आवाज आणि न्यायासाठी लढणार्‍या पात्रांचे रूप स्पष्ट केले गेले आहे. ‘कबाली’, ‘काला’, आणि ‘अन्नाथे’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी समाजातील भेदभाव, भ्रष्टाचार आणि शोषणाविरुद्धच्या कथा साकारल्या, ज्यामुळे प्रेक्षक त्यांच्या अभिनयाबरोबर सामाजिक न्यायाशी जोडले गेले. पडद्यावरच्या चमकदार व्यक्तिमत्त्वामागे अशी गंभीर सामाजिक संवेदना असणे हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे.
रजनीकांत यांच्या यशामागे फक्त अभिनयाची कला नाही, तर त्यांनी प्रेक्षकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. त्यांच्या चित्रपटांच्या प्रचारात मोठमोठ्या ग्लॅमरपेक्षा मानवी मूल्ये, साधेपणा आणि हसतमुखी संवाद यांचा मोठा वाटा आहे. चाहत्यांसमोर ते नेहमी स्वतःचे खरे रूप उभे करतात; एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चाहत्यांशी संवाद साधणे, फोटो घेणे किंवा मुलांना आशीर्वाद देणे, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची नैसर्गिक ओळख आहे. यामुळे ते केवळ सुपरस्टार नव्हे, तर लोकांच्या मनातील एक अविभाज्य भाग बनले आहेत.

Check Also

रुपेरी पडद्यावरील ‌‘झुला‌’

हिरवाईने नटलेली बाग, झाडाच्या फांदीला बांधलेला झुला आणि त्यावर झुलणारी नायिका… हिंदी चित्रपटातील हे दृश्य …